एका देशाचा दुसऱ्या देशाच्या नजीकचा क्षेत्रविभाग किंवा दोन देशांचा एकमेकांशी भिडणारा प्रदेश म्हणजे सरहद्द होय. सरहद्दीला लांबी व रुंदी असते. सीमेइतकी सरहद्द निश्चित नसते. दोन देश किंवा प्रदेश यांच्या मर्यादा किंवा हद्दी निश्चित करणारी प्रत्यक्ष रेषा किंवा बांध म्हणजे सीमा (बॉर्डर) होय. त्यामुळे भौगोलिक व राजकीय दृष्ट्या सरहद्द व सीमा या भिन्न अर्थ दर्शविणाऱ्या संज्ञा आहेत. असे असले, तरी अनेकदा या दोन्ही संज्ञा समानार्थी म्हणून वापरल्या जातात.

सरहद्द ही संज्ञा प्रामुख्याने उत्तर अमेरिकेच्या इतिहासात वापरली गेली. पॅसिफिक किनाऱ्यावरील वसाहतींपूर्वी पश्चिमेकडील प्रदेशाला संयुक्त संस्थानांचा सरहद्द प्रदेश म्हणून ओळखले जाई. उत्तर अमेरिकेत मुख्यतः पूर्वेकडील भागात यूरोपियनांच्या वसाहती स्थापन होत होत्या. मूळ वसाहतकारांनी पश्चिमेकडील प्रदेशातही काही वसाहती स्थापन केल्या होत्या. त्यामुळे पूर्वेकडील दाट लोकवस्ती असलेल्या प्रदेशाच्या लगतचा पश्चिमेकडील विरळ लोकवस्तीचा प्रदेश म्हणजेच ‘सरहद्द प्रदेश’ असे मानले गेले. याचा अर्थ पश्चिमेकडे लोकवस्तीच्या विस्तारास अजूनही पुरेसा वाव होता. अमेरिकन इतिहासकार फ्रेडरिक जॅक्सन टर्नर यांनी आपल्या द फ्राँटिअर इन अमेरिकन हिस्टरी (इ. स. १९२०) या ग्रंथात अमेरिकेच्या सरहद्दीविषयी सविस्तर ऊहापोह केला आहे. त्यांच्या मते, सरहद्द म्हणजे जेथे सुसंस्कृत व असंस्कृत प्रदेश एकमेकांना मिळतात, तो प्रदेश होय. इ. स. १८९३ मध्ये ‘अमेरिकन हिस्टॉरिकल असोसिएशन’ची शिकागो येथे एक परिषद झाली होती. या परिषदेत टर्नर यांनी ‘अमेरिकेच्या इतिहासातील सरहद्दीचे महत्त्व’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्यांच्या मते, सरहद्द प्रदेशातील विस्तार व विकासाच्या दृष्टीने वसाहतकारांमध्ये विकासाभिमुख स्पर्धा चालू होती. सरहद्दीमुळेच अमेरिकन लोकशाहीला एक निश्चित आकार प्राप्त झाला. कॅनडाचा नॉर्थलँड व अमेरिकेचा अलास्का हे आजच्या काळातील फार मोठे सरहद्द प्रदेश मानले गेले आहेत. सायबीरिया, ऑस्ट्रेलिया व इतर ठिकाणांच्या (विशेष मानवी वस्ती नसलेल्या प्रदेशाच्या) संदर्भातही सरहद्द ही संज्ञा वापरली जाते.

ब्रिटिशांच्या काही साहित्यात ‘सरहद्द’ म्हणजे भारताचा वायव्य सरहद्द प्रदेश होय; तोच वायव्य सरहद्द प्रांत आहे. इ. स. १९४७ च्या फाळणीमुळे हा प्रांत पाकिस्तानात गेला. या सरहद्द प्रदेशाच्या संरक्षणासाठी बरेचसे ब्रिटिश लष्करी दल कायम तैनात केलेले असे. त्यामुळे त्यांनी या प्रदेशाला ‘सरहद्द’ ही संज्ञा वापरली. १९७२ पूर्वी भारत-चीन दरम्यानच्या अरुणाचल प्रदेशाला ‘नॉर्थ ईस्ट फ्राँटिअर एजन्सी’ (नेफा) असे संबोधले जाई.

सीमारेषा : सीमारेषा म्हणजे नकाशावर दर्शविलेली अशी रेषा की, जिच्यावरील प्रत्येक बिंदूची नोंद लेखी करार, निवाडा, लवाद किंवा सीमासमिती अहवालामध्ये असते. सीमारेषा ही दोन देशांची किंवा प्रांतांची प्रत्यक्ष हद्द दाखविते. उदा., भारत व चीन यांदरम्यानची सीमारेषा दाखविणारी मॅकमहोन रेषा, भारत व पाकिस्तान या दोन देशांची सरहद्द दाखविणारी रॅडक्लिफ रेषा, अफगाणिस्तान व पाकिस्तान या दोन राष्ट्रांची हद्द दाखविणारी ड्युरँड रेषा इत्यादी. जगातील वेगवेगळ्या देशांदरम्यानच्या, प्रांतांदरम्यानच्या, राज्या-राज्यांदरम्यानच्या सीमारेषांबाबत वर्षानुवर्षे सीमावाद चालू आहेत. उदा., भारत – पाकिस्तान, भारत – चीन (राष्ट्रीय सीमावाद), महाराष्ट्र – कर्नाटक (प्रादेशिक सीमावाद) इत्यादी.

नकाशावर या सीमारेषा विशिष्ट सांकेतिक चिन्हांनी दाखविलेल्या असल्या, तरी प्रत्यक्ष जमिनीवर या सीमा दाखविण्यासाठी काही भौगोलिक घटकांचा वापर केलेला असतो. उदा., एखादी पर्वतरांग किंवा डोंगररांग, नदीचा प्रवाहमार्ग इत्यादी. भारताला उत्तरेस हिमालयाच्या रूपाने नैसर्गिक सीमा लाभली आहे. भारत – पाकिस्तान दरम्यानची काही सीमारेषा सतलज व रावी या नद्यांच्या प्रवाहांवरून निश्चित केलेली आहे. सागरी प्रदेशाकडील सीमारेषा या आंतरराष्ट्रीय नियम व संकेत यांनुसार निश्चित केलेल्या असतात. महाराष्ट्रात कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे व पठारावरील पुणे, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे यांदरम्यानच्या सीमारेषा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून निश्चित केलेल्या आहेत. काही सीमारेषा मानवनिर्मित असतात. भारत – पाकिस्तान आणि भारत – बांगला देश यांदरम्यानची बरीचशी सीमारेषा मानवनिर्मित आहे.

समीक्षक : मा. ल. चौंडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.