हेलरिगल, हरमन (२१ ऑक्टोबर १८३१ – ११ एप्रिल १९२९) हरमन हेलरिगल यांचा जन्मपेगाऊ, साक्झोनी इथे झाला. हरमन यांचे शिक्षण ग्रीम्मा येथील एका प्रख्यात सेक्सन राजकुमारांसाठीच्या शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी ड्रेस्डेनजवळच्या थरांथ येथील वनशास्त्र अकादमीतून रसायनशास्त्राचा अभ्यास केला. येथे त्यांनी कृषिविषयक रसायनशास्त्रज्ञ एडॉल्फ स्टोकहार्ड सोबत त्यांचा सहाय्यक म्हणून काम करत असतांना त्यांना लीबिग यांनी स्थापन केलेल्या प्रायोगिक रसायनशास्त्रक्षेत्रात त्यांच्या पुढील शिक्षणासाठी बहुविध उत्तेजन प्राप्त झाले. हरमन यांच्या विशेष क्षमता ओळखून स्टोकहार्ड यांनी लवकरच त्यांची दाम येथील कृषिविषयक संशोधन संस्थेच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली. तेथे एक २५ वर्षाचा तरुण विद्वान म्हणून त्यांनी स्वतःला वनस्पतीशास्त्रातील संशोधनात झोकून देत काही लागवडीत वनस्पतींच्या पोषण आवश्यकतेच्या बाबींच्या प्रश्नांवर लक्ष्य केंद्रित केले. त्यांची रुची विशेषतः मध्य आणि उत्तर जर्मनीत आढळणार्‍या वालुकामय जमिनींची गुणवत्ता सुधारण्यात होती. या मातीच्या व्यापक उपयोगितेत खूप अडचणी येत होत्या. त्यांच्या कामाची दखल घेत सेक्सन सरकारने त्यांना प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. पुढे अनहाल्ट-बर्नबर्ग सरकारने हरमन यांना बर्नबर्ग कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त केले. या दरम्यान जर्मन साखर कारखाने संघाच्या समर्थनाने जर्मनीमध्ये बीटपासून तयार झालेल्या साखरेची जागा ऊसापासून तयार झालेल्या साखरेनी घेतली आणि हरमन यांनी त्यावर बर्नबर्ग येथे संशोधन सुविधा सुरू केली. तिथे त्यांचा मुख्य उपक्रम बीट लागवडीसाठी जरुर त्या पर्यावरणीय परिस्थितीवर संशोधन करण्याचा असून वनस्पतीत नत्राच्या पुरवठ्याबाबत मुख्य प्रश्नचिन्ह होते. हे काम करत असताना हरमन आणि त्यांचा सहकारी विल्फर्थ यांनी काही शेंग जातीच्या वनस्पतीमधे त्यांच्या मुळावरच्या गाठीत काही सहजीवी जीवाणू बंदिस्त असून ते हवेतल्या नत्राचे शोषण करून त्याचे वापरण्यास युक्त अशा रचनेत रुपांतरण करतात असा शोध लावला. हरमन यांनी याचे सादरीकरण सर्वप्रथम जर्मन सोसायटी ऑफ सायंटिस्ट्स अँड फिजिशियन्सच्या संमेलनात केले. या मूलभूत आणि उल्लेखनीय कामाबरोबरच त्यांचा समकालीन असलेला संशोधक अल्बर्ट शुल्त्झ-लुपित्झ यांना ल्युपिन नावाच्या शेंगवनस्पतीचा आंतरिक पिक म्हणून नापीक वालुकामय जमिनीत उगवण्यात यश मिळाल्याचे कारण स्पष्ट झाले. यामागील पद्धतशीर वैज्ञानिक ज्ञानामुळे आंतरिक पिकांच्या लागवडीने जमिनीचा कस वाढवण्यासाठी या शेतकी तंत्राला उल्लेखनीय महत्त्व प्राप्त झाले. ग्रॅमिनेसी आणि लेग्युमिनेसी या वर्गातील वनस्पतींच्या मुळावरील गाठींमध्ये नत्राचे शोषण कसे होते यावर त्यांनी संशोधन केले.

थोड्याच काळात हरमन यांचे संशोधन जगविख्यात झाले व बाहेरच्या देशात त्याचे अनुकरण व्हायला लागले. या जगविख्यात संशोधनामुळे हरमन हेलरिगल यांना खूप सन्मान मिळाले. हेलरिगल हे रॉयल सोसायटी ऑफ लंडन, रॉयल स्वीडिश अकॅडेमी ऑफ सायन्स, दि पॅरीस अकॅडेमी ऑफ सायन्स व फ्रेंच नॅशनल सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरसारख्या जगविख्यात संस्थांचे मानद सभासद होते. त्यांच्या कामाची नोंद घेत बेवरिअन अकॅडेमी ऑफ सायन्सतर्फे त्यांना लीबिग सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.

त्यांचा मृत्यू बर्नबर्ग अनहाल्ट इथे झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे