ग्रूबर, मॅक्स व्हॉन : (६ जुलै १८५३ – १६ सप्टेंबर १९२७) मॅक्स व्हॉन ग्रूबर यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. ग्रूबर यांनी औषधशास्त्रात व्हिएन्ना विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. नंतर त्यांनी मॅक्स व्हॉन व कार्ल व्हॉन वॉईट यांच्या मार्गदर्शनाखाली म्यूनिक येथे आणि लिप्झिग येथे कार्ल लुडविग यांच्या मार्गदर्शनाखाली रसायन आणि शरीरशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. हान्स अर्न्स्ट ऑगस्ट बुशनर यांनी ग्रूबर यांना जिवाणूशास्त्राचा अभ्यास करण्यास उद्युक्त केले. या सुमारास फर्डिनंड ज्युलिअस कोह्न आणि रॉबर्ट कॉख यांच्यासारखे दिग्गज जिवाणूशास्त्रज्ञ कार्यरत होते. ग्रूबर यांनी ओळखले की विविध प्रकारच्या जिवाणूंना वाढवण्यासाठी थोड्याशा फरकाने विविध प्रकारचे पोषणमाध्यम आवश्यक असते. हे त्यांना व्हिब्रिओ कॉलरी आणि इतर व्हिब्रिओज यांच्या तौलनिक अभ्यासावरून लक्षात आले.
ग्रुबर ऑस्ट्रियामधील ग्राझ विद्यापीठात स्वच्छता या विषयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी व्हिएन्ना विद्यापीठात प्राध्यापकी स्वीकारली. पुढे ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला ते कार्ल लँडस्टेनर हे त्यांचे प्रयोगशाळा सहाय्यक होते. प्रयोगशाळेतील सुविधा समाधानकारक नसून सुद्धा त्यांनी एलोईस लोडे आणि हरबर्ट एडवर्ड डरहॅम यांसारखे भविष्यातील नोबेल पुरस्कार विजेते विद्यार्थी निर्माण केले. २१ वर्षे, ते म्यूनिक येथे स्वच्छता संस्थेचे निदेशक म्हणून हान्स अर्न्स्ट ऑगस्ट बुशनर यांच्या जागेवर रुजू झाले. येथूनच ते वयाच्या सत्तराव्या वर्षी निवृत्त झाले.
व्हिएन्नामध्ये असतांना ग्रुबर यांनी त्यांचा इंग्रज विद्यार्थी हरबर्ट एडवर्ड डरहॅम याच्या सहकार्याने पेशींचे किंवा प्रथिनकणांचे प्रसमूहन किंवा एकत्रीकरण (Agglutination) होण्याच्या क्रियेचा शोध लावला आणि त्यांना आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त झाली. १८९६ साली जूनच्या महिन्यात ग्रुबर आणि डरहॅम यांनी ‘कणांचे प्रसमूहन’ या तंत्राचा शोध लावला. परंतु फ्रेंच वैद्य जॉर्जेस फर्नांड विडाल याने टायफॉइडच्या रोगनिदानासाठी जेव्हा कणांच्या प्रसमूहन तंत्राचा वापर केला तेव्हा सर्वप्रथम या शोधाचे प्रयोगिक महत्त्व सिद्ध झाले. जॉर्जेस फर्नांड विडाल याला असे आढळून आले की टायफॉइड झालेल्या रोग्याचा रक्तद्रव हा जर टायफॉइडच्या रोगजंतूंमध्ये मिसळला तर टायफॉइडचे जिवाणू आणि रोग्याच्या रक्तद्रावतील प्रतिपिंडे यांचे प्रसमूहन होऊन कण रूपात ते द्रावणात तरंगू लागतात. टायफॉइड न झालेल्या रोग्याचा रक्तद्रव मात्र कणांचे प्रसमूहन दाखवीत नाही. पुढे कार्ल लँडस्टेनर यांनी हेच तंत्र वापरुन रक्तगटांचे वर्गीकरण केले आणि रक्तदान शास्त्रात क्रांती झाली.
म्यूनिक मेडिकल विकली या संशोधन पत्रिकेत ग्रुबर आणि डरहॅम यांचा विज्ञानाला कलाटणी देणारा शोध निबंध प्रसिद्ध झाला. रक्तद्रवात सारख्याच आकाराचे जिवाणू प्रसमूहित होतात. हे वेगवेगळ्या रक्तद्रवात वेगवेगळ्या प्रकारे घडते. टायफॉइड रोगकारक जिवाणू सालमोनेला टायफी आणि कॉलरा रोगकारक जीवाणू व्हिब्रिओ कॉलरी यांचे प्रसमूहन अनुक्रमे टायफॉइड रोग्याचा रक्तद्रव आणि कॉलरा रोग्याचा रक्तद्रव यांच्याशीच घडते’ हे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण त्यांनी या शोधनिबंधात मांडले होते. याची विस्तृत स्वरूपाची व्यावहारिक उपयोजिता लवकरच रक्तद्रवशास्त्र, रोगप्रतिकारक्षमताशास्त्र, रोगनिदानशास्त्र, जिवाणूशास्त्र अशा विविध विज्ञान शाखांत दिसून आली. सर्वप्रथम या शोधाचे प्रयोगिक महत्त्व सिद्ध झाले ते टायफॉइडच्या रोगनिदानासाठी. या ऐतिहासिक तंत्राला ग्रुबर–विडाल चाचणी म्हणून शास्त्रज्ञ जगभर ओळखू लागले.
अशा या शास्त्रज्ञाची नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर याच्याशी प्रत्यक्ष भेट झाली होती.
या व्यतिरिक्त ग्रुबर यांनी स्वच्छता या विषयावर Handbuch der Hygiene नावाचे पुस्तक लिहिले. त्यांना १९२१ सालचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी कार्ल लँडस्टेनर आणि मॅक्स रुबनर यांच्या सोबत विभागून मिळाला.
मॅक्स व्हॉन ग्रूबर यांचा जर्मनीत मृत्यू झाला.
संदर्भ :
- https://www.encyclopedia.com/people/medicine/microbiology-biographies/max-von-gruber
- https://www.wikidata.org/wiki/Q85476
समीक्षक : मुकुंद बोधनकर