सिडनहॅम, थॉमस : (१० सप्टेंबर १६२४ – २९ डिसेंबर १६८९) थॉमस सिडनहॅम यांचा जन्म डॉर्सेट येथे झाला. ऑक्सफोर्ड येथील मॅगडालेन हॉल येथे त्यांनी शालेय शिक्षण घेतले. नंतर त्यांनी ऑक्सफोर्ड येथील ऑल सोल्स कॉलेज एम.बी. ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यांना या महाविद्यालयाचे सदस्यत्वदेखील प्राप्त झाले. मात्र काही वर्षातच त्यांनी या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुढे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना मिळवण्यासाठी कॉलेज ऑफ फिजिशियन्सची परीक्षा उत्तीर्ण केली आणि वेस्टमिंस्टर येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यांनी केंब्रिज येथील पेमब्रोक हॉल येथून एम.डी. पदवी प्राप्त केली. नंतर ते सैनिकी सेवेत रुजू झाले.
त्यांनी लिहिलेल्या पहिल्या पुस्तकाचे नाव होते, ‘ताप बरा करण्याची पद्धत’ (Methodus curandi febres). दहा वर्षातच या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या. त्यात प्लेग या रोगाविषयी स्वतंत्र प्रकरण होते. नंतर त्यांनी रोगप्रसार आणि गुप्त रोग या दोन विषयांवर दोन पुस्तके लिहिली. पुढे त्यांनी देवी आणि हिस्टेरिया या रोगांच्या उपचारपद्धतीवर प्रबंध लिहिला. काही वर्षांनी त्यांनी घाव किंवा जखम भरून येण्याची नैसर्गिक पद्धत यावर पुस्तक लिहिले. ऑब्झर्वेशन मेडिका हे त्यांचे पुस्तक पुढील दोन दशके वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी प्रमाणभूत पुस्तक मानले जात होते. यात प्रामुख्याने वैद्यक चिकित्सा आणि रोगपरिस्थितीविज्ञान याचा विस्ताराने आढावा घेतलेला आहे. रोग्याची निरीक्षणे अचूक पद्धतीने कशी नोंदवायची याचा देखील खोलात जाऊन यात विचार केला आहे. त्यांनी ‘सिडनहॅम कोरेआ’ या रोगाचा शोध लावला. याच रोगाला सेंट व्हिटस डान्स म्हणून देखील ओळखतात. त्यांनी रोगांचे वर्गीकरण करण्याची स्वतःची पद्धत (Nosological method) शोधून काढली होती. स्कार्लेट ताप, गोवर, देवी, एपीलेप्सी, रिकेट्स, स्कर्वी, कोरेआ अशा अनेक रोगांवर त्यांनी लिखाण केले.
त्यांना इंग्लिश वैद्यकशास्त्राचा पितामह मानले जाते. देवी या रोगासाठी त्यांनी टिंचर ऑफ ओपियमचा वापर केला. शरीरात लोह या धातूची कमतरता असलेल्या ॲनिमियाच्या रोग्यावर त्यांनी लोह उपचार केले. मलेरियाच्या इलाजासाठी त्यांनी सिंकोना झाडाची साल वापरली. त्यांचे समकालीन रिचर्ड मॉर्टन आणि थॉमस ब्राऊन यांनी थॉमस सिडनहॅम यांची पुस्तके वाचून ती उपचारपद्धती वापरल्याचे पुरावे मिळतात.
त्यांनी हुपिंग कफ या रोगला पर्ट्युसिस असे नाव दिले. याचा अर्थ तीव्र स्वरूपाचा खोकला. त्यांनी पर्ट्युसिस या रोगाची शरीरशास्त्रीय किंवा सूक्ष्मदर्शकाखाली चिकित्सा कधीच केली नाही.
सिडनहॅम यांचा लंडन येथे मृत्यू झाला.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Thomas-Sydenham
- https://www.slideshare.net/nabaalwazen/thomas-sydenham
समीक्षक : मुकुंद बोधनकर