पक्षिवर्गातील फॅल्कॉनिफॉर्मिस (Falconiformes) गणातील ॲक्सिपिट्रिडी (Accipitridae) कुलातील आकाराने मोठ्या, जाड व मजबूत चोच, मोठे पाय व अणकुचीदार नख्या, तीक्ष्ण नजर, लांब व रुंद पंख, उडण्याचा प्रचंड वेग असलेल्या तसेच शिकार करणाऱ्या ताकदवान पक्ष्यांना गरुड असे म्हणतात. या पक्ष्यांना इंग्रजीमध्ये ईगल (Eagle) असे म्हणतात. विशेषत: ॲक्विला (Aquila) प्रजातीतील पक्षी खरे गरुड म्हणून ओळखले जातात. परंतु, हैराएटस (Hieraaetus), लोफेटस (Lophaetus), इक्टिनाएटस (Ictinaetus) आणि क्लँगा (Clanga) या प्रजातीतील पक्षी देखील गरुड म्हणून ओळखले जातात. ॲक्सिपिट्रिडी कुलामध्ये बहिरी ससाणा, घार व गिधाड या पक्ष्यांचा देखील समावेश होतो.
भारतात गरुड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ॲक्विला, क्लँगा, हैराएटस, हॅलिएटस, स्पायलॉर्निस, निसाएटस, सिरकॅएटस या प्रजातींतील पक्ष्यांच्या सु. २४ जाती आढळतात. यामध्ये सोनेरी, पिंगट, शिखाधारी, नेपाळी, मत्स्य, पहाडी, ठिपकेवाला, सर्प, समुद्री इत्यादी गरुडांच्या जातींचा समावेश होतो. (पहा तक्ता क्र. १ व २). आशिया व आफ्रिका येथे गरुडाच्या सु. ६० जाती; तर उत्तर अमेरिकेमध्ये २, मध्य व दक्षिण अमेरिकेत ९ आणि ऑस्ट्रेलियामध्ये ३ अशा एकूण १४ जाती आढळतात.
गरुड हा जगातील सर्वांत वेगवान उडणारा पक्षी असून तो ३२० किमी. प्रति तास वेगाने आकाशात उडू शकतो. त्यामुळे याला सर्वोत्तम उडणारे यंत्र असेही म्हणतात. गरुड हा एकमेव असा पक्षी आहे की, पाऊस टाळण्यासाठी तो वादळी ढगांवरून उडतो. म्हणजेच ते समुद्रसपाटीपासून १०,००० फूट उंचीवरून उडू शकतात. गरुडाचे पंख पातळ आणि दुमडलेले असतात, त्यामुळे ते खूप वेगाने उडू शकतात. तसेच यांचा उपयोग त्यांना आकाशात सहजपणे दिशा बदलण्यासाठी देखील होतो. गरुडाच्या जगातील सर्वांत लहान प्रजातींचा आकार ४५ ते ५५ सेंमी. आणि सर्वात मोठ्या प्रजातींचा आकार २ ते २.५ मीटर आहे.
अंटार्क्टिका खंड वगळता इतर सर्व ठिकाणी गरुड पक्षी आढळतो. ते उंच पर्वत, घनदाट जंगले आणि वाळवंटात राहणे पसंत करतात. आकार आणि उड्डाणामध्ये गरुडाचे गिधाडाशी साम्य असते. न्यू गिनीध्ये आढळणारी पिग्मी गरुड (Pygmy eagle) ही गरुडाची सर्वांत लहान जाती असून हिचे शास्त्रीय नाव हैराएटस व्हाइस्की (Hieraaetus weiskei) असे आहे. याच्या शरीराची लांबी ३८−४८ सेंमी., पंखविस्तार ११२−१२६ सेंमी. आणि वजन ४००−५०० ग्रॅ. असते. जानेवारी २००१ मधील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जपान व रशियामध्ये आढळणारी स्टेलर्स समुद्री गरुड (Steller’s Sea Eagle) ही गरुडाची सर्वांत मोठी जाती असून हिचे शास्त्रीय नाव हॅलिएटस पेलॅजिकस (Haliaeetus pelagicus) असे आहे. याच्या शरीराची लांबी सु. ९५ सेंमी., पंखविस्तार २.२–२.४५ मी. आणि वजन ५–९ किग्रॅ. आहे. लांबीने, पंखविस्ताराने व वजनाने मोठ्या असणाऱ्या गरुडांच्या जातींमध्ये हार्पी, फिलिपाईन, पांढऱ्या शेपटीचा, मुकुटधारी (Crowned), सोनेरी, टकल्या (Bald), स्टेलर्स समुद्री गरुड इत्यादींचा समावेश होतो. टकल्या गरुड (हॅलिएटस ल्यूकोसेफॅलस – Haliaeetus leucocephalus) हा अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे.
गरुडाच्या संपूर्ण डोक्यावर पिसे असतात, तर काही जातींत तुरा असतो. याची चोच मजबूत, पाय मोठे व बळकट तसेच पंजाच्या बोटापुढे बाकदार नख्या असतात. पंजाची पकड अतिशय मजबूत असते. डोळे अतिशय तीक्ष्ण असून ते ३-४ किमी.च्या अंतरावरून देखील त्याची शिकार पाहू शकते. मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. गरुड जोडीदाराबरोबर आयुष्यभर एकनिष्ठ असतात. स्थलपरत्वे प्रजननाचा काळ बदलतो. ते आपली घरटी उंच व दुर्गम जागी बांधतात. दरवर्षी तेच घरटे वापरतात. एका वेळेला ३–५ अंडी घालतात. सहा ते आठ आठवड्यांत ती उबवली जातात. पिलांची वाढ हळूहळू होते. पिलांना तिसऱ्या ते चौथ्या वर्षांपर्यंत पूर्ण वाढलेला पिसारा दिसतो.
गरुड पक्षी मांसाहारी असून ते मुख्यत्वे जिवंत भक्ष्याची शिकार करतात. ते मुख्यत: मासे, खेकडे, उंदीर, ससे, खार, साप, सरडे, छोटे पक्षी, वटवाघळे इत्यादींची शिकार करतात. आफ्रिकन मुकुटधारी गरुड (African crowned eagle) हरणे, माकडे, वासरे यांची शिकार करतात. कधीकधी ते मानवी लहान मुलांवर देखील हल्ला करतात. मार्शल गरुड (Martial eagle) हे रानमांजरे, कोल्हे यांची शिकार करतात. या दोन्ही जातींत विशेषत: त्यांच्यापेक्षा आकाराने मोठ्या असणाऱ्या प्राण्यांची शिकार केली जाते.
सोनेरी गरुड (Golden eagle) : याचे शास्त्रीय नाव ॲक्विला क्रायसॅट्स (Aquila chrysaetos) असे आहे. सोनेरी गरुड हा यूरोप, आशिया, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका येथे आढळतो. गरुडांमध्ये सर्वांत विस्तृत भूप्रदेशावर आढळणारा हा गरुड आहे. याचा रंग गडद तपकिरी असून मानेवर फिकट सोनेरी तपकिरी पिसारा असतो. अपरिपक्व गरुडाच्या शेपटीवर पांढरा रंग असतो तसेच पंखावर पांढऱ्या खुणा असतात. याच्या शरीराची लांबी ८४–९७ सेंमी., पंखविस्तार ६–७.५ फूट असून वजन ३–७ किग्रॅ. असते. हे पक्षी वर्षातून एकदाच प्रजनन करतात. प्रजननाचा काळ साधारण मार्च ते ऑगस्ट असा असतो. मादी एका वेळेस १–४ अंडी घालते. नर व मादी मिळून ४०–४५ दिवस अंडी उबवतात. प्रथम जन्माला आलेले पिलू इतर अंड्यांचे नुकसान करते. त्यामुळे एका वेळेस एक किंवा दोनच पिले जगतात. पिलांची पुढील ६५–७० दिवसांत वाढ होते. ९०–१०० दिवसांनंतर ती पूर्णपणे स्वतंत्र होतात आणि दूरवर निघून जातात. ३-४ वर्षांमध्ये ती प्रजननासाठी योग्य होतात. पुढील ४-५ वर्षांमध्ये ती आपले क्षेत्र निश्चित करतात. नैसर्गिक परिस्थितीमध्ये दिर्घकाळ टिकून राहणारी ही जाती आहे. असे असले तरी साधारण ७५% पिले ही परिपक्व होण्याआधीच मृत्यू पावतात. यातून जी पिले जगतात त्यांचे आयुर्मान ३२ वर्षांपेक्षा अधिक असते. यूरोपमध्ये सोनेरी गरुड ४६ वर्षे जगल्याची नोंद आहे.
पिंगट गरुड (Tawny eagle) : याचे शास्त्रीय नाव ॲक्विला रॅपॅक्स (Aquila rapax) असे आहे. दक्षिण रशिया, मंगोलिया, आफ्रिका तसेच भारतीय उपखंडात पिंगट गरुड आढळतात. शुष्क अधिवास उदा., निम्न वाळवंट, वाळवंटातील थंड विस्तृत गवताळ प्रदेश (Steppe) अथवा उष्ण प्रदेशातील गवताळ प्रदेश (Savanna), सपाट उघड्या जमिनी अशा प्रदेशांमध्ये हे अनुकूलित झाले आहेत. पिंगट गरुड हे दिसायला नेपाळी गरुडासारखे असतात. याचा रंग फिकट ते गडद तपकिरी असून शेपटी आणि पंख काळ्या रंगाचे असतात. पंखावर हलक्या फिकट रंगाचे पट्टे असतात. पाठीखालील भाग फिकट रंगाचा असतो. डोके मोठे, डोळे तपकिरी, चोच पिवळी व टोकाला गडद काळी असते. अपरिपक्व गरुड हे प्रौढांपेक्षा फिकट पिवळसर रंगांचे व अधिक रेखीव दिसतात. कधीकधी ते पांढऱ्या रंगाचे असतात. याच्या पायावर भरपूर पिसे असतात. याच्या शरीराची लांबी ६५–७२ सेंमी., पंखविस्तार ५.५–६ फूट असून वजन २–२.५ किग्रॅ. असते. ते झाडांच्या टोकावर काटक्यांच्या साहाय्याने सपाट व मोठ्या आकाराचे घरटे बांधतात. हे पक्षी वर्षातून एकदाच प्रजनन करतात. प्रजननाचा काळ साधारण एप्रिल ते जुलै असा असतो. मादी एका वेळेस १–३ अंडी घालते. ४०–४५ दिवस अंडी उबवली जातात. अंडी उबवण्याचे काम शक्यतो मादी करते. जन्मल्यानंतर साधारण १२० दिवसांनी पिले घरटे सोडतात.
सर्व गरुडांमध्ये पिंगट गरुड हा जास्त संधीसाधू असतो. ते मृत जनावरांचे कुजके मांस खातात किंवा दुसऱ्या मांसभक्षक प्राण्यांची शिकार चोरून खातात. हे पक्षी अतिशय धीट असे भक्षक आहेत. साधारणपणे त्यांचे आयुर्मान १६ वर्षे आहे. परंतु, हे ४५ वर्षांपर्यंत जगल्याची नोंद आहे.
नेपाळी गरुड (Steppe eagle) : याचे शास्त्रीय नाव ॲक्विला निपालेन्सिस (Aquila nipalensis) असे आहे. याच्या पायावर भरपूर पिसे असल्यामुळे त्याला बूट घातलेले गरुड असेही म्हणतात. शरीराची लांबी ६०–८९ सेंमी., पंखविस्तार ५.५–७ फूट असून वजन २.५–४ किग्रॅ. असते. प्रामुख्याने जमिनीवर घरटी बांधणारा हा एकमेव गरुड आहे. हे स्थलांतरीत गरुड असून ते प्रजननाच्या जागेपासून दूर स्थलांतर करतात. मुख्यत्वे मध्य पूर्व, लाल समुद्र आणि हिमालय येथे ते स्थलांतर करतात. हिवाळ्यामध्ये कझाकिस्तान, मंगोलिया, रशिया येथे प्रजननाकरिता स्थलांतर करतात. विशेषेकरून जमिनीवरील खारी यांचे भक्ष्य आहे. तसेच कीटकांच्या झुंडी, मृत जनावरे तसेच इतर जनावरांची छोटी पिले हे देखील त्याचे भक्ष्य आहे. हिवाळ्यात त्यांची शिकार करण्याची क्रिया काहीशी मंदावते. याचे आयुर्मान ३०–४० वर्षांचे असते. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने नेपाळी गरुडाला ‘धोक्याची जाती’ म्हणून घोषित केले आहे.
काळा गरुड (Black eagle) : याची इक्टिनेटस मालिएन्सिस (Ictinaetus malaiensis) ही जाती चीन, तैवान, दक्षिण-पूर्व आशिया, इंडोनेशिया येथे आढळते. तर इ. पेर्निगर (Ictinaetus Perniger) ही जाती भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार येथे आढळते. याच्या शरीराची लांबी सु. ७५ सेंमी, पंखविस्तार ४–६ फूट व वजन १-२ किग्रॅ. असते. याचा रंग काळा असून याचे पाय व चोच पिवळ्या रंगाची असते. उडताना याच्या पंखांचा आकार इंग्रजी V अक्षराप्रमाणे दिसतात. याचा प्रजनन काळ जानेवारी ते एप्रिल असा आहे. याचे सरासरी आयुर्मान १६ वर्षांचे आहे.
भारतीय ठिपकेदार गरुड (Indian spotted eagle) : याचे शास्त्रीय नाव क्लँगा हॉस्टॅटा (Clanga hostata) आहे. हा मूळचा भारत, नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार येथील आहे. हा मध्यम आकाराचा असून याच्या शरीराची लांबी सु. ६० सेंमी. व पंखविस्तार १५० सेंमी. असतो. याचे डोके मोठे असून चेहरा रुंद असतो. सर्व ठिपकेवाल्या गरुडांच्या जातींत चेहरा रुंद व पायावर पिसे असतात. याचा रंग फिकट तपकिरी असून शरीरापेक्षा डोळ्यांचा रंग गडद असतो. ३-४ महिन्यांच्या पिलांचा रंग चमकदार तपकिरी असून डोक्यावरील व मानेवरील पिसे अतिशय मऊ असतात व त्यावर ठिपके असतात.
मोठा ठिपकेदार गरुड (क्लँगा क्लँगा – Clanga clanga) हा मध्यम आकाराचा शिकारी पक्षी असून पाणथळ ठिकाणी असलेले पाणपक्षी हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. हिवाळ्यामध्ये हा उत्तर भारतात स्थलांतर करतो. याचे प्रजनन मध्य व दक्षिण पूर्व युरोपमध्ये होते. छोटा ठिपकेदार गरुड (ॲक्विला पोमारिना – Aquila pomarina) हा मध्य आणि पूर्व युरोपमध्ये आढळतो. याचे आयुर्मान ८–१० वर्षांचे असते. भारतात छोटा ठिपकेदार गरुड असल्याचे आढळले आहे. परंतु, वर्गीकरणानुसार हा सहसा भारतात आढळत नाही.
संदर्भ :
- https://www.britannica.com/animal/eagle-bird
- https://www.newworldencyclopedia.org/entry/Eagle
- http://www.walkthroughindia.com/birds/12-beautiful-species-of-eagles-in-indian-sub-continent/
- https://youtu.be/-XQlMgsWhOg This video covers all 24 species of Indian Eagle.
- https://www.nationalgeographic.com/animals/birds/facts/golden-eagle
- https://www.guinnessworldrecords.com/world-records/largest-eagle
समीक्षक : मोहन मद्वाण्णा