लॉरेन्स, मार्गारेट : जीन मार्गारेट वेमिस. (१८ जुलै,१९२६ – ५ जानेवारी,१९८७). प्रख्यात कॅनेडियन लेखिका. पुरुषप्रधान संघर्षमय जगात आत्म-साक्षात्कारासाठी, ‘स्व’अस्तित्वाची ओळख होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या स्त्रियांचे चित्रण त्यांच्या लेखनात प्रामुख्याने आले आहे. मार्गारेटचा जन्म कॅनडामधील मॅनिटोबा या प्रांतातील नीपावा येथे झाला. रॉबर्ट वेमिस हे वडील आणि वेर्ना जीन सिम्पसन ही तिची आई होय. ती चार वर्षांची असतांना दुर्देवाने तिच्या आईचे निधन झाले. नंतर तिच्या मावशीने रॉबर्ट वेमिसशी लग्न केले आणि सावत्र आई होऊन मार्गारेटचे पालन पोषण केले. ती आठ वर्षांची असतांना तिचे वडीलही वारले. तिने वयाच्या सातव्या वर्षी कथा आणि कविता लिहायला सुरुवात केली. तिचे शिक्षण नीपावा येथे झाले. विनिपेगमधील युनायटेड महाविद्यालयातून तिने उच्चशिक्षण घेतले तसेच इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली (१९४७). नंतरच्या काळात विनिपेग सिटीझन प्रेससाठी वार्ताहर म्हणून तिने कार्य केले. पेशाने अभियंता असलेल्या जॅक लॉरेन्स याच्याशी ती विवाहबद्ध झाली (१९४७). १९४९ मध्ये हे तरुण जोडपे इंग्लंडला गेले. नंतर त्यांनी सोमालियालँड (सोमालियाचा एक स्वायत्त प्रदेश) आणि आफ्रिकेतील घाना येथे वास्तव्य केले. येथेच जॅक लॉरेन्सने ब्रिटिश ओव्हरसीज डेव्हलपमेंट सर्व्हिसमार्फत धरण बांधण्याच्या कामात अभियंता म्हणून योगदान दिले.

502329227

मार्गारेट लॉरेन्सची पहिली साहित्यकृती अ ट्री फॉर पॉवरिटी (१९५४) ही सोमाली लोककथा आणि कवितांच्या अनुवादाबद्दल आहे. आफ्रिकेतील वास्तव्याने ती आदर्शवादी पाश्चात्य उदारमतवादी युवतीतून एका प्रगल्भ स्त्रीमध्ये परिवर्तीत झाली आणि तिला उदयोन्मुख राष्ट्रांच्या जिवंत समस्या जाणून घेण्याची दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे तिला आफ्रिकेतील लोकांबद्दल नेहमीच सहानुभूती राहिली आणि त्यांचा इतिहास तसेच साहित्य तिने अभ्यासले. ‘अनसर्टन फ्लॉवरिंग’ (१९५४) ही तिची पहिली कथा व्हिट बर्नेट या कथासंग्रहामधे प्रकाशित झाली होती. तिच्या अनेक कथांमध्ये तिने घानाची पार्श्वभूमी चित्रित केली. या सर्व कथा नंतर द टुमॉरो-टेमर अँड अदर स्टोरीझ (१९६३) या तिच्या कथासंग्रहात प्रकाशित करण्यात आल्या. द टुमॉरो-टेमर… हा आफ्रिकन कथांचा संग्रह म्हणून प्रचंड लोकप्रिय झाला. तिची पहिली कादंबरी धिस साइड जॉर्डन (१९६०) ही घानाची पार्श्वभूमी रेखाटते. या कादंबरीमध्ये घाना एक राष्ट्र म्हणून उदयास आल्यानंतरही सत्तेच्या देवाणघेवाणीतून मूळ आफ्रिकन लोकांच्या व्यथा, त्यांच्या हाल – अपेष्टा इत्यादी संदर्भातील चित्रण केलेले आहे. त्याच प्रमाणे दि प्रोफेट्स कॅमल बेल किंवा न्यू विंड इन ड्राय लँड (१९६३) यात तिच्या आफ्रिकेतील जीवनाचे वर्णन आले आहे. त्याकड़े एक संस्मरणिका अथवा आत्मकथनपर साहित्य म्हणून बघितले जाते. एकंदरीतच मार्गारेट लॉरेन्सच्या सर्वच आफ्रिकन कथा मानवाचा सन्मान आणि त्याच्या क्षमतेवर दृढ विश्वास व्यक्त करतात आणि त्यातूनच तिच्या उत्तरोत्तर वाढणाऱ्या प्रतिभेची स्पष्ट कल्पनाही येते.

मार्गारेट आणि जॅक लॉरेन्स यांचा १९६९ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर १९७३ मध्ये मार्गारेट लेकफिल्ड येथे कायमस्वरूपी राहण्यासाठी परतली. यानंतर तिने लिहिलेल्या प्रमुख तीन कादंबऱ्या कॅनडाची पार्श्वभूमी चित्रित करतात आणि त्या स्त्रीकेंद्री आहेत. तिची दुसरी कादंबरी द स्टोन एंजेल (१९६४)  स्त्रीजीवनातील संघर्ष व्यक्त करते. या कादंबरीमध्ये नायिका हैगरचा प्रेम, स्वातंत्र्य आणि आत्म-साक्षात्कार तसेच स्वची ओळख होण्यासाठीचा प्रवास चित्रित केला आहे. प्रस्तुत कादंबरी कॅनेडियन वाङ्मयातील एक महत्त्वपूर्ण साहित्यकृती आहे आणि लेखिकेच्या कारकीर्दीचा मुख्य आधारस्तंभ आहे. अ जेस्ट ऑफ गॉड (१९६६) ही कादंबरी सुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरली. प्रस्तुत कादंबरी ही रेचल कॅमेरून या तरुणीची कथा सांगते. रेचल पुरुषप्रधान संघर्षमय जगात तगून राहताना अग्निपरीक्षेतून जाते आणि आपल्या शाश्वत स्व-तत्त्वाचा शोध घेते. अ जेस्ट ऑफ गॉडया (१९६६)आणि द फायर ड्वेलर्स (१९६९) या कादंबऱ्याही लक्षणीय आहेत.  द फायर ड्वेलर्स ही कादंबरी प्रामुख्याने स्टेसी मॅकएंड्रा नामक चार मुलांची आई असणाऱ्या निराश गृहिणीच्या वैयक्तिक आकांक्षा पूर्ण करतानाचा संघर्ष रेखाटते. स्टेसी स्वत:ला साधारण आणि सामान्य समजते, परंतु मार्गारेट लॉरेन्स स्टेसीच्या प्रेमाचे, धेर्याचे आणि जीवनशक्तीचे असाधारण गुण विशद करते. द डिव्हिनर्स (१९७४) ही एक प्रगल्भ कादंबरी असून कॅनेडियन साहित्याचा एक उत्कृष्ट मैलाचा दगड म्हणून मान्यता पावली आहे. याशिवाय तिने हार्ट ऑफ अ स्ट्रेंजर (१९७७)  हा निबंधांचा संग्रह आणि मुलांसाठीच्या कथा ए बर्ड इन द हाउस (१९६२,१९७०), लाँग ड्रम्स अँड कनॉन्स (१९६८), जेसन्स क्वेस्ट (१९७०), सिक्स डार्न काऊझ (१९७९), द ओल्डन डेज कोट (१९७९), अ ख्रिसमस बर्थडे स्टोरी (१९८०) इत्यादी उल्लेखनीय पुस्तके लिहिली.

तिने ‘राइटर्स युनियन ऑफ कॅनडा’ आणि ‘रायटर्स ट्रस्ट ऑफ कॅनडा’ या साहित्यक्षेत्रातील संस्थाच्या पायाभरणीसाठीही आपले योगदान दिले.  १९७२ मध्ये तिला ‘कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा सन्मान देऊन भूषवण्यात आले. १९८० ते १९८३ या काळात ती पीटरबरो, ओंटारियो येथील ट्रेंट विद्यापीठाची कुलगुरू होती. २०१८ साली कॅनडा सरकारने मार्गारेट लॉरेन्सला मरणोत्तर ‘पर्सन ऑफ नॅशनल हिस्टोरिक सिग्निफिकन्स’ (राष्ट्रीय व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण व्यक्ती) म्हणून घोषित केले. १९८६ मध्ये ती फुफ्फुसाच्या कर्करोगाने आजारी पडली. हा कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरल्याने त्याकाळी रोगनिदान होणे अशक्यच होते. त्यातूनच तिने रिजेंट सेंट, लेकफिल्ड ओंटारियो, कॅनडा येथील तिच्या घरी औषधांचे अतिसेवन करून आत्महत्या केली.

संदर्भ :

  • Editors of Encyclopaedia (2021, July 14). Margaret Laurence. Encyclopedia Britannica. https://www.britannica.com/biography/Margaret-Laurence

समीक्षक : लीना पांढरे