रोज, नोएल : (३ डिसेंबर १९२७ – ३० जुलै २०२०) नोएल रिचर्ड रोज यांचा जन्म अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यात स्टॅम्फर्ड या गावात झाला नोएल रोज यांची एकूणच शैक्षणिक कारकिर्द रोमहर्षक होती. त्यांना वैद्यकासंबंधित विषयांचा अभ्यास करण्याची उर्मी निर्माण झाली. येल विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचा अभ्यास करतांना त्यांना प्राणीशास्त्र विषयात रस निर्माण होऊन त्यांनी त्यात एम. एस्सी. केले व ते पुन्हा वनस्पतीशास्त्रांतर्गत सूक्ष्मजीवशास्त्र विषयाकडे वळले. त्या काळात, सूक्ष्मजीवांचा अभ्यास वनस्पतीशास्त्रज्ञ शिकवीत असत. यानंतर, वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाचा विचार मनात बळावत असता, पुन्हा मूळ स्वभावधर्मास अनुसरून ते पेनसिल्व्हानिया विद्यापीठात हॅरी मॉर्गन या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेत पीएच्.डी. करण्यासाठी रूजू झाले. तेथे ते कित्येक वर्षे ट्रिपोनेमा पॅलीडम या सिफिलीस रोगास कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजीवाणूचा अभ्यास करत होते. सरतेशेवटी ते परत बफेलो विद्यापीठ (आताची न्यूयॉर्क येथील स्टेट युनिव्हर्सिटी) या विद्यापीठात वैद्यकशास्त्र विषयाच्या शिक्षणाकरितां रूजू झाले. तेथे त्यांना मूळ जर्मन वंशाचे मानवी रोगप्रतिकारशक्ती शास्त्रातील व मानवी रक्तगट या विषयावरील तज्ञ अर्नेस्ट विटेबस्की हे गुरू लाभले.

अर्नेस्ट विटेबस्की यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असतांना, अर्नेस्ट विटेबस्की यांच्याच गुरूपरंपरेतील आद्य संशोधक पॉल अर्लिच यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार, वैद्यकशास्त्रात सन १९०० च्या मध्यापासून एक अशी संकल्पना होती की मानवी शरीरातील प्रथिनांच्या विरोधात स्वयंप्रतिरोधके निर्माण करण्याची प्रक्रिया शरीरातील पेशी करू शकत नाहीत. सशांच्या थायरॉईड ग्रंथींवर केलेल्या अनेक प्रयोगांनंतर सशांच्या थायरॉईडवर दुष्परिणाम होणे आणि / किंवा या ग्रंथी नाश पावणे या प्रक्रिया घडतात अशा ठोस निष्कर्षांच्या आधारे या संकल्पनेला छेद देण्याचा यशस्वी प्रयत्न अर्नेस्ट विटेबस्की व नोएल रोज यांनी केला. तथापि, समकालिन संशोधकांच्या पुनर्निरीक्षण अहवालातील प्रतिकूलतेमुळे या संशोधनास मान्यता मिळू शकली नाही. परंतु, यामुळे नाउमेद न होता, नोएल रोज यांनी उलट ठोकताळा पद्धतीने मानवी संशोधन सुरू केले. सशांवरील मूळ संशोधनात थायरॉईड ग्रंथीवरील परिणाम शोधण्याऐवजी, या ग्रंथीचे आजार असलेल्या रूग्णांच्या विविध चाचण्या त्यांनी केल्या व त्या आधाराने, सुयोग्य तार्किक विवेचनांच्या आधारे थायरॉईड ग्रंथीचा हाशिमोटोज थायरॉडायटिस या आजाराचे निश्चित कारण माहीत नसलेला मानवी थायरॉईड ग्रंथीचा रोग मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तिविरूद्ध तयार होणाऱ्या स्वयंप्रतिरोधक शक्तिमुळे होतो. याप्रमाणे, ऑटो-इम्युनिटी म्हणजे स्वयंप्रतिरोध रोग ही केवळ संकल्पना नसून हा रोगसमूह प्रत्यक्ष अस्तित्वात असल्याचे त्यांनी निर्विवादपणे सिद्ध केले.

संशोधन कार्य अविरत सुरू असतांनाच, त्यांनी एम.डी. पदवी मिळाल्यानंतरही, बफेलो विद्यापीठात आपल्या संशोधनाची व्याप्ति वाढवून, मानवी जनुकावलीतील सहाव्या गुणसूत्रावर अस्तित्वात असलेल्या एच.एल.ए. (हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी ल्युकोसायटिक अँटीजेन) या जनुकीय घटकाशी ही स्वयंप्रतिरोध आजाराची प्राथमिक जनुके निगडीत आहेत, हे देखील त्यांनी निर्विवाद सिद्ध केले.

नोएल रोज यांच्या अध्यापनाची, संशोधनाची व अभ्यासाची व्याप्ती मानवीवंशशास्त्र, वांशिक व अनुवांशिक रोग आणि आजार, आण्विक जीवशास्त्र, जनुके व पर्यावरणाचा रोग प्रादुर्भावाशी अन्योन्य संबंध हृदयाचे-विशेषत: विषाणू किंवा जीवाणूंमुळे होणारे आजार व स्वयंप्रतिरोध शक्तिमुळे उद्भवणारे मानवी विकार अशी बहुविध आयामांनी युक्त होती. त्यांचे स्वयंप्रतिरोध शक्तिबाबतचे हे मूलभूत तसेच समाजोपयोगी संशोधन आहे.

नोएल रोज, अमेरिकेच्या मिशीगन राज्यातील डेट्रॉईट येथे वेन स्टेट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडीसीन या संस्थेत कार्यरत होते. तेथे रोगप्रतिकारकशक्तिशास्त्र या विभागाची स्थापना करून या विभागाची व्याप्ती श्रॄंखलापद्धतिने प्रसारित करून पुढे ते जॉन हॉपकिन्स विद्यापीठ या जगमान्य संस्थेत रूजू झाले. या संस्थेत त्यांना अध्यासनाने विभूषित करून सन्मानित करण्यात आले. (हे अध्यासन व संस्था आता डब्ल्यू हॅरी फेन्स्टन आण्विक जीवशास्त्र व रोगप्रतिकारकशक्तिशास्त्र विभाग या नांवाने ओळखले जाते).

नोएल रोज जॉन हॉपकिन्स वैद्यकीय विद्यालयाच्या शरीर विकॄतिशास्त्र (पॅथॉलॉजी) विभागात काही काळ कार्यरत होते. याच जॉन हॉपकिन्स विद्यापीठात त्यांचा जॉन हॉपकिन्स स्वयंप्रतिरोधक विकार संशोधन केंद्र या संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून गौरव करण्यात आला.

जैव-वैज्ञानिक व वैद्यकीय संशोधनाकरीता सतत व अखंडपणे ६० वर्षांपेक्षा जास्त काळ विविध अमेरीकन आरोग्य संस्थाकडून अनुदान मिळत राहण्याचा विक्रम नोएल रोज यांच्या नांवावर आहे. नोएल रोज यांनी ८८० पेक्षा जास्त शोधनिबंध आणि सूक्ष्मजीवशास्त्र तसेच इतर वैद्यकीय विषयांवर विविध पुस्तकांतून लिखाण केले. ८० पेक्षा जास्त स्वयंप्रतिरोधक विकारांवर संशोधन केले.

मानवी हृदयाच्या स्नायूंचा विषाणू किंवा जीवाणूंमुळे होणारा दाह या विषयावरील त्यांचे मूलभूत संशोधन अनेक वैद्यकतज्ज्ञ व संशोधकांसाठी मोलाचे व दिशादर्शक ठरले आहे. या विषयावर ते अखेरपर्यंत संशोधनमग्न होते.

वयाच्या ८७ व्या वर्षी असतांना अमेरिकेतच ब्रिगहॅम येथे पत्नीसह स्थलांतरीत होऊन तेथील शरीरविकॄतिशास्त्र विभागात व मॅसेच्युसेट्स राज्यातील बोस्टन येथील स्त्रियांच्या रुग्णालयात निवॄत्तिउपरांत सेवा पत्करली. तेथे कार्यरत असतांना हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या माध्यमातून ते अर्धवेळ वैद्यकीय अध्यापक (व्याख्याता), सल्लागार व संशोधन विषयक सेमिनार्स अशा कामांत मग्न असत. पुढे त्यांना प्रोफेसर एमेरिटस हा सन्मान प्रदान करण्यात आला.

नोएल रोज यांना मिळालेले विविध सन्मान असे, प्रोफेसर एमेरिटस, जॉन हॉपकिन्स विद्यापीठ. अमेरिकन असोसिएशन ऑफ अड्वान्समेंट ऑफ सायन्स यांच्यातर्फे गोल्डन गूज पारितोषिक, स्वयंप्रतिरोधक विकार प्रतिबंधक समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष, जॉन हॉपकिन्स स्वयंप्रतिरोधक रोग संशोधन विभागाचे संस्थापक निर्देशक, पोलिश विज्ञान अकादमीचे निकोलस कोपर्निकस पदक, की-स्टोन जीवन गौरव पुरस्कार इ.

नोएल रोज यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वॄद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ :

  • Noel Rose, Who Demonstrated Autoimmunity Exists, Dies at 92. Amanda Heidt Johns Hopkins Bloomberg School of Public Health. Aug 10, 2020.
  • Noel Richard Rose. Geoff Watts. www.thelancet.com Vol. 396
  • What I’ve learned : Noel Rose – Pathologist and father of Immunology. Interview by Greg Rienzi. JOHN  HOPKINS  UNIVERSITY   JULY-AUG.2014.
  • In Memoriam. Noel R. Rose 1927 – 2020. From Dean MacKenzie.
  • the-scientiest.com   

समीक्षक : शेखर राजदेरकर