ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्ञान व अनुभवांचे संपादन केले जाते आणि सुयोग्य वर्तन, विविध कौशल्ये, अभिवृत्ती व मूल्ये यांचा विकास साधला जातो, त्या प्रक्रियेस अध्ययन असे म्हणतात. या प्रक्रियेला शिक्षण क्षेत्रात व व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. अध्ययन ही मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. तसेच ती निरंतरपणे किंवा आजन्म चालणारी प्रक्रिया असून त्यात व्यक्तीच्या वर्तनात बदल होणे अपेक्षित असते. एखाद्या गोष्टीचे आकलन झाल्यानंतर किंवा वर्गातील अध्यापनातील अनुभवातून व्यक्तीच्या वर्तनात कायमस्वरूपी बदल होणे म्हणजे अध्ययन. तसेच एखाद्या प्रसंगातूनही (वाईट किंवा चांगले) व्यक्तीला अध्ययन होऊ शकते. अध्ययन ही जीवनाभिमुख प्रक्रिया आहे. मानव जातीच्या जीवनात सतत परिवर्तन होत असून त्यात अध्ययनाचा मोठा वाटा असतो. अध्ययनात व्यक्तीच्या गरजाही फार महत्त्वाची भूमिका बजावितात. गरज निर्माण झाली की, अवधानाचे केद्रीकरण होते आणि व्यक्ती आपल्याला आवश्यक असलेली घटना, गोष्टी, माहिती यांचे अर्थ जाणून घेऊन आपल्या वर्तनात सुधारणा करते. थोडक्यात, अध्ययन म्हणजे व्यक्ती विकास, प्रगती, वर्तनात सुधारणा आणि हे सर्व घडण्यासाठी ध्येय निश्चित असणे होय.

अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप :

 • ध्येय : व्यक्ती जेव्हा विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जीवन जगतो, तेव्हा त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ध्येय नसेल, तर त्याचे जीवन हे निरर्थक असते. अध्ययनाची प्रक्रिया घडताना ध्येय समोर असणे आवश्यक असते. ध्येय समोर असले की, अध्ययन प्रक्रिया सकारात्मक पद्धतीने घडून येते. त्यामुळे अध्ययन ही ध्येयानुवर्ती प्रक्रिया आहे.
 • प्रेरणा : आंतरिक व बाह्य असे प्रेरणेचे दोन प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला मदत केल्यास त्यास आंतरिक समाधान मिळते. इतरांना मदत करण्याची वृत्ती ही आंतरिक प्रेरणेनी प्रभावित असते; तर शाळेत प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी बक्षीस, शिक्षा, निंदा हे बाह्यप्रेरक असतात. बाह्य प्रेरणेचे धन व ऋण असे दोन प्रकार पडतात. देशासाठी प्राणांची आहुती देणे, ही आंतरिक प्रेरणा म्हणता येईल. प्रेरणा अध्ययनास पूरक वातावरण निर्मिती करते.
 • शोधन : एखाद्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्या वेळी चुकाही होत असतात. चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे यालाच शोधन म्हणतात. हे अध्ययनाने साध्य होते.
 • वर्तनाची पुनर्रचना : व्यक्ती जे वर्तन करते, त्यात सुधारणा करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करते. आपल्या वर्तनावर लक्ष केंद्रित करून चुकीच्या हालचाली टाळून, अचूक नेमक्या हालचाली केल्या जातात. त्या हालचाली योग्य पद्धतीने व्हाव्यात यासाठी वर्तनाची पुनर्रचना केली जाते. यालाच वर्तनाची पुनर्रचना असे म्हणतात.
 • समायोजन : अध्ययन प्रक्रियेत समायोजनाला फार महत्त्वाचे स्थान आहे. परीस्थितिशी मिळते- जुळते घेऊन अचूक गोष्टी आत्मसात करणे म्हणजे समायोजन होय.
 • पुनरावृत्ती : प्रभावी अध्ययन होण्यासाठी कोणत्या हालचाली योग्य आहेत, हे ठरविल्यानंतर वर्तन किंवा हालचाल पुन्हा पुन्हा करणे म्हणजे पुनरावृत्ती होय. उदा., क्रिकेट हा खेळ योग्य पद्धतीने मैदानात खेळता यावे, यासाठी खेळाडू वारंवार अचूक प्रयत्न करतो किंवा सराव करतो. शाळेत भाषण देणारा विद्यार्थी हा भाषण चांगल्या पद्धतीने देता यावे, यासाठी वारंवार सराव करतो. याला आपण अध्ययनातील पुनरावृत्ती म्हणतो. या सरावाला अध्ययनात खूप महत्त्वाचे स्थान आहे.
 • परिपक्वता : अध्ययन होण्यासाठी परिपक्वतेची आवश्यकता असते. यात शारीरिक व मानसिक पक्वता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एखादा खेळ असो किंवा पाठ्यपुस्तकातील एखादा आशय हे बालकाला शारीरिक व मानसिक पक्वता आल्याशिवाय खेळता येणार नाही किंवा समजणार नाही. म्हणून अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून अभ्यासक्रम तयार केला जातो.
 • मर्मदृष्टी : अध्ययन होत असताना प्रथमत: चुका होतात. त्या होणाऱ्या चुका सरावाने टाळून कृती सफाईदारपणे केल्या जातात. या कृती करताना अनुभवाचा फायदा व्यक्तीला होत असतो.
 • अखंड प्रक्रिया : अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया असून व्यक्ती आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकत राहतो. अध्ययनासाठी प्रथम ध्येयाची गरज असते आणि ते साध्य करण्यासाठी व्यक्तीला जीवनात प्रेरणा मिळणे आवश्यक असते. प्रेरणा असली की, विशिष्ट गोष्ट साध्य करण्यासाठी शोधन प्रक्रिया सुरू होते. व्यक्तीचे प्रयत्न अयोग्य असतील, तर वर्तनाची पुनर्रचना होणे आवश्यक असते. वर्तनाची पुनर्रचना होताना व्यक्तीमध्ये समायोजन क्षमता असणे आवश्यक आहे. समायोजनेतून आणि शारीरिक व मानसिक परिपक्वतेतून व्यक्ती सरावाद्वारे कौशल्यावर प्रभुत्व मिळविते. त्यामुळे व्यक्तीचे अध्ययन योग्य दिशेने होते व त्यात होणारा बदल हा सकारात्मक असतो. म्हणून अध्ययन ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे.

अध्ययनाची वैशिष्ट्ये :

 • अध्ययनातून व्यक्तीत सकारात्मक बदल अपेक्षित असतो.
 • अध्ययनात सराव व पूर्वानुभवाला महत्त्वाचे स्थान आहे.
 • अध्ययनात होणारे बदल हे टिकावू स्वरूपाचे असतात.
 • अध्ययन ही ध्येयाप्रत जाणारी प्रक्रिया आहे.
 • अध्ययनाची गती ही प्रेरणेवर अवलंबून असते.
 • अध्ययनात शारीरिक व मानसिक पक्वता या दोन्ही महत्त्वाच्या असतात.
 • अध्ययनात सरावाला महत्त्व असते.
 • अध्ययनात सज्जता असणे महत्त्वाचे आहे.
 • अध्ययनात मानसिक विश्रांतीची गरज असते.

अध्ययनाचे सिद्धांत : अध्ययनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राज्ञांनी अध्ययनाचे विविध सिद्धांत मांडले आहेत. यात डेव्हिड असुबेल यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन ही उपपत्ती मांडली. यात मनुष्य आपल्या बुद्धीनुसार ज्ञान व माहिती साठविण्याचा प्रयत्न करतो. हे करण्यासाठी त्याच्यामध्ये एक कार्यक्षम यंत्रणा असते. या यंत्रेणेचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी कोणतेही नवीन ज्ञान सुसंघटित होणे आणि नवीन ज्ञानाची जुन्या ज्ञानाशी सांगड घातली जाणे आवश्यक असते.

