वॉडिंग्टन, कॉनरॅड हॅल: (८ नोव्हेंबर १९०५ – २६ सप्टेंबर १९७५) कॉनरॅड हॅल वॉडिंग्टन यांचा जन्म इंग्लंडमधील इव्हशॅम, वूर्सस्टशियर येथे झाला. त्यांच्या जन्मानंतर लवकरच त्यांचे वडील, कुटुंबासह, भारतात केरळमधील वायनाड जिल्ह्यात राहायला आले. वॉडिंग्टन चार वर्षाचे असताना त्यांना नातेवाइकांकडे शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले गेले. त्यांचे आई वडील मात्र भारतातच राहिले.
कॉनरॅडना बालपणी प्राण्यांची आवड होती. त्यांनी स्वतःचे एक खासगी प्राणीवस्तुसंग्रहालय तयार केले होते. त्यात जीवाश्म, प्राचीन प्राण्यांचे नमुने, चित्रे, विविध प्रकारचे खडक, आदिमानव आणि त्यांची हत्यारे अशा वस्तू ते जमवून त्यांचे पद्धतशीर जतन करत. अशा आवडीमुळे केंब्रिज विद्यापीठातून भूगर्भशास्त्र विषयात प्रथम वर्गासह पदवी मिळवता आली. वॉडिंग्टननी विद्यापीठ प्रवेश पूर्वपरीक्षेनंतर एरिक जॉन होमयार्ड या रसायनशास्त्राच्या अध्यापकानी दिलेली काही व्याख्याने ऐकली. होमयार्ड हे क्लिफ्टन महाविद्यालयात शिकवत. त्यांच्यामुळे वॉडिंग्टन फार प्रभावित झाले. विद्यार्थ्यांच्या हुशारीचा कस लावणारी विज्ञानाची ट्रायपॉस परीक्षा वॉडिंग्टननी दिली आणि परीक्षेच्या दुसऱ्या भागात भूगर्भशास्त्रात ते पहिले आले. वॉडिंग्टनना अर्नोल्ड गर्स्टन्बर्ग शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीचा हेतू विज्ञानाभिमुख विद्यार्थ्यांना नीती आणि तत्त्वज्ञान विषयांकडे वळविणे असा होता. वॉडिंग्टनना शिष्यवृत्तीचा फायदा झाला आणि ते विज्ञानाच्या जोडीला तत्त्वज्ञानही शिकत राहिले.
वॉडिंग्टनचे विश्वविद्यालयीन शिक्षण क्लिफ्टन आणि नंतर केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न अशा सिडनी ससेक्स कॉलेजात झाले. वॉडिंग्टननी आधी जीवाश्मशास्त्राचा अभ्यास केला. नंतर ते आनुवंशिकता शास्त्राकडे आणि सजीवांची वाढ याकडे वळले. त्यांनी आनुवंशिकतेचे आणि भ्रूणशास्त्राचे सखोल ज्ञान मिळवले. त्यातून जीवशास्त्राच्या अधिजनुकीय विज्ञान (epigenetics), विकासलक्षी उत्क्रांतिविषयक जीवशास्त्र (evolutionary developmental biology) आणि जैविक प्रणालींचे संगणकीय व गणितीय विश्लेषण करण्याच्या आधुनिक ज्ञानशाखांचा उगम झाला.
वॉडिंग्टननी चार शोध निबंध प्रकाशित केले. एक निबंध जीवाश्मीभूत माखलासारख्या मृदूकाय प्राण्यांच्या मापन पद्धतीवर होता. दुसऱ्यात मोहोरीसारख्या वनस्पतींच्या बीजांकुरणाचे, आनुवंशिकतेच्या दृष्टीने केलेल्या निरीक्षणाचे वर्णन होते. तिसऱ्यात पक्ष्यांच्या भ्रूणांवरील प्रयोगांची माहिती होती. जेबीएस हाल्डिन या विख्यात स्कॉटिश आनुवंशवैज्ञानिकाबरोबर प्रसिद्ध झाला होता.
वॉडिंग्टननी पीएच्.डी. साठी प्रबंध पूर्ण केला नाही पण त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी केंब्रिज विद्यापीठाने त्यांच्या प्रकाशित शोधनिबंधांची गुणवत्ता लक्षात घेऊन दिली. ते प्राणीशास्त्राचे अध्यापक आणि ख्राइस्ट चर्च कॉलेजमध्ये फेलो म्हणून राहिले. त्यांनी अधिजनुकीय विज्ञान ही संज्ञा उपयोगात आणली. अधिजनुकीय बदल ही संकल्पना त्यांच्या काळात भ्रूण वाढीशी संबंधित होती. मुख्यतः भ्रूणातील पूर्णक्षम (totipotent) पेशींशी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या ऊतीपेशी निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या पेशींशी आणि कालांतराने त्यांच्यापासून वेगवेगळी इंद्रिये विकसित होणे याच्याशी अधिजनुकीय ही संकल्पना निगडीत होती. सध्या जनुकीय रचना न बदलता डीएनएचे काम मंद वा बंद करणे, बदलणे अशी हल्ली अधिजनुकीय बदलाची व्याख्या झाली आहे. मेथिल रेणूंचा डीएनएशी किंवा गुणसूत्रातील हिस्टोन रेणूंचा ॲसिटील गटांशी संयोग होऊन डीएनएची व्यक्तता बदलते. परंतु जनुकांची उपस्थिती आणि व्यक्तता यांचे आंतरसंबंध दाखवण्याचा प्रयत्न वॉडिंग्टननी मांडलेली अधिजनुकीय संकल्पना स्पष्ट करते.
![](https://marathivishwakosh.org/wp-content/uploads/2022/07/Waddington-in-300x203.jpg?x35034)
वॉडिंग्टननी प्राणीभ्रूण पेशी आकार, स्वतःचे स्थान बदल आणि विशिष्ट आकार बदलून विशिष्ट कार्य करण्यायोग्य कशा बनतात हे स्पष्ट केले. त्यासाठी ते डोंगर दऱ्यांसारख्या भूभागातून घरंगळणाऱ्या गोलकांचे उदाहरण विचारात घेतात. त्यांच्या मते चित्रातील गोलक म्हणजे पेशी. उत्परिवर्तनांमुळे बदलत, विशिष्ट मार्ग स्वीकारत, ते गोलक खाली घसरतात, आणि म्हणजे पेशी वैशिष्ट्यीकरणाने विहित ऊतीपेशी बनतात. गोल, कोवळ्या पेशींचा समूह असणारा भ्रूण, हळूहळू विविध ऊती आणि इंद्रिये असणारा प्रगत पण आकाराने लहान जीव कालांतराने पूर्ण वाढलेला प्राणी बनतो. पेशींची वाढ आणि त्यांचे अंतिम रूप यामधील मार्गक्रमणाला आणि घळींना वॉडिंग्टन ‘क्रीओड’ अशी संज्ञा वापरतात. जीवांच्या जनुक प्ररूपात (genotypes) थोडा फरक असला तरी ते एकाच प्रकारचे दृश्य प्ररूप (phenotypes) धारण करतात. या निरीक्षणाला त्यांनी कनॅलायझेशन असे नाव दिले .
दुसऱ्या महायुद्धांनंतर वॉडिंग्टननी आनुवंशिकतेवर भरीव काम केले. एडिन्बर्ग येथील शेतकी संशोधन संस्थेच्या प्राणी संवर्धन आणि आनुवंशिकता विभागाचे मुख्य आनुवंशिकता शास्त्रज्ञ आणि उपसंचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. वॉडिंग्टननी या संस्थेत सर्व सदस्य एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे स्नेहभावाने राहतील अशी काळजी घेतली. वयाची पन्नाशी गाठेपर्यंत कठोर परिश्रम आणि शिस्त यांच्या जोरावर वॉडिंग्टननी युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठा आणि दर्जेदार आनुवंशिकता विभाग एडिन्बर्ग येथे विकसित केला.
वॉडिंग्टन यांची प्रतिभा केवळ विज्ञानापुरती मर्यादित नव्हती. ते कविता करत. एका कविताविषयक मासिकाचे संपादनही त्यांनी केले. वॉडिंग्टननी बिहाईंड ॲपिअरन्सेस या शीर्षकाचे नैसर्गिक विज्ञान आणि रंगचित्रे यांचा आंतरसंबंध दाखवणारे पुस्तकही लिहिले.
वॉडिंग्टननी आनुवंशिकता, प्राण्यांच्या भ्रूण वाढीमध्ये भ्रूण पेशीपासून इंद्रिय विकास (cell differentiation) कसा होतो याचा विचार केला होता. यासाठी त्यांनी अकरा पुस्तके लिहिली. पहिले पुस्तक होते, हाउ ॲनिमल्स डेव्हलप आणि शेवटचे न्यू पॅटर्न्स इन जेनेटिक्स अँड डेव्हलपमेंट. सैद्धांतिक जीवशास्त्रावरील नऊ पुस्तके त्यांनी स्वतंत्रपणे किंवा सहकाऱ्यांसोबत प्रकाशित केली. वॉडिंग्टननी संशोधनपर अनेक लेख नेचर, इव्होल्यूशन अशा अत्यंत प्रतिष्ठित जर्नल्समधून प्रकाशित केले. वॉडिंग्टननी एडिन्बर्ग विद्यापीठात मानवी पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासासाठी स्वतंत्र केंद्र स्थापले.
वॉडिंग्टन चांगले धावपटू आणि हौशी गिर्यारोहक होते. त्यांचे राजकीय विचार साम्यवादाकडे झुकणारे होते आणि द सायंटिफिक ॲटिट्युड या त्यांच्या पुस्तकात त्यांनी ते उघडपणे मांडले आहेत.
त्यांचा मृत्यू स्कॉटलंडमधील एडिन्बर्ग येथे झाला.
संदर्भ :
- https://www.encyclopedia.com/science/dictionaries-thesauruses-pictures-and-press-releases/waddington-conrad-hal
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4901045/
- https://www.nature.com/articles/nrg933?foxtrotcallback=true
- American Zoologist., 32:113-122 (1992) Waddington’s Legacy in Development and Evolution
समीक्षक : मोहन मद्वाण्णा