यूरोपियन मॉलेक्युलर बायॉलॉजी लॅबोरेटरी-यूरोपियन बायॉलॉजी इंस्टिट्यूट : (स्थापना – १९७४) यूरोपियन बायोइन्फॉर्माटिक्स इन्स्टिट्यूट ईएमबीएल-ईबीआय (EMBL-EBI) ही आंतरराष्ट्रीय शासकीय संस्था असून यूरोपियन मॉलेक्युलर बायॉलॉजी लॅबोरेटरीच्या कुटुंब संस्थेचा एक भाग आहे. या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट बायो-इन्फर्माटिक्समधील संशोधन व सेवा पुरवणे हे आहे. ही संस्था ब्रिटनमधील केंब्रिज जवळ असलेल्या हिंक्स्ट्न येथील वेलकम जिनोम कॅम्पसमध्ये असून इतर पाच ठिकाणाहूनही या संस्थेचे कार्य चालते. संस्था नॅशनल डाटा सेंटर सायंटिफिक अ‍ॅडव्हायजरी बोर्डाची सदस्य आहे. बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स या चीनच्या आंतरराष्ट्रीय संशोधन जाळ्यामधील बिग डाटा सेंटरबरोबर ही संस्था जोडलेली आहे.

या दोन्ही संयुक्त संस्थांचे उद्दीष्ट वैज्ञानिकांना जैवविज्ञानातील बिग डाटा मानव जातीच्या उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे हा आहे. सेवा आणि साधने या दोन्ही प्रकारे मूलभूत संशोधन करणे आणि व्यावसायिक जैवमाहिती तंत्रज्ञानातील प्रशिक्षण देणे यासाठी संस्था कटिबद्ध आहे. यूरोपियन मॉलेक्युलर बायॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये (ईएमबीएल) आंतरराष्ट्रीय नाविन्यपूर्ण जैवविज्ञानातील आंतरशाखीय संशोधन चालते. या संस्थेसाठी आवश्यक निधी वीस सभासद देश, दोन संलग्न सभासद आणि दोन इच्छूक सभासद देशामधून गोळा होतो. ईएमबीएलचे मुख्य कार्यालय जर्मनीतील हायडेलबर्ग येथे असून एक शाखा हिंक्स्टन-केंब्रिज (यूके) येथे आहे. आणखी चार शाखा अनुक्रमे फ्रांसच्या ग्रेनोबल, इटलीच्या रोम, स्पेनच्या बार्सीलोना आणि जर्मनीच्या हॅंबर्ग येथे आहेत.

रेण्वीय विदा (डाटा) उपलब्ध करून देणारी ही जगातील एक खात्रीलायक संस्था आहे. त्यांच्या सहकार्याच्या सहाय्याने विदा विश्लेषणासाठी साधने तयार करण्यामुळे संशोधकांना किचकट शोध व विश्लेषण वेगळ्या पद्धतीने करता येऊ लागले. जैवविज्ञानाच्या सर्व शाखेमध्ये संशोधन करणारे लक्षावधी संशोधक, संगणकतज्ञ, जैवऔषधीविज्ञानापासून जैवविविधता आणि कृषि वैज्ञानिक या माहितीवरून आपले प्रयोग पडताळून पहातात. माहिती मिळवण्यासाठी कोठलेही शुल्क आकारले जात नाही.

