रेईफा, हॉवर्ड : (२४ जानेवारी १९२४ – ८ जुलै २०१६) दुसऱ्या महायुद्धात वायुदलात नोकरी केल्यानंतर रेईफा यांनी गणितामध्ये पदवी प्राप्त केली. संख्याशास्त्रात द्वीपदवी घेतल्यावर मिशिगन विद्यापीठातून त्यांनी ए. एच. कोपलँड यांच्या मार्गदर्शनाखाली गणितात विद्यावाचस्पती पदवी मिळवली. रेईफा कोलंबिया विद्यापीठात गणिती-संख्याशास्त्र विभागात आणि नंतर हार्वर्ड विद्यापीठात व्यवस्थापकीय अर्थशास्त्राचे फ्रँक पी. रॅमसे प्राध्यापक होते, तसेच हार्वर्ड विद्यापीठातील व्यवसाय शिक्षणसंस्था आणि शासनप्रणाली अध्यायनाची केनेडी शिक्षणसंस्था यांच्या संयुक्त अध्यासनांचे मानकरी होते.
उपयोजित गणितज्ञ व संख्याशास्त्रज्ञ अशा रेईफा यांनी निर्णय विश्लेषण प्रक्रियेत अनिश्चितता आणि चुरस यांचा विचार करून त्या प्रक्रियेचा लक्षणीय विकास केला. बेजीय (Bayesian) निर्णय सिद्धांताचा व्यावसायिक प्रश्न सोडविण्यासाठी रेईफांनी केलेला उपयोग हे त्यांचे कळीचे योगदान मानले जाते. त्या संदर्भात फलाकडे पहाण्याचा निर्णयकाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन त्यांनी त्याला उपयोगिता संधि फल (utility function) असे अंकीय स्वरूप दिले. तसेच अनिश्चिततेत घेतले जाणारे निर्णय ह्याला रेईफा यांनी व्यक्तिनिष्ठ संभाव्यता वितरण अशा अंकीय स्वरूपात व्यक्त केले. अनिश्चिततेत गुंतलेला कठीण व महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी रेईफा यांनी अनुभवपूर्व (priory) संभाव्यता व अनुभवोत्तर (posterior) संभाव्यता यावर आधारित व्यवहार्य (viable) अशी पद्धतशीर रीत मांडली. त्यांनी असे प्रतिपादित केले की व्यक्तिनिष्ठ संभाव्यतेनेदेखील निरपेक्ष वारंवारितावर आधारलेल्या संभाव्यतेचे गुणधर्म पाळले पाहिजेत. निर्णय विश्लेषण या नवीन ज्ञानशाखेची पायाभरणी करण्याचे श्रेय रेईफांना दिले जाते.
रेईफा यांनी बेजीय निर्णय सिद्धांत पद्धत वापरुन अमेरिकेच्या नौदलातील शास्त्रज्ञांना, स्पेनमधील पालोमरेजजवळ बी-५२ या समुद्रात कोसळलेल्या अमेरिकेच्या विमानातून गहाळ झालेला हायड्रोजन बॉम्ब शोधण्यात मदत केली. हीच पद्धत पुढे कॅवेन यांनी अमेरिकेच्या नौदलाची स्कॉरपियन ही हरवलेली पाणबुडी शोधण्यासाठी वापरली.
स्वत:च्या विश्लेषक व समस्या सोडविण्याच्या क्षमतेचा वापर करून पूर्व-पश्चिम तज्ञ मंडळ निर्माण करून शीतयुद्धातील तणाव कमी करण्यात रेईफा यांनी पुढाकार घेतला. त्या संदर्भात आंतरराष्ट्रीय उपयोजित प्रणाली विश्लेषण संस्था (International Institute for Applied Systems Analysis) स्थापनेत रेईफांनी मोलाची मदत केली. ही संस्था ऑस्ट्रिया देशात व्हिएन्ना जवळील लायझेनबर्ग येथे स्थापन झाली. या संस्थेचे पहिले संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. या संस्थेला आता अनेक वैज्ञानिक संस्थांनी प्रायोजित केले असून संस्था पर्यावरण, तंत्रज्ञान आणि प्रगत संशोधनामध्ये समन्वय साधण्याचे उपयुक्त कार्य करीत आहे.
रेईफा यांची स्वतंत्र व सहलिखित अशी विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यात द्यूत सिद्धांतातील मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारे Games and Decisions: Introduction and Critical Survey हे त्यांचे पुस्तक अनिश्चिततेचा विचार करून निर्णय प्रक्रियेचा पाया घालणारे अभिजात पुस्तक म्हणून ओळखले जाते. त्याशिवाय Applied Statistical Decision Theory; The Art and Science of Negotiation: How to Resolve Conflicts and Get the Best Out of Bargaining; Decision Analysis: Introductory Lectures on Choices Under Uncertainty, Smart Choices: A Practical Guide to Making Better Decisions ही गाजलेली पुस्तके आहेत. विशेष म्हणजे राल्फ किनी यांच्यासह लिहिलेल्या Decisions with Multiple Objectives: Preferences and Value Trade offs या पुस्तकासाठी अतिशय मानाचे फ्रेडरिक डब्ल्यू. लँकेस्टर पुरस्काराने रेईफा यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय द्यूत सिद्धांतात भर घालणारी पद्धत, निर्णय प्रक्रिया, द्यूत व निर्णय, वाटाघाटी विश्लेषण अशा विविध विषयांवर ख्यातनाम जर्नल्समध्ये त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले.
हार्वर्ड, कारनेजी मेलन आणि मिशिगन विद्यापीठ, नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठ आणि नेगेवस्थित बेन गुरीयन विद्यापीठाने रेईफा यांना मानद पदव्या प्रदान केल्या. रेईफा यांच्या संशोधनकार्य तसेच निर्णय विश्लेषण या विषयातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले. त्यात अमेरिकन कला व विज्ञान अकादमी तसेच राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीचे निर्वाचित सदस्य, The International Federation of Operational Research Societies’ Operational Research Hall of Fame हे होते.
संदर्भ :
- hbs.edu/news/relesed/Pages/howard-raiffa
- nytimes.com/2016/07/14/business/howard
- pon.havard.edu/daily/teaching-negotiation
- iiasa.ac.at/web/home…/InMemoriam/160720hraiffa.html
समीक्षक : विवेक पाटकर