प्रणाली, पद्धत व तंत्र यांमध्ये मानवी हस्तक्षेप कमी होऊन यंत्र आणि तंत्र यांचा वापर वाढत जातो, त्यास स्वयंचलन म्हणतात. म्हणजेच कमीत कमी श्रमशक्तीचा वापर किंवा मानवी नियंत्रणाशिवाय यंत्र व तंत्र यांच्या साह्याने उत्पादन प्रणाली राबविण्याची प्रक्रिया म्हणजे स्वयंचलन होय. स्वयंचलन हा शब्द साधारणपणे इ. स. १९४५ ते १९५० या दरम्यान व्यवहारात प्रचलित आला. वेबस्टरच्या न्यू वर्ल्ड डिक्शनरीनुसार स्वयंचलन हा मूळ शब्द स्वयंचलीकरण (ऑटोमॅटिक) या शब्दापासून तयार झाला आहे. स्वयंचलन या शब्दाचा अर्थ मानवी श्रमाची बचत करण्यासाठी वापर केलेली पद्धत व यंत्रे किंवा आपोआप चालणारी यंत्रे असा होतो.

स्वयंचलनाची सुरुवात होण्यापूर्वी जगातील प्रत्येक काम, उत्पादन हे फक्त श्रमाच्या साह्याने केले जात. औद्योगिकीकरणाबरोबर हळूहळू यंत्रांचा वापर होऊ लागला. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया सुलभ होऊ लागली. कालांतराने स्वयंचलनाची गती वाढत गेली. उद्योजक, मालक यांना स्वयंचलनामुळे अनेक फायदे मिळू लागले आणि त्याचा सकारात्मक परिणाम उद्योगधंदा वाढीवर झाला. त्यामुळे मानवी श्रमाला पर्याय म्हणून स्वयंचलन उद्योग व सेवाक्षेत्र वाढत गेल्याचे दिसून येते.

स्वयंचलनाचे कालखंड : स्वयंचलनाच्या विकासाचे प्रामुख्याने तीन कालखंडात वर्गीकरण करता येईल.

(१) एकोणिसाव्या शतकाचा कालखंड : या कालखंडात हळूहळू उद्योगांची उभारणी होत गेली आणि यंत्रांचा वापर हा मर्यादित स्वरूपात होत असे. विशेषत: जेथे श्रमिकांना काम करणे कठीण आणि धोकादायक होते, अशा ठिकाणी यंत्रांचा वापर केला जाऊ लागला. हातमाग, सूतगिरण्या यांमधील यंत्रांचा वापर हा स्वयंचलनाकडे घेऊन जाणारा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

(२) विसाव्या शतकाचा कालखंड : या कालखंडात मानवी श्रम आणि यंत्र व तंत्र यांचा समतोल साधत मानवी श्रमाचा कमीत कमी वापर व्हावा याकडे उद्योग व सेवाक्षेत्राचा कल वाढत गेला. तसेच उद्योगाबरोबरच सेवाक्षेत्रही झपाट्याने विस्तारत गेले. नवनवीन तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण उत्पादननिर्मिती यांमुळे जगामध्ये सर्वत्रच स्वयंचलनाची गती वाढत गेली.

(३) एकविसाव्या शतकाचा कालखंड : या कालखंडात अधिक गतीमान पद्धतीने मानवी हस्तेक्षेपा‍शिवाय अचूक आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार आणि कमी खर्चात वस्तूनिर्मिती व सेवा पूरविण्याकडे स्वयंचलनाची वाटचाल सुरू आहे. ‘मॅकन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूट’च्या अहवालानुसार आता जे मानव काम करतो, त्याच्या ५०% काम हे स्वयंचलनाच्या माध्यमातून २०५५ पर्यंत केले जाईल, असा अंदाज दर्शविला आहे. यासाठी तरुणांनी बाजाराधिष्ठित कौशल्ये आणि ज्ञान संपादन करत नवनवीन कार्ये करण्याची क्षमता व गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज आहे.

औद्योगिक स्वयंचलन आणि माहिती तंत्रज्ञानातील स्वयंचलन हे आज मोठ्या प्रमाणात वाढत आहे; परंतु उत्पादनाची विविधता आणि एकूण उत्पादनाचे प्रमाण यांवरून स्वयंचलनाचे वर्गीकरण ३ प्रकारे करता येते.

(१) स्थिर स्वयंचलन : जेव्हा एका विशिष्ट उपयोगासाठी स्थिर स्वरूपातील बदल हे यांत्रिक साधने व तंत्रांमध्ये करून उत्पादन प्रणाली राबविली जाते, तेव्हा त्याला स्थिर स्वयंचलन असे म्हणतात. एका विशिष्ट पद्धतीने उत्पादन यंत्रणा तयार झाली की, त्यामध्ये सहजासहजी बदल करता येत नाही. म्हणून या प्रक्रियेला स्थिर स्वयंचलन असे म्हणतात.

(२) कार्यबद्ध स्वयंचलन : वेगवगळी उत्पादने तयार करण्यासाठी उत्पादन प्रणालीमध्ये एका ठराविक पद्धतीने व सांकेतिक सूचनांनुसार उत्पादन रचनेमध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेला कार्यबद्ध स्वयंचलन म्हणतात. या स्वयंचलनाच्या प्रक्रियेमध्ये उत्पादन करण्याची प्रक्रिया विशिष्ट क्रमाने बदलता येते. ही प्रक्रिया सर्वसाधारणपणे उत्पादनाचे प्रमाण कमी व मध्यम स्वरूपात घेण्यासाठी उपयुक्त ठरते.

(३) लवचिक स्वयंचलन : लवचिक स्वयंचलन ही आवश्यकतेनुसार उत्पादन प्रणालीमध्ये तात्काळ बदल करण्याची प्रक्रिया आहे. अशा प्रकारच्या स्वयंचलनामुळे उत्पादनातील ही विविधता टिकवून ठेवता येते, तसेच तात्काळ वाढवितासुद्धा येते.

स्वयंचलनाचे फायदे : उत्पादन प्रणालीवर आणि वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्र व तंत्र यांचा वापर स्वयंचलनामध्ये होत असल्यामुळे त्याचे उत्पादक, उद्योजक आणि एकूणच अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अनेक फायदे होतात.

  • उत्पादन संसाधनांची कार्यक्षमता वाढते.
  • उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होते.
  • उत्पादनाची गुणवत्ता सुधारून दर्जेदार उत्पादन होण्यास स्वयंचलन उपयुक्त ठरते.
  • उत्पादन खर्च कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होते.
  • उत्पादनातील सातत्य टिकून राहते इत्यादी.

स्वयंचलनाच्या मर्यादा : स्वयंचलनाचे फायदे होत असले, तरी त्याच्या काही मर्यादाही आहेत.

  • स्वयंचलनाचा सुरुवातीचा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो. तो लघुउद्योजक, उत्पादक यांना करणे कठीण जाते.
  • सर्वच उत्पादन कार्ये ही स्वयंचलनाने करता येत नाहीत.
  • बौद्धिकतेच्या दृष्टीने व सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखील मर्यादा आहेत.
  • अति स्वयंचलनामुळे बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही इत्यादी.

स्वयंचलनाच्या सर्व सकारात्मक व नकारात्मक बाबींचा विचार करता भारतासारख्या विकसनशील व अधिक लोकसंख्या असलेल्या देशाला यामध्ये समतोल साधण्याची आवश्यकता आहे. एकूणच नविन यांत्रिक व तांत्रिक बदलांमुळे स्वयंचलनाची गती अधिकच वाढत आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रांत स्वयंचलनातील क्रांती निर्माण होत आहे. याला सामोरे जाण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी सर्व समाजघटक नवीन कौशल्ये आत्मसात करत स्वयंचलनाच्या प्रक्रियेमध्ये सामील होत आहेत.

समीक्षक : श्रीनिवास खांदेवाल