मारिओ मोलिना : (१९ मार्च, १९४३ ते ७ ऑक्टोबर, २०२०) मारिओ मोलिना यांचा जन्म मेक्सिको शहरात झाला. मेक्सिकोतील उनाम विद्यापिठातून त्यांनी रसायन अभियांत्रिकीमध्ये पदवी संपादन केली. पुढे त्यांनी पश्चिम जर्मनीतील फ्रायबर्ग विद्यापिठातून बहुवारिके गतिकी (polymerization kinetics) या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर मेक्सिकोतील उनाम विद्यापिठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. नंतर ते अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. तिथे ते प्राध्यापक जॉर्ज सी. पिमेन्टल यांच्या संशोधन गटात सामील झाले. काही वर्षापूर्वी त्यांच्या गटाने शोधलेल्या रासायनिक लेझरचा वापर करून आण्विक गतिशीलतेचा अभ्यास त्यांनी केला. पीएच्.डी. पूर्ण झाल्यावर रासायनिक गतिशीलतेविषयी संशोधन करण्यासाठी ते एक वर्ष बर्कले येथेच थांबले. त्यानंतर मोलिना प्राध्यापक एफ. शेरवुड (शेरी) रोवलँड यांच्या पोस्टडॉक्टरल फेलोच्या गटात सामील झाले आणि कॅलिफोर्नियात अर्विन येथे गेले.

प्राध्यापक एफ. शेरवुड (शेरी) रोवलँड यांनी मोलिना यांना संशोधन विषयाच्या पर्यायांची यादी दिली, त्यातील एका विषयात त्यांना विशेष रस होता. तो होता, क्लोरोफ्लोरोकार्बन्स (सीएफसी)  या जटिल औद्योगिक रसायनांचा पर्यावरणावर होणारा परिणाम. त्यावेळी क्लोरोफ्लोरोकार्बन्स (सीएफसी)चा रासायनिक प्रणोदक आणि शीतक म्हणून अतिशय वापर होत असे. क्लोरोफ्लोरोकार्बन्स वातावरणात साचत होते आणि ज्याचा वातावरणावर काही विशेष परिणाम होत नाही असा विचार त्या वेळी केला जात होता.

मारिओ मोलिना यांच्यासाठी वातावरणीय रसायनशास्त्र नवीन होते, पण हे आव्हान त्यांनी स्वीकारले. आण्विक गतिशीलतेच्या अभ्यासात त्यांनी अभ्यासलेली रासायनिक संयुगे सीएफसी संयुगांसारखीच होती. त्यांच्या रासायनिक गुणधर्मांशी ते परिचित होते, परंतु त्यांचा वातावरणीय रसायनशास्त्राचा अभ्यास मात्र मारिओ मोलिना यांनी केला नव्हता. तीन महिन्यानंतर मारिओ मोलिना आणि एफ. शेरवुड (शेरी) रोवलँड या दोघांनी सीएफसी-ओझोन ऱ्हास सिद्धांत मांडला. वातावरणात सीएफसी सोडणे चालू राहिल्यास पृथ्वीच्या स्थिरावराणातील ओझोन थराचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मोलिना आणि रोव्हलँड यांच्या संशोधनानुसार सीएफसीच्या विघटनानंतर तयार झालेले क्लोरीन अणू ओझोन नष्ट करण्यासाठी चालू असलेल्या प्रक्रियेत उत्प्रेरक म्हणून काम करतात. या समस्येच्या काळजीने मारिओ मोलिना आणि एफ. शेरवुड (शेरी) रोवलँड यांनी या संशोधनाची माहिती वातावरणीय विज्ञान समुदायाला दिली. त्यासाठी ते बर्कलेला जाऊन प्राध्यापक हॅरोल्ड जॉनस्टन यांना भेटले. प्राध्यापक हॅरोल्ड जॉनस्टन यांच्या स्थिरावरणातील ओझोनच्या थरावर प्रस्तावित ध्वनिवेगातीत वाहतूक विमानातून सोडणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईड्सच्या परिणामाच्या संशोधनाविषयी मोलिना आणि एफ. शेरवुड रोवलँड यांना माहिती होती. नंतर त्यांनी पॉल क्रूटझेन यांच्याबरोबर नायट्रस ऑक्साईडमुळे होणाऱ्या ओझोन ऱ्हास या विषयावर संशोधन केले होते. वातावरणात सोडले जाणारे नायट्रोजनच्या ऑक्साईडच्या तुलनेत औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारे सीएफसीचे प्रमाण खूपच जास्त होते.

मारिओ मोलिना आणि एफ. शेरवुड रोवलँड यांचे संशोधन नेचर या मासिकात प्रसिद्ध झाले. समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि समाज सुद्धा या समस्येचे निवारण करण्यासाठी काही उपाय करेल, या विचाराने मारिओ मोलिना यांनी आपले संशोधन इतर संशोधक आणि प्रसार माध्यमांपर्यंतही पोहचवले. याचा परिणाम म्हणून सीएफसीच्या वापराचे नियम करण्यात आले तसेच ओझोन थराच्या संरक्षणासाठी क़ायदे करण्यात आले. त्यानंतरही त्यांचे संशोधन चालूच होते, अंटार्क्टिकामध्ये जाऊन, ध्रुवीय प्रदेशात झपाट्याने होणारा ओझोनच्या थराचा ऱ्हास त्यांनी अभ्यासला. मारिओ मोलिना यांना सुरुवातीला हा विषय फ़ार महत्त्वाचा वाटला नव्हता पण नंतर याचा जागतिक वातावरणाशी संबंध असल्याचे त्यांच्या लक्षात आले. एमआयटी संस्थेत जागतिक वातावरणीय रसायनशास्त्र समस्या या विषयाच्या संशोधनावर मोलिना यांनी लक्ष केंद्रित केले.

सन १९९५ मध्ये, ओझोन थर विरळ करण्यात सीएफसीची भूमिका या संशोधनासाठी मारिओ मोलिना यांना पॉल जे. क्रूटझन आणि एफ. शेरवुड रोवलँड यांच्यासह नोबेल पुरस्कार देण्यात आला. रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे मारिओ मोलिना हे मेक्सिकोत जन्मलेले पहिले शास्त्रज्ञ होते.

मोलिना यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, अर्विन, जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी ऑफ कॅलटेक आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या विविध ठिकाणी संशोधन व अध्यापन केले. अनेक विज्ञान संस्थांशी ते संलग्न होते. याशिवाय, मेक्सिको शहरात  मारिओ मोलिना सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज इन एनर्जी अँड एन्व्हायर्मेंट ही सामाजिक संस्था (एनजीओ) त्यांनी स्थापन केली.

अमेरिकन केमिकल सोसायटीचा एस्लेन पुरस्कार, अमेरिकन असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचा न्यूकॉम क्लेव्हलँड पुरस्कार, नासा असाधारण वैज्ञानिक कामगिरी पदक, पर्यावरणात, हेन्झ पुरस्कार, युएसचे राष्ट्रपती पदक अशा अनेक पुरस्कारांनी मारिओ मोलिना यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या नेतृत्वात, ते अमेरिकेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील सल्लागार समितीचे सदस्य होते.

मारिओ मोलिना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

संदर्भ :  

समीक्षक : श्रीनिवास केळकर