हिल, ऑस्टिन ब्रॅडफर्ड : (८ जुलै १८९७ – १८ एप्रिल १९९१) ऑस्टिन ब्रॅडफर्ड हिल यांचा लंडनमध्ये जन्म होऊन लफ्टन, एसेक्समधील ओसबोर्न हाऊस येथे त्यांचे बालपण गेले. तेथेच चिग्वेल शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पहिल्या महायुद्धात त्यांनी वैमानिक म्हणून काम केले परंतु त्यांना झालेल्या क्षयामुळे ते नंतर अपात्र ठरले. दोन वर्षे रूग्णालयात काढल्यावर पत्राद्वारे शिक्षण घेऊन लंडन विद्यापीठाची अर्थशास्त्राची पदवी त्यांनी संपादन केली.
हिल औद्योगिक थकवा संशोधन मंडळात (Industry Fatigue Research Board) काम करण्यासाठी गेले. तेथे त्यांचा संबंध वैद्यकीय संख्याशास्त्रज्ञ मेजर ग्रीनवूड यांच्याशी आला. स्वतःचे संख्याशास्त्रीय ज्ञान वाढवण्यासाठी हिल यांनी कार्ल पिअरसन यांच्या व्याख्यानांना हजेरी लावली. ग्रीनवूड यांनी नवीन निघालेल्या लंडनच्या आरोग्य आणि उष्णकटिबंधीय संस्थेचे प्रमुखपद स्वीकारले तेव्हा हिलही त्यांच्याबरोबर तिकडे गेले. हिल यांची तिथे रोगपरिस्थितीविज्ञान व जीवनावश्यक संख्याशास्त्र (Epidemiology and Vital Statistics) विषयाचे प्रपाठक म्हणून नेमणूक झाली. तेथेच ते वैद्यकीय संख्याशास्त्राचे प्राध्यापक झाले.
दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी गृहदक्षता मंत्रालयाच्या संशोधन व प्रयोग खात्यात, तसेच रॉयल विमानदलात वैद्यकीय संचालक म्हणून हिल यांनी काम केले. वैद्यकीय संख्यशास्त्रातील मानद नागरी सल्लागार तसेच वैमानिकांबाबत संशोधन समितीचे सभासद म्हणून ते कार्यरत होते.
यदृच्छित चिकित्सालयीन चाचण्यांचे आद्यप्रवर्तक म्हणून ऑस्टीन ब्रॅडफोर्ड हिल ओळखले जातात. त्यांनी रिचर्ड डॉल यांच्या सहकार्याने धूम्रपान व कर्करोग यातील संबंध सप्रयोग सिद्ध केला.
हिल हे प्रमुख्याने वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या संख्याशास्त्राशी निगडीत ‘ब्रॅडफोर्ड-हिल निकष’ याचे उद्गाते म्हणून ख्यातनाम आहेत. हिल यांनी दिलेले कारणात्मक साहचर्याचे (casual association) निकष असे आहेत : परिणामाचा आवाका (Strength), सुसंगतता किंवा सातत्य (Consistency), नेमकेपणा (Specificity), परिणामाचा कालावधी (Temporality), जैविक प्रवण (Biological gradient), शक्यता (Plausibility), सुसंगता (Coherence), प्रयोग (Experiment), अनुभवाची सादृशता (Analogy).
हिल हे रॉयल संख्याशास्त्र सभा या संस्थेचे दोन वर्षे अध्यक्ष होते. त्यांना या संस्थेच्या गाय सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. हिल यांना रॉयल सोसायटीची अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात आली. हिल यांना सरदार किताब मिळाला तसेच, ऑक्सफर्ड आणि एडिन्बर्ग विद्यापीठांच्या मानद पदव्या सुद्धा त्यांना दिल्या गेल्या.
हिल यांनी वैद्यकीय संख्याशास्त्राची मूलतत्त्वे हे पुस्तक लिहीले. लॅन्सेंट या सुप्रसिद्ध जर्नलमध्ये वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या लेखांवर आधारित हे त्यांचे पुस्तक पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरले. यामध्ये तांत्रिक भाग कमीत कमी ठेऊन विषयाची सामान्य तत्वे व संख्याशास्त्रीय आधारसामग्रीचे अनुमान काढण्याच्या पद्धती सोप्या प्रकारे समजावून सांगितल्या आहेत. हिल यांचे वैद्यकीय संख्याशास्त्राचे संकीर्ण पाठ्यपुस्तक हे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
संदर्भ :
- https://www.encyclopediaofmath.org/…/Hill,_Austin_Bradford
- jameslindlibrary.org/…/the-origins-of-austin-bradford
- https://www.amazon.com/…Austin-Bradford-Hill/
समीक्षक : विवेक पाटकर