चापांचीए, इमॅन्युएल मेरी : (११ डिसेंबर १९६८) इमॅन्युएल मेरी चापांचीए यांचा जन्म सविङ्गुए सुर ऑर (Juvisy-sur-Orge) या फ्रान्समधील लहानशा काउंटीमध्ये झाला. चापांचिए यांनी पिअरी आणि मेरी क्यूरी विद्यापीठातून जैवरसायनविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान आणि आनुवंशविज्ञान या विषयांचे शिक्षण घेतले. पाश्चर इन्स्टिट्यूटमधून त्या पदवीधर झाल्या. अॅन्टिबायोटिक रेझिस्टन्सच्यामागील रेण्वीय पद्धतीवर त्यांनी संशोधन केले होते. त्या संशोधनासाठी त्याना पीएच्.डी. पदवी देण्यात आली.
नंतरची दोन वर्षे चापांचिए या पिअरी अँड मेरी क्यूरी विद्यापीठात सहाय्यक शिक्षक होत्या. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या रॉकफेलर विद्यापीठात पोस्ट डॉक्टरेट फेलो असताना त्यांनी सूक्ष्मजीववैज्ञानिक इलेन ट्युमानेन यांच्या प्रयोगशाळेत स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिए जीनोम बदलासाठी मुक्त जीनोमचा वापर कसा करता येतो यावर संशोधन केले. त्याचवेळी व्हॅन्कोमायसिन विरुद्ध स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिएचा प्रतिकार कसा करतो हे त्यांनी शोधून काढले.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये त्यांनी असिस्टंट रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम केले. तेथे त्यांनी पामेला कोविन यांच्याबरोबर सस्तन प्राण्यातील जनुक कृत्रिमपणे बदलाला कसा प्रतिसाद देतात यावर संशोधन केले. तसेच उंदरातील केसांच्या वाढीवर शोधनिबंध प्रसिद्ध केला.
अमेरिकेत पाच वर्षे संशोधन केल्यावर चापांचीए यूरोपमध्ये परतल्या. व्हिएन्ना विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवविज्ञान व जनुकविज्ञान इन्स्टिट्यूटमध्ये त्या दोन वर्षे अभ्यागत प्राध्यापक होत्या. तेथे त्यांनी स्ट्रेप्टोकॉकस पायरोजेन संसर्ग अधिक प्रभावी बनण्यासाठी त्याच्या आरएनएमध्ये कसा बदल होतो यावरील शोधनिबंध प्रसिद्ध केला. सूक्ष्मजीवविज्ञान आणि प्रतिक्षमताजीवविज्ञान विभागात त्या असिस्टंट प्रोफेसर आणि विभागप्रमुख होत्या. तीन वर्षे त्या मॅक्स पेरुझ लॅबोरेटरीच्या प्रमुख आणि असोसिएट प्रोफेसर होत्या. चापंचिए नंतरची पाच वर्षे स्वीडनमधील उमेए युनिव्हर्सिटीतील मॉलेक्युलर इन्फेक्शन मेडिसिन विभागात प्रयोगशाळा प्रमुख आणि असोसिएट प्रोफेसर होत्या. त्यानंतर त्यांनी जर्मनीमधील हेल्म्होल्ट्झ सेंटर फॉर इन्फेक्शन रिसर्च येथे विभागप्रमुख आणि हॅनोव्हर मेडिकल स्कूलमध्ये काम पाहिले. त्या बर्लिनमधील जर्मन मॅक्स प्लॅन्क सोसायटीचा विज्ञान सभासद व ‘मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शन बायॉलॉजीचे संचालक झाल्या. तर २०१८ मध्ये त्यांनी मॅक्स प्लँकमधील रोगकारक (जीवाणू / विषाणू) विभागाची स्थापना केली व संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली.
चापांचिए या जीवाणू प्रतिक्षमता यंत्रणेमागील रेण्वीय कोडे उलगडल्याच्या संशोधनाबद्दल अधिक प्रसिद्ध आहेत. या यंत्रणेचे नाव CRISPR/Cas9 आहे यातील CRISPR हे clustered regularly interspaced short palindromic repeats याचे लघु रूप आहे. चापांचिए आणि जेनिफर डाउडना यांची एका कॉन्फरन्स मध्ये ओळख झाली. जेनिफर डाउडना यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी संशोधन करण्याचे मान्य केले. चापांचिए यांच्या कामातून Cas-9 (हे प्रत्यक्षात एक वितंचक आहे) कोणत्याही डीएनएक्रमाचे आवश्यकतेनुसार तुकडे करू शकते हे सिद्ध झाले होते. त्यांनी शोधलेली पद्धत कृत्रिम गाईड आरएनएच्या मदतीने Cas-9 वापरण्याची होती. सोप्या भाषेत सांगायचे तर सुईच्या सहाय्याने दोरा हव्या त्या ठिकाणी नेण्यासारखे आहे. सुलभपणे CRISPR/Cas9 जीनोम संपादन करणे यामुळे शक्य झाले. जगभरातील वैज्ञानिकांनी वनस्पती, प्राणी आणि प्रयोगशाळेतील पेशीवृद्धी संचातील जीनोम यशस्वीपणे संपादित केला. हवा तो जनुकक्रम जनुक उपचारासाठी वापरणे कधी नव्हे एवढे सोपे झाले.
सन २०२० साली चापांचिए आणि जेनिफर डाउडना कालिफोर्निया युनिव्हर्सिटी, बर्कले या दोघींना जीनोम एडिटिंग तंत्राबद्दल रसायन विज्ञानातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नोबेल पुरस्कारांच्या इतिहासात एकाच विषयात दोन महिला वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार देण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्यांना जीवविज्ञानातील ब्रेकथ्रू प्राइझ, लुईस जेनेट प्राइझ मेडिसिन, आंतरराष्ट्रीय जनुकविज्ञानातील गृबर फाउंडेशन प्राइझ, जर्मनीतील सर्वात प्रतिष्ठित लायबनिझ प्राइझ इ. मिळालेली आहेत. टाइम नियतकालिकाने जगातील सर्वात प्रभावी अशा शंभर व्यक्तीमध्ये त्यांच्या नावाची निवड केली होती.
संदर्भ :
समीक्षक : किशोर कुलकर्णी