प्रणाली उपागमानुसार शैक्षणिक उपक्रमांची तपशीलवार विस्तृत योजना आखणे, ती विविध चाचण्यांद्वारे कार्यान्वित केलेले मूल्यमापन व त्यातून मिळालेल्या तथ्यांद्वारे मूळ योजनेत बदल करणे, त्याचे पुन्हा मूल्यमापन करणे असे सतत कार्यान्वित असलेल्या चक्रीय नियोजनास अनुदेशन प्रणाली म्हणतात. कार्यरत घटकांमधील संघटित संबंध म्हणजे अनुदेशन प्रणाली होय.

उपागम : प्रणाली उपागम ही संकल्पना अभियांत्रिकी उद्योग व्यवस्थापनाकडून शिक्षण क्षेत्रात आलेली आहे. अध्ययन पातळीवर किंवा संस्थात्मक पातळीवर बिकट समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिस्तबद्ध रीतीने एकत्रितपणे कार्य करणाऱ्या व ज्याची रचना आंतरभरण, प्रक्रिया बाह्योत्पत्ती अशा स्वरूपात असते अशा रचनेला किंवा रचनेच्या विचार पद्धतीला प्रणाली उपागम असे म्हणतात. प्रणाली उपागम ही शैक्षणिक तंत्रज्ञानाचे शैक्षणिक समस्यांवर पद्धतशीर उपयोजन असून यामध्ये आंतरभरण आणि बाह्योत्पत्ती यांपासून सुरुवात करून पूर्ववर्तनाकडून अंतिम वर्तनाकडे सर्वांत चांगल्या पद्धतीने कसे जावे, हे निश्चित करते.

व्याख्या : वेबस्टर शब्दकोशानुसार, ‘अनेक वस्तुंमध्ये आंतरक्रिया करणारा गट, जो एकात्म संघ तयार करतो’.

अकोफ यांच्या मते, ‘परस्परांशी संबंधित व परस्परावलंबी बाबींचा संच म्हणजे अनुदेशन प्रणाली होय’.

रोब यांच्या मते, ‘एकत्रितपणे कार्य करणाऱ्या घटकांचे पद्धतशीर संघटन म्हणजे अनुदेशन प्रणाली होय’.

शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम या संकल्पनेत आशय, अभ्यासक्रम प्रक्रिया व विद्यार्थ्यांच्या गरजा या तीन घटकांचा समावेश होतो. अलीकडे अभ्यासक्रम रचनेकडे प्रणाली उपागमाच्या स्वरूपात पाहिले जाते. अभ्यासक्रम ही शिक्षण प्रणालीची सूक्ष्मप्रणाली आहे. काही वेळा अभ्यासक्रम या शब्दास अनुदेशन प्रणाली हा पर्यायी शब्द वापरला जातो. अनुदेशन प्रणाली संरचनेत ध्येये व उद्दिष्टे, पाठ्यक्रम, अध्यापन पद्धती, तंत्रे व साधने, मूल्यमापन इत्यादी बाबींचा समावेश होतो.

औद्योगिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रात नफा मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. आजपर्यंत उत्पादकता वाढविण्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा, यंत्रसामुग्री व मनुष्यबळ या घटकांचा विचार केला जायचा; परंतु अलीकडच्या काळात उत्पादक त्याच्या उद्योगाचा समाजमनावर काय परिणाम होतो, याचा विचार करणे सुरू केला आहे. यातून नवीन प्रयोग, नवीन समस्या, नवीन प्रक्रिया, मूल्यमापन, प्रत्याभरण व नियंत्रण अशा अनेक प्रक्रियांचा विचार सुरू झाला. या प्रक्रियांतून प्रणाली या संकल्पनेचा उदय झाला. आपल्या