अध्ययन सिद्धांताचे वर्तन परिवर्तन सिद्धांत आणि बोधीय रचनात्मक परिवर्तनशील सिद्धांत असे दोन गट आहेत. पहिल्या गटात प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एडवर्ड ली थॉर्नडाईक यांची प्रयत्न-प्रमाद उपपत्ती, पॅव्हलॉव्ह यांची अभिजात-अभिसंधान उपपत्ती, स्किनर यांची साधक-अभिसंधान उपपत्ती यांचा समावेश होतो. दुसऱ्या गटात कोहलर यांची मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती, ब्रुनर यांची बोधात्मक उपपत्ती यांचा समावेश आहे. व्यक्ती समस्या सोडविण्यासाठी परिसराशी आंतरक्रिया करतो आणि अध्ययन घडते.

अध्ययनावर परिणाम करणारे घटक :

 • अवधान : अवधान ही एक मानसिक प्रक्रिया आहे. अवधान कक्षेचा व्यक्तीच्या अध्ययनावर परिणाम होतो.
 • प्रेरणा : अध्ययन होण्यासाठी आंतरिक प्रेरणा महत्त्वाची असते. ही प्रेरणा नसेल, तर अध्ययन होत नाही.
 • जिज्ञासा : अध्ययन होण्यासाठी जिज्ञासू वृत्ती असणे आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीविषयी जिज्ञासा नसेल, तर अध्ययनाला योग्य दिशा मिळत नाही.
 • थकवा : अध्ययनावर परिणाम करणारा घटक म्हणजे थकवा. व्यक्तीला शारीरिक थकव्याबरोबरच मानसिक थकवाही येतो. म्हणून शाळेतील वेळापत्रकात विद्यार्थ्यांसाठी दोन लहान सुट्ट्या असतात. तसेच पी. टी, कार्यानुभव, चित्रकला अशा तासिका ठेवल्या जातात. त्यामुळे दिवसभरात आलेला मानसिक थकवा दूर करता येऊ शकतो. शारीरिक किंवा मानसिक थकवा आला, तर विद्यार्थ्यांचे अध्ययन होत नाही.
 • अभिरुची : अध्ययन होण्यासाठी आवड आवश्यक आहे. जर एखाद्या मुलाला शिक्षणाची आवड नसेल, तर तो त्याचे शिक्षण पूर्ण करू शकणार नाही.
 • अभियोग्यता : एखादी गोष्ट करण्याची क्षमता असणे म्हणजे अभियोग्यता होय. अभियोग्यतेमध्ये बौद्धिक क्षमता व शारीरिक क्षमता या दोन्ही बाबींचा समावेश होतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीत गुण समुच्चय सारखे नसतात. याचा परिणाम व्यक्तीच्या अध्ययनावर होतो.

अध्ययनाची गती : एखाद्या विद्यार्थ्यास अपंगत्व नसते; परंतु तो बौद्धिक दृष्ट्या कमकुवत असतो. अशा विद्यार्थ्याची आकलन क्षमता खूप कमी असते. त्यामुळे त्याची अध्ययन गतीही कमी असते.

शैक्षणिक महत्त्व :

 • शिक्षकाने विद्यार्थांची आवड-निवड लक्षात घेऊन अध्यापन करावे.
 • पालकांनी पाल्याची क्षमता लक्षात घेऊन त्यांची शैक्षणिक दिशा निश्चित करावी.
 • शाळेतील वेळापत्रक तयार करताना अध्ययनाची तत्त्वे विचारात घ्यावीत.
 • शालेय अभ्यासक्रम तयार करताना अध्ययनाच्या तत्त्वांचे पालन करावे.
 • अध्ययन-अध्यापन प्रक्रिया राबविताना विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा विचार करण्यात यावा.

संदर्भ : दांडेकर, वा. ना., शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र, पुणे.

समीक्षक : के. एम. भांडारकर