गायोन, युलिस्स : (८ मे १८४५ – ११ एप्रिल १९२९) युलिस्स गायोन यांचा जन्म फ्रांसमधील बोर्दाऊ येथे झाला. युलिस्स गायोन यांना, एकोल नॉर्मल सुपेरिएर या गरजू विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी स्थापन झालेल्या शाळेकडून मदत मिळाली व त्यांनी तिथून सहकारी ही (associate) पदवी मिळवली. त्याच संस्थेत लुई पाश्चर यांचा विद्यार्थी म्हणून शिकत असताना युलिस्स यांनी अंड्यातले स्वयंस्फूर्त बदल (Spontaneous alterations of the eggs) या विषयावर डॉक्टरेट प्रबंध सादर केला. या प्रबंधामुळे त्यांना कस्टम्स प्रशासनाकडून बोर्दाऊमध्ये एक प्रादेशिक रोगनियंत्रण प्रयोगशाळा  स्थापन करावी असे सांगण्यात आले. युलिस्स यांनी अशी प्रयोगशाळा स्थापन करून पुढील ४४ वर्षे त्याचे संचालन केले. त्यांना बोर्दाऊ येथील विज्ञान शाखेतल्या रसायनशास्त्र विभागात व्याख्याता म्हणून नेमण्यात आले. नंतर ते विद्यापिठात प्राध्यापक झाले. बोर्दाऊत त्यांच्या आगमनामुळे तेथे द्राक्षमद्य व मृदा सूक्ष्मजीवशास्त्र या विषय सुरु झाले. १८७९ ते १८८७ दरम्यान त्यांनी मिल्लार्डे नावाच्या वनस्पतीशास्त्रज्ञासोबत द्राक्षमळ्यात अतिनुकसानकारक बुरशीच्या रोगाविरुद्ध लढा सुरू केला. या दोघा संशोधकांनी कॉपर सल्फेट आणि भाजलेली चुनखडी यांचे मिश्रण द्राक्षवेलीवर फवारले. याचा द्राक्षवेलीवर पडणार्‍या डाऊनी आणि पावडरी मिलड्यू या बुरशीजन्य  रोगावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी त्यांनी शृंखलावार प्रयोग केले. या कामात पुढे उत्तम प्रगती गाठत त्यांनी बोर्दाऊ मिश्रण (Bordeaux mixture) नावाचे एक शक्तिशाली बुरशीनाशक तयार केले. ते अजूनही द्राक्षवेलीवर रोगोपचारासाठी वापरले जाते. बॉद्रिमॉन्ट नंतर जीरोंड येथील जमीन व्यवस्थापन व द्राक्षमद्य अभ्यास केंद्र व्यवस्थापनात त्यांनी यश मिळविले. येथे त्यांनी द्राक्षरसापासून द्राक्षमद्य बनवण्याच्या पद्धती सुधारण्यासाठी प्रयत्न करत असताना द्राक्षवेलींच्या खतांवर पद्धतीशीर अभ्यासास सुरुवात केली. गायोन यांनी वेगवेगळ्या रोगाने ग्रस्त असलेल्या द्राक्षवेलीमधल्या अस्थिर आम्लांचा अभ्यास केला. बोर्दाऊ यथे द्राक्षमद्य विज्ञानचा पाया रचण्याचे मानकरी म्हणजे युलिस्स गायोन होत. ते लुई पाश्चर यांचे विद्यार्थी, समन्वयक व मित्र होते. पाश्चर अनेकदा गायोन यांना बियर व द्राक्षमद्याचे नमुने विश्लेषणासाठी द्यायचे व गायोन देखील पाश्चर यांना स्वतःच्या संशोधन व निरीक्षणाबाबत माहिती पुरवत राहायचे. अशा रीतीने पाश्चर हे बोर्दाऊ येथे द्राक्षमद्य विज्ञानाच्या विकासाला उत्तेजित करणारे खरे बळ होते.

गायोन यांनी जमिनीतल्या नाईट्रेटचे नाईट्राईट व नाईट्रोजनमध्ये रुपांतर करणार्‍या प्राणवायू विरहित वातावरणात जगणार्‍या सूक्ष्मजीवाणूंच्या गुणधर्मांचा पण अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या डूपेटीट नावाच्या विद्यार्थ्या सोबत मिळून अनेक सूक्ष्मजीवाणूंच्यामार्फत होणार्‍या  नायट्रेट क्षपणावर संशोधन करून ते प्रकाशित केले. राष्ट्रीय कृषी संस्थेने पाश्चर यांच्या शिफारशीवरून युलिस्स गायोन यांना सुवर्ण पदकाने पुरस्कृत केले. त्यांना कमांडर ऑफ द लेजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. जोअँनिस सोबत त्यांनी स्कूल ऑफ अप्लाईड केमिस्ट्री टू इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर ऑफ बोर्दाऊची स्थापना केली. पॅरिसच्या विज्ञान अकादमीमध्ये त्यांची संवाददातापदी निवड करण्यात आली. सहा वर्षे ते बोर्दाऊ विज्ञान शाखेचे अधिष्ठाता होते. इथे त्यांच्या संचालनाखाली प्राणीशास्त्र विभागासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. गायोन यांच्या मृत्यूच्या एक वर्ष अगोदर बोर्दाऊ इथे द्राक्षे व द्राक्षमद्य या विषयावर आंतरराष्ट्रीय कॉंग्रेसचे आयोजन करण्यात आले. या अधिवेशनात बोर्दाऊ मिश्रणच्या निर्मितीबद्दलचे सादरीकरण करण्यासाठी एक सत्र ठेवण्यात आले होते.

युलिस्स गायोन यांचे बोर्दाऊ इथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे