मानवाचे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठीच्या शिक्षण प्रक्रियेस शारीरिक शिक्षण म्हणतात. या शिक्षणामध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त योग, प्राणायाम, व्यायाम, विविध खेळ आणि ध्यान यांसारख्या क्रिया समाविष्ट असतात. या शिक्षणामध्ये स्वच्छता व निटनेटकेपणा आणि वक्तशीरपणा या प्रक्रियांनाही महत्त्व आहे. विद्यार्थ्याला निरोगी शरीर, मन आणि आचरण यांकरिता प्रशिक्षण देणे; निरोगी शरीरात निरोगी मन ठेवण्यासाठी विद्यार्थ्याला नियमित शारीरिक व्यायामाची सवय लावणे ही शारीरिक शिक्षणाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.

व्याख्या : शारीरिक शिक्षणासंबंधी अनेक तज्ज्ञांनी व्याख्या केल्या आहेत. डॉ. जे. बी. नॅश यांच्या मते, ‘शारीरिक शिक्षण हे एका मोठ्या समग्र अशा विषयाचा एक भाग असून त्याचा संबंध महत्त्वाच्या स्नायूंच्या हालचालींशी आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या क्रियांशी आहे’.

डिओबर्ट्युफर यांच्या मते, ‘विविध शारीरिक हालचालींद्वारे व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवाचे संघटित ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण होय’.

भारत केंद्रीय शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाच्या मते, ‘शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्याची प्रक्रिया म्हणजे शारीरिक शिक्षण होय’.

प्राचीन काळी शारीरिक शिक्षणाचा हेतू स्नायूंचा विकास करून शारीरिक शक्ती वाढविण्यापुरता मर्यादित होता. या सर्वांचा अर्थ असा होता की, मनुष्य युद्धामध्ये, खेळाच्या मैदानामध्ये, वजनात, झाडे चढण्यात, लाकूड कापण्यात, नदी-तलाव किंवा समुद्रात पोहण्यात यशस्वी होणे असा होता. आज शारीरिक शिक्षणाचा हेतू बदलला असून शरीराच्या घटकांच्या विकासासाठी एक सुव्यवस्थित कार्यक्रम असा शारीरिक शिक्षणाचा अर्थ आहे. सध्याच्या युगात व्यायाम, खेळ, करमणूक इत्यादी विषय शारीरिक शिक्षणाच्या कार्यक्रमांतर्गत येतात. तसेच या शिक्षणात वैयक्तिक आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य यांनासुद्धा एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. कार्यक्रमांचे वेळापत्रक ठरविण्यासाठी शरीरशास्त्र, मानसशास्त्र आणि सामाजिक विज्ञान यांतील तत्त्वांचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो.

शारीरिक शिक्षण हा आधुनिक शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक शाळेत खेळाचे मैदान आणि दोन गट असणे आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापनानंतर विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सामील व्हावे, ही अपेक्षा असते. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये विविध प्रकारच्या शारीरिक कसरती किंवा क्रिया शिकविल्या जातात. यामध्ये योगासनांचाही समावेश असतो.

शारीरिक शिक्षणाला केवळ विद्यार्थी जीवनातच नव्हे, तर त्यानंतरच्या जीवनातदेखील एक महत्त्वपूर्ण स्थान असते. या शिक्षणामुळे नोकरी आणि व्यवसायाचा मानसिक ताण कमी होतो, आरोग्य चांगले राहते आणि मन ताजे होण्यास मदत होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जे मिळेल ते पौष्टिक किंवा अपौष्टिक अन्न खाणे, कोणत्याही वेळेला खाणे, नियमित व्यायाम नसणे, शरीराला आराम न मिळणे इत्यादी बाबी सामान्य आहेत. विद्यार्थ्याला लहानपणापासून शालेय स्तरावर शारीरिक योग आणि व्यायामाबद्दल जे शिक्षण मिळते, त्याचा वापर तो नंतरच्या आयुष्यात करत नाही. या सर्व कारणांमुळे त्याची रोग प्रतिरोधक शक्ती कमी होऊ लागते आणि त्याला नंतरच्या काळात शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

शारीरिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरांवर संघटना आणि संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्था वेळो वेळी प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी स्पर्धकांना विशिष्ट प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे जगातील स्पर्धांमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे. शारीरिक शिक्षणाचे महत्त्व संपूर्ण जगात असून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योगा दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये, मंडळे, विविध सरकारी व खाजगी संस्थांमध्ये योगा केला जातो. तसेच योग शिबिरांचे आयोजन केले जाते.

महत्त्व : विद्यार्थ्यांच्या जीवनात शारीरिक शिक्षणाला फार महत्त्व आहे.

 • खेळ मुलांसाठी आनंदाचे स्रोत आहे. खेळ शरीरातील सर्व अवयवांना ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे शरीर सुदृढ राहते आणि मनात स्फूर्ती निर्माण होते.
 • खेळ खेळाडूंना शिस्त व संघभावना शिकविते.
 • शालेय खेळांमध्ये खेळाडूंना काही नियमांचे पालन करावे लागते, त्यांना पंच व्हावे लागते. यामुळे ते शिस्त व आज्ञाधारकपणा या गोष्टी शिकतात.
 • शारीरिक शिक्षणामुळे खेळाडू एखाद्या संघिक खेळामध्ये निष्ठा राखण्यास शिकतात आणि इतर संघांचा सन्मान करण्यास शिकतात.
 • समर्थन आणि संयम यांचा विकास होतो.

फायदे : शारीरिक शिक्षणाचे मन आणि शरीरासाठी अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत.

 • शारीरिक शिक्षणामुळे शरीरास मजबूत, निरोगी आणि सुंदर बनविते.
 • शाळांमध्ये मानसिक कार्यानंतर विद्यार्थ्यांना सामान्यत: नैराश्य जाणवते, खेळांमुळे मुले मोकळ्या हवेमध्ये श्वास घेतात आणि मैदानावरील खेळांमुळे उत्साही असतात.
 • शारीरिक शिक्षणामुळे चिंतन व स्मरणशक्ती वाढते.
 • शारीरिक शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते व शरीराचे नैसर्गिक सामर्थ्य वाढते.
 • शारीरिक शिक्षणामुळे शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत होते.
 • शारीरिक शिक्षणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
 • शारीरिक शिक्षण आपल्याला धैर्य शिकविते आणि आपले मन शांत करते.
 • शारीरिक शिक्षणामुळे मानसिक विकास होतो, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
 • शारीरिक शिक्षण व्यवसाय निवडीस मदत करते.
 •  शारीरिक शिक्षणामुळे नेतृत्त्व गुण विकसित होतो.
 • शारीरिक शिक्षणामुळे व विविध क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्तीचा विकास होतो.
 • शारीरिक शिक्षणामुळे एकाग्रता वाढते.
 • शारीरिक शिक्षणामुळे उदार मनोवृत्तीचा विकास होतो.
 • शारीरिक शिक्षणामुळे शरीराबरोबरच मानसिक विकास होतो.
 • क्रीडा ही व्यक्तीची नैसर्गिक प्रवृत्ती असल्यामुळे विविध प्रकारच्या खेळांमुळे मन आनंदी होते व जीवनात नैराश्य येत नाही.
 • शारीरिक शिक्षणाद्वारे मानसिक शांती मिळू शकते.

समीक्षक : के. एम. भांडारकर