बहरिंग, एमिल ॲडॉल्फ व्हॉन : (१५ मार्च १८५४ – ३१ मार्च १९१७) एमिल ॲडॉल्फ व्हॉन बहरिंग यांचा जन्म प्रुशिया राज्यात (सध्या पोलंडचा भाग) हान्सडॉर्फ येथे झाला. बर्लिन येथील कैसर-विल्हेम अकादमी या सैनिकी वैद्यकीय अकादमीत त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. डॉक्टर झाल्यावर त्यांनी व्यवसाय करण्यासाठी लागणारी परवाना परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी पोलंड येथे विषारी जीवणूंचा संसर्ग होऊन त्यात पू झालेले असे जे रोग असतात अशा रोगांवर काम करायला सुरुवात केली. त्यांच्या कामाची क्षमता बघून त्यांना रॉबर्ट कॉख यांच्या सोबत काम करण्याची संधी प्राप्त झाली. प्रुशियन सैनिकी सेवेत त्यांना संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी डोळ्याचे रोग या विषयात कार्ल अर्न्स्ट श्वेगर आणि विल्हेम उथॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट मिळवली.

कीटासाटो शीबासाबूरो यांच्या सहकार्याने त्यांनी घटसर्प आणि धनुर्वात या रोगांसाठी ‘प्रतिविष’ (antitoxins) तयार केल्याचे संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध केले. त्यांनी घटसर्प आणि धनुर्वात यांचे विष गिनीपिग, बकरा तसेच घोडा यांच्यात टोचले. यामुळे या प्राण्यात प्रतिकारशक्ति निर्माण झाली. या प्रतिरक्षित प्राण्यांच्या रक्तद्रवापासून (serum) त्यांनी प्रतिविष वेगळे केले. त्या काळात या पद्धतीला सीरम थेरपी असे त्यांनी नाव दिले. शरीरात कायमस्वरूपी प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची ही पद्धत त्यांनी विकसित केली होती. असे प्रतिविष मानवाच्या शरीरात टोचण्याचा अयशस्वी प्रयोग त्यांनी प्रथम केला. या प्रतिविषाची मात्रा प्रमाणित करून मात्र हा प्रयोग त्यांनी भविष्यात यशस्वी केला. या यशाची पावती म्हणून एडिंबर्ग विद्यापीठाने नावीन्यपूर्ण उपचार पद्धतीसाठी कॅमरॉन परितोषिकाने त्यांना सन्मानित केले. त्यांना त्यांच्या घटसर्पावरील कार्यामुळे लहान मुलांचा तारणहार म्हणूनच संबोधले जाते. कारण त्या काळी घटसर्पामुळे फार मोठ्या प्रमाणात बालकांचे मृत्यू होत असत.

मरबर्ग विद्यापीठाच्या औषध विभागात स्वच्छता विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती कण्यात आली. याच ठिकाणी त्यांनी आयुष्यभर संशोधन केले. त्यांची आणि औषध शास्त्राचे हान्स हॉर्स्ट मेयर यांच्या प्रयोगशाळा एकाच इमारतीत होत्या. त्यामुळे बहरिंग यांनी मेयर यांना धनुर्वाताच्या विषावर संशोधन करायला उद्युक्त केले. १९०१ साली वैद्यक शास्त्राचे पहिले नोबेल परितोषिक त्यांना घटसर्पाच्या विरोधात शोधलेल्या सीरम थेरपी साठी देण्यात आले. १९०१ साली त्यांना प्रुशियन नोबिलिटी हा सन्मान बहाल करण्यात आला. तेव्हापासून त्यांचे आडनाव व्हॉन बहरिंग असे पडले.

आंतरराष्ट्रीय ट्युबरक्युलॉसिस परिषदेत त्यांनी असे जाहीर केले की, आपण क्षयाच्या जंतुपासून टीसी नावाचा असा एक पदार्थ शोधून काढला आहे की ज्यामुळे गुरांना क्षयापासून संरक्षण मिळते. याला त्यांनी  बोव्हीवॅक्सिन असे नाव दिले. या लशीपासून मानवाला मात्र क्षयापासून संरक्षण मिळू शकले नाही.

मरबर्ग येथील Wannkopfstraße च्या याच प्रयोगशाळेत १९१३ साली व्हॉन बहरिंग यांनी औषधोपचार पद्धती विकसित केली. सीमेन्स हेल्थलायनर्स, सीएलएस बेहरिंग. नोव्हार्टीस बहरिंग असे विविध औषधनिर्मिती कारखाने त्यांच्या कार्याची साक्ष देतात. मरबर्ग येथे त्यांनी पेअनवर्क (Behringwerke) या प्रतिविष आणि लस निर्माण करणार्‍या कंपनीची स्थापना केली.

त्यांना ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे परदेशस्थ मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले. जर्मनीमधील वैद्यक शास्त्रातील मरबर्ग विद्यापीठातर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे समजले जाणारे परितोषिक एमिल ॲडॉल्फ व्हॉन बहरिंग यांच्याच नावे दिले जाते. त्यांना मिळालेले नोबेल परितोषिक हे जिनेवा येथील आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रासेंट संग्रहालयात प्रदर्शित केलेले आहे.

मरबर्ग येथे त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : गजानन माळी