फ्लेक्सनर, सीमॉन : (२५ मार्च १८६३ – २ मे १९४६) सीमॉन फ्लेक्सनर यांचा जन्म लुईसव्हिले, केंटकी येथे झाला. फ्लेक्सनर त्यांनी आपली पहिली पदवी लुईसव्हिले औषधशास्त्र महाविद्यालयातून घेतली आणि आपला भाऊ जेकब याच्याबरोबर आठ वर्षे काम केले. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी रोगचिकित्साशास्त्रात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एम.डी. पदवी प्राप्त केली. तेथेच ते अधिव्याख्याता बनले. नंतर पेनसिलव्हेनिया विद्यापीठात ते रोगचिकित्साशास्त्राचे प्राध्यापक झाले. त्यांना रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेचे (सध्याचे रॉकफेलर विद्यापीठ) पहिले निदेशक म्हणून पाचारण करण्यात आले. या कलावधीत जॉन डी. रॉकफेलर या परोपकारी माणसाशी त्यांचे खूप जवळून संबंध आले. रॉकफेलर यांनी वैद्यकीय संशोधन आणि मूलभूत वैद्यकीय सुविधा यासाठी मुक्तहस्ते मदत केली. त्यांनी शिकागो विद्यापीठातील एका परिषदेत ‘Tendencies in Pathology’ या विषयावर संशोधनपर लेख सादर केला. त्यात त्यांनी म्हटले होते की भविष्यात आपल्याला शल्यकर्माद्वारे पर्यायी मानवी अवयव बसवता येतील. मूत्रपिंड, रक्तवाहिन्या, हृदय, पोट या अवयवांचे रोपण शक्य होईल. हे त्यांचे भाकीत २० व्या शतकाच्या उत्तरार्धातच सत्यात उतरल्याचे दिसून येते.
रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चमधील वास्तव्यात विषाणू आणि जीवाणू हे यजमान पेशीत नेमका प्रवेश कसा मिळवतात आणि रोगकारक कसे बनतात या विषयावर सीमॉन फ्लेक्सनर यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. मेंदूच्या वेष्टणाचा दाह, म्हणजेच मेनिंजायटिस या रोगावर उपचार पद्धतीची नियमावली निश्चित करण्याचे महत्त्वाचे संशोधनकार्य त्यांनी केले. जिवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारा रक्तद्रव हा रोग्याच्या मेंदूद्रवात आणि मज्जास्तंभात टोचण्याची रोगोपचार पद्धती त्यांनी विकसित केली. त्यांनी मेनिंजायटिस या रोगावर रक्तद्रव रोगोपचार पद्धती विकसित केली. अशाचप्रकारचे संशोधन त्यांनी पोलिओच्या संदर्भात केले. त्यांनी पोलिओ रोगाचा विषाणू माकडाच्या रक्तात टोचला. यातून जी माकडे रोगमुक्त राहिली त्यांच्या रक्तात विषाणूनाशक पदार्थ तयार झाल्याचे त्यांना आढळून आले. हे पदार्थ रोग्यातील पोलिओ विषाणूचा नायनाट करण्यासाठी सक्षम आहेत असेही त्यांना आढळून आले. माकडाच्या रक्तात निर्माण झालेले ते पदार्थ प्रतिपिंड या नावाने पुढे ओळखले गेले. पोलिओची लस निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल समजले जाते. त्या विषाणूचे स्वरूप जाणून घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला. या विषाणूचे अनेक गुणधर्म त्यांनी निश्चित केले. त्याच्या रोगप्रतिकारक क्षमतेचे परिणाम निश्चित केले. पोलिओचे रोगनिदान आणि रोगचिकित्सेची वैशिष्टे नोंदवली. पोलिओच्या अशा अनेक पैलूंवर त्यांनी संशोधन केले. आणि या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात या संबंधी रणनीती तयार केली. या कार्यात हिदेओ नोगुची आणि कोर्नेलियस ह्रोड्स ह्या दोन प्रयोगशाळा सहाय्यकांची फार महत्त्वपूर्ण भूमिका होती. हिदेओ नोगुची हे भविष्यात मेमोरियल हॉस्पिटलचे आणि कोर्नेलियस ह्रोड्स हे स्लोन केटेरिंग इंस्टिट्यूटचे संचालक झाले.
सीमॉन फ्लेक्सनर यांनी शिगेला या अतिसरास करणीभूत असलेल्या जिवाणूच्या पोटजातीतील एका प्रजातीचा शोध लावला. या प्रजातीला फ्लेक्सनर यांचे नाव देण्यात आले आहे. Shigella flexneri असे या प्रजातीचे नाव आहे. रेटीनोब्लास्टोमा या कर्करोगात Flexner-Winter steiner rosettes हा विशिष्ट गुणधर्म देखील त्यांच्या नावाने ओळखला जातो. सीमॉन फ्लेक्सनर यांची अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झाली. त्यांना एडिंबर्ग विद्यापीठाचे रोगोपचारशास्त्रातील कॅमरॉन परितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.
संदर्भ :
- https://rupress.org/jem/article/12/2/227/1897/EXPERIMENTAL-EPIDEMIC-POLIOMYELITIS-IN-MONKEYS
- http://www.nasonline.org/member-directory/deceased-members/html
- https://www.historyofvaccines.org/content/flexner-investigates-polio-immunity
- https://rupress.org/jem/article/31/2/123/8995/EXPERIMENTS-ON-THE-NASAL-ROUTE-OF-INFECTION-IN
समीक्षक : गजानन माळी