अर्थव्यवस्थेतील आर्थिक व सामाजिक या कारणांमुळे औद्योगिकतेचा होणारा ऱ्हास अथवा त्यात सातत्याने होणारी घट म्हणजेच निरुद्योगिकीकरण होय. औद्योगिक क्रांतीमुळे अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत जगात (विशेषतः यूरोपीयन देशांत) औद्योगिकीकरणाची प्रक्रिया फार वेगवान झाल्याचे दिसते. या प्रक्रियेला अगदी विरोधी प्रक्रिया म्हणजे निरुद्योगिकीकरण होय. अशा तऱ्हेची औद्योगिक घट विषेषतः उत्पादित उद्योगक्षेत्रात दिसून येते. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात जगातील बहुतेक देशांमध्ये विविध कारणांनी निरुद्योगिकीकरण झाल्याचे दिसते. उच्च आर्थिक विकास असलेल्या देशसमूहांमध्ये अशी प्रक्रिया १९७० च्या व त्यानंतरच्या दशकांत ठळकपणे दिसून येते. जगातील २३ प्रगत अर्थव्यवस्थांमधील उत्पादन क्षेत्रातील रोजगार १९७० मध्ये २८ टक्के होता. त्यात घट होऊन १९९७ मध्ये तो सुमारे १८ टक्के इतका झाल्याचे दिसते. अशा तऱ्हेची उत्पादन क्षेत्रातील ‘घटती रोजगारी’ ही निरुद्योगिकीकरणामुळे यूरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, चीन, कोरिया, सिंगापूर, भारत इत्यादी देशांत निर्माण झाल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. त्याच काळात या सर्व अर्थव्यवस्थांमध्ये सेवाक्षेत्रातील रोजगार वाढल्याचे दिसून आले आहे. निरुद्योगिकीकरणाचा कालावधी व परिणाम प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये भिन्न असल्याचेही दिसून येते.

कॅरोन क्रॉस, रॉबर्ट रोथॉर्न इत्यादींनी निरुद्योगिकीकरण प्रक्रियेची कारणमीमांसा केल्याचे दिसून येते. रोथॉर्न यांच्या मते, मानस पॉल यांनी मांडलेली दीर्घकालीन घटता औद्योगिक नफा हे निरुद्योगिकीकरण प्रक्रियेचे प्रथम स्वरूप आहे. रोथॉर्न आणि रामन रामस्वामी यांनी निरुद्योगिकीकरण ही ऋणात्मक प्रक्रिया नसून ती प्रगत अर्थव्यवस्थांमधील नैसर्गिक परिणाम असल्याचे मत मांडले आहे. जॉर्ज राईसमन यांनी निरुद्योगिकीकरणासाठी मुद्रास्फितीला जबाबदार धरले आहे. लेगान यांच्या मते, आर्थिक पुनर्बांधणी, वाढते जागतिकीकरण, श्रमिकांचे स्थलांतर, दळणवळण, सोयींची वाढ, परकीय भांडवलाचा प्रवाह, तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान विकास, आंतरराष्ट्रीय व्यापारवाढ इत्यादी कारणांनी उत्पादित क्षेत्रांतील गुंतवणूक एका देशातून दुसऱ्या देशात आणि विभागात गेल्याचे दिसून येत. ज्या ठिकाणी उत्पादन खर्च व श्रमिक खर्च कमी आहे, त्या ठिकाणी उत्पादन उद्योगांचे स्थलांतर झाल्याचे सर्वत्र दिसून येते. त्यामुळे एकेकाळी औद्योगिक दृष्ट्या प्रगत असणारे प्रदेश/विभाग कालांतराने निरुद्योगिक झाल्याचे दिसते. उदा., अमेरिकेतील डेट्रॉइट, पिट्सबर्ग, सेंट लूइस, बफेलो इत्यादी ठिकाणांचे उद्योगश्रेत्र बंद पडून लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यामुळे तेथील उद्योग इमारती व यंत्रसामुग्री ओस पडले आहेत. तसेच उत्पादन क्षेत्रांतील रोजगार व गुंतवणूक कमी होऊन त्याची जागा सेवाक्षेत्र उद्योगांनी घेतल्याचे बदलते चित्र दिसत आहे.

भारतातही मोगल काळात व ब्रिटिश काळात निरुद्योगिकीकरण झाल्याचे दिसते. त्याची भिन्न कारणे असली, तरीही भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम झाले होते.

संदर्भ : 

समीक्षक : अनिल पडोशी