ब्रिटिश चलन संप्रदाय हा एक ब्रिटिश अर्थतज्ज्ञांचा गट होता. हा गट मुख्यत्वे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डेव्हिड रिकार्डो यांच्या बँकिंग संप्रदायाच्या विरोधातील लिखाणामुळे उदयास आला. या संप्रदायात हेन्री थॉर्टन आणि रिकार्डो हे दोन महत्त्वपूर्ण अर्थतज्ज्ञ होते, ज्यांनी किमती धातूच्या गटास आगेकूच करण्यास मदत केली. रिकार्डो यांनी दी प्राइस ऑफ गोल्ड आणि दी हाय प्राइस ऑफ बुलियन : अ प्रुफ ऑफ दी डिप्रेसिएशन ऑफ बँक नोट्स हे दोन ग्रंथ प्रकाशित केले. त्यामुळे ते ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.

इसवी सन १८९७ ते इ. स. १८२१ या कालावधीत फ्रान्सबरोबर झालेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये रोख रक्कम अदा करणे स्थगित केले होते. या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या रोख रकमेच्या देयकाचा पुनरारंभ या आर्थिक विचारांचा एक महत्त्वपूर्ण गट म्हणून चलन संप्रदाय अस्तित्वात आला. पैशाचा पुरवठा व कागदी पैसा फक्त सर्व धातुरूपी पैशाची नक्कल होती. या संकल्पनेत चलन संप्रदायाचे मूलभूत तत्त्व मांडले गेले.

चलन संप्रदायाच्या विचारानुसार घरेलू पैशाचा पुरवठा आंतरराष्ट्रीय व्यापारातील ओहोटी आणि प्रवाहाने अस्थिर (कमी-जास्त) होत नव्हता, तर बँकेमार्फत वितरित करण्यात आलेल्या बँक नोटांमधील चढ-उतारांमुळे होता. या चलन संप्रदायाने असे प्रतिपादन केले की, पैशाच्या पुरवठ्यातील चढ-उतार हे आर्थिक हेलकाव्याचे प्रमुख कारण आहे आणि बँका या अस्थिरतेचे कारण होत्या. चलन संप्रदाय हा देशातील धातुरूपी चलन आणि सोने-चांदी यांच्या प्रमाणात बँक नोटा (कागदी चलन) वितरित करण्याबाबत संतुष्ट होता. दुसऱ्या देशास सोन्याचा पुरवठा होऊन सोन्यात घट झाल्यास त्याप्रमाणात घरेलू बँक नोटांची किंमत कमी करून घरेलू किमतींवर उतरता दबाव ठेवावा. त्याचप्रमाणे दुसऱ्या देशाकडून सोन्याचा फायदा झाल्यास याउलट कृती करावी.

बँक सनद अधिनियम १८४४ (दी बँक चार्टर ॲक्ट १८४४) म्हणजे चलन संप्रदायाचा बँकिंग संप्रदायावरील मोठा विजय होता. या कायद्यात बँक ऑफ इंग्लंडला बँक नोटा वितरणाची मक्तेदारी प्रदान करण्याऱ्या तरतुदींचा समावेश होता. या कायद्याने बँक ऑफ इंग्लंडला सोन्याच्या साठ्यातील बदलांनुसार नोटा नियंत्रणाचे अधिकार प्रदान करण्यात आले.

चलन संप्रदाय हा आधुनिक अर्थतज्ज्ञांच्या संप्रदायाबरोबर पैशाचा पुरवठा हा बँक आणि धोरणकर्त्यांच्या मर्जीपेक्षा निश्चित नियमाद्वारे करण्याच्या विचारांमध्ये सहभाग नोंदवितो. आधुनिक काळातील अर्थतज्ज्ञ चलन संप्रदायाच्या, पैशाच्या पुरवठ्याचे व्यवस्थापन हे समग्रलक्षी आर्थिक धोरणांचा पाया आहे, या मताशी सहमती दर्शवितात.

संदर्भ :

  • Dwivedi, D. N., Macroeconomics : Theory and Policy, New Delhi, 2005.

समीक्षक : श्रीराम जोशी