कावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणाच्या कोर्व्हिडी (Corvidae) कुलामध्ये होतो. हा मूळचा आशियातील पक्षी असून जगामध्ये त्याचा आढळ सर्वत्र आहे. भारत, बांगला देश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव इत्यादी देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागांत सर्वत्र आढळतो. कोर्व्हिडी कुलात सु. ४० जाती आहेत. भारतात त्यातील घरकावळा / गावकावळा व डोमकावळा या दोन जाती आढळतात.

कावळा (कोर्व्हस स्प्लेंडेन्स)
कावळा (को. स्प्लें. इनसोलेन्स)

घरकावळ्याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस स्प्लेंडेन्स (Corvus splendens) असे आहे. त्याला इंडियन ग्रे नेक्ड सिलोन (Indian grey necked ceylon) वा कोलंबो क्रो (Colombo crow) असेही म्हणतात. मध्यम आकाराच्या या पक्ष्याची लांबी ४१—४३ सेंमी.; वजन ३२०—४१५ ग्रॅ. आणि पंखविस्तार ७६—८५ सेंमी. असतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. त्याच्या शरीराचा रंग सामान्यत: काळा असून त्यामध्ये जांभळ्या, निळ्या किंवा हिरवट रंगाच्या छटा किंवा झाक असते. मानेभोवती करड्या किंवा भस्मी रंगाचा रुंद पट्टा असतो. मान, पाठीचा पुढील भाग व छातीवर करडा किंवा राखाडी रंग असतो. चोच लांब (इतर जातींपैकी), बळकट धारदार व काळया रंगाची असते. भक्ष्य फाडण्यासाठी चोच उपयोगी पडते. डोळे गडद तपकिरी रंगाचे असून दृष्टी तीक्ष्ण असते. पाय मजबूत व काळे असतात. त्याचा आवाज मोठा व कर्कश असून तो काव कावऽऽ असे ओरडतो. त्याचा आकार व काळ्या रंगामुळे तो सहज ओळखता येतो.

घरकावळ्याच्या मानेजवळील राखाडी रंगाच्या छटांवरून त्याच्या ४ उपजाती केल्या आहेत. को. स्प्लें. स्प्लेंडेन्स (C.S.splendens) या उपउपजातीचा आढळ पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगला देश येथे आहे. त्याच्या मानेभोवती करड्या रंगाचा रुंद पट्टा असतो. को. स्प्लें. झूगमायेरी (C.S. zugmayeri) याचा आढळ दक्षिण आशियातील कोरड्या भागांत व इराणमध्ये आहे. त्याच्या मानेभोवती फिकट करड्या रंगाचा पट्टा असतो. को. स्प्लेंजेन्स प्रोटेगॅटस (C.S. protegatus) याचा आढळ दक्षिण भारत, मालदीव व श्रीलंका येथे असून याच्या मानेभोवती गडद करड्या रंगाचा पट्टा असतो. को. स्प्लें. इनसोलेन्स (C.S. insolense) याचा आढळ म्यानमारमध्ये आहे. याच्या शरीराचा रंग गडद असून मानेभोवती करड्या रंगाचा पट्टा नसतो.

घरकावळा सर्वहारी असून मनुष्याचे सर्व पदार्थ तो खातो. तसेच तो लहान सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, कीटक, लहान अपृष्ठवंशी प्राणी, पक्ष्याची घरट्यातील अंडी व पिले, धान्ये व फळेही खातो. तो खारीची (Squirrel) पिले, बेडूक-सरड्यासारख्या लहान प्राण्यांना टोचून टोचून मारतो. तो उष्टे, खरकटे व खराब अन्न, प्राण्यांची मृत शरीरे इत्यादी खातो. त्याच्या या सवयीमुळे आपल्या सभोवतीचा परिसर स्वच्छ राखण्यास त्याची मदत होते. कावळा आक्रमक पक्षी असून प्रसंगी तो घारी घुबडासारख्या बलवान शत्रूंवरही धीटपणे हल्ला करतो. कुरापती काढण्यात तो पटाईत असून कुत्र्या-मांजरांनाही तो सतावून हैराण करतो. तो सारखा टेहळणी करत असतो व संधी मिळताच ती वस्तू पळवतो. तसेच शेतात पिके तयार झाली की कावळ्यांचे थवेच्या थवे कणसांवर हल्ला चढवून त्यातील दाणे खातात व धान्याची बरीच नासधूस करतात, त्यामुळे तो उपद्रवी पक्षी आहे. तो कीटक, उंदीर व घुशी खातो त्यामुळे यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवले जाते.

कावळ्याच्या घरट्यातील कावळ्याचे व कोकिळेचे पिलू

घरकावळा हा पक्षी गटागटामध्ये राहतो. रात्रीच्या वेळी एखाद्या झाडावर त्यांचा अधिवास असतो. विणीच्या हंगामात त्यांची जोडपी दिसतात. घरकावळ्याच्या विणीचा हंगाम एप्रिल-जून असतो. प्रदेशपरत्वे तो थोडाफार बदलतो. नर-मादी दोघे मिळून आपले घरटे झाडावर ३—८ मी. उंच ठिकाणी फांद्याच्या दुबेळक्यात बांधतो. घरटे काटक्याकुटक्यांचे असून त्यामध्ये लोकरीचे धागे, चिंध्या, काथ्या यांचाही वापर करतात. घरट्याचा मध्यभाग खोलगट असून मादी त्यामध्ये ४-५ अंडी घालते. अंडी फिकट हिरवट-निळसर असून त्यावर तपकिरी रंगाचे लहान ठिपके किंवा रेषा असतात. अंडी उबविण्याचे काम नर व मादी दोघे मिळून करतात. मादी विशेषत: प्रत्येक रात्री अंडे उबविते. अंडी १५—१७ दिवस उबविल्यानंतर त्यातून पिले बाहेर येतात. पिलांचे पालनपोषण नर व मादी दोघे मिळून करतात. पिले २१—२८ दिवस नर-मादीच्या संरक्षणाखाली घरट्यात राहतात. कोकिळा कावळ्याच्याच घरट्यात आपली अंडी घालते. कावळा व कावळी दोघे मिळून कोकिळेची अंडीही आपलीच समजून उबवितात.

कावळ्याचा नैसर्गिक अवस्थेतील आयु:काल  १३—१५ वर्षे आहे.

पहा : कोकिळा, डोमकावळा.

संदर्भ :

समीक्षक : कांचन एरंडे