ईएमबीएल यांचा औद्योगिक प्रकल्प ईएमबीएल-ईबीआय आणि उद्योगाच्या संशोधन आणि विकास यांच्या सहकार्याने उभा राहिला आहे. हे सर्व उद्योग औषध आणि कृषिसंशोधन सहकारी आहेत. जैवमाहितीविज्ञान, सेवाविकास आणि विदा यामधून स्पर्धात्मक प्रयोग निवडले जातात. मध्यम आकाराच्या उद्योगांना प्रत्यक्ष मदत करणे व संयुक्त प्रकल्पांना मदत करणे हे सुद्धा ईएमबीएल करते. ईएमबीएलचा एकमेवाद्वितीय संशोधन प्रकल्प म्हणून असलेली बाब म्हणजे नवा विदास्त्रोत तयार करणे. वैयक्तिक जिनोमिक्समध्ये वैद्यक आणि औषधनिर्मितीसाठी एमआरएनए भाषांतर उपलब्ध केल्याने औषधनिर्मिती आणि पर्यावरणविषयक संशोधनास मदत झाली आहे. याचे सध्याचे उदाहरण म्हणजे कोव्हीडसाठी बनवलेली एमआरआरएनए आधारित लस (व्हॅक्सीन). कोरोना स्पाइक प्रथिन बनवणारे एमआरएनएचे रेणू एका सूक्ष्म मेद पुटिकेवाटे शरीरात अंतक्षेपित केले जातात. पुटिका आणि स्पाईक प्रथिन एमआरएनए लसिका पेशीमध्ये पोहोचल्यावर एमआरएनए बरहुकूम स्पाईक प्रथिन रायबोसोममध्ये निर्माण होते. या स्पाईक प्रथिनाच्या मात्रेमुळे (डोस) लसिकापेशी त्याविरुद्ध प्रतिद्रव्य (अ‍ॅन्टिबॉडी) तयार करतात. ईएमबीएल-ईबीआय ही संस्था यूरोपमधील विकसित संशोधन संस्थेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करते. याचे उदाहरण म्हणजे इलीक्झिर (ELIXIR) नावाची आज्ञावली. जैवविज्ञान विषयक माहिती या आज्ञावलीतून लिहिता येते.

पीएच्.डी.नंतरचे शिक्षण म्हणजे पोस्ट डॉकसाठी पुढील पिढ्याना संगणकावर आधारित जैवतंत्रज्ञ मिळावेत यासाठी आंतरराष्ट्रीय पीएच्.डी. कार्यक्रम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प संस्थेने चालू केला आहे.

ब्रिटनमधील वेलकम जिनोम परिसरातील ईएमबीएल-ईबीआय हा तांत्रिक व वैज्ञानिक मोठ्या संख्येने एकत्र आलेला जगातील सर्वात मोठा परिसर आहे. यूरोपियन मॉलेक्युलर बायॉलॉजीचा हा फक्त एक भाग असून संगणकीय संशोधन करण्यासाठी पाच वेगळ्या इमारती येथे राखून ठेवल्या आहेत. ईएमबीएलमधील संशोधक जगातील वैज्ञानिक नियतकालिकामध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करतात. त्यातील चाळीस टक्के शोधनिबंध जैवरसायनविज्ञान, आनुवंश विज्ञान आणि रेण्वीय जैवविज्ञान विभागातील असतात.

औद्योगिक सहकार्य – जागतिक पातळीवरील फार्मा म्हणजे औषधी उद्योग आपल्या अडचणीसाठी ईएमबीएलची निवड करतात. त्यांच्या अडचणीवर संशोधन व उपाय यामधून संस्थेस पैसा उभा करता येतो. एकट्या उद्योगाने संशोधन व विकास करण्याऐवजी संयुक्त प्रकल्प घेउन संशोधन करण्यामुळे वेळ व मनुष्य बळ यांची बचत होते. एकूण संशोधकापैकी वीस टक्के संशोधक औद्योगिक संशोधनासाठी उपलब्ध असतात. यांची संख्या गरजेप्रमाणे वाढवता येते. सध्या औषधी (फार्मा), कृषि संशोधन, अन्न, आरोग्य आणि पोषण यावर आधारीत अशा वीस कंपन्या ईएमबीएलचे सभासद सदस्य आहेत.

ईएमबीएल सायन्स आणि सोसायटी नावाचा एक सक्रिय कार्यक्रम राबविते. या कार्यक्रमातून जे तरुण वैज्ञानिक आहेत त्यांच्या संशोधनविषयक शंकांचे निरसन केले जाते. त्याचवेळी सामान्य नागरिकांना संशोधनातून जे निष्कर्ष प्राप्त होतात त्याविषयी माहिती करून दिली जाते. जेणेकरून सामान्य माणसात विज्ञान व संशोधनाबद्दल रूची निर्माण होईल.

संदर्भ :  

समीक्षक : किशोर कुलकर्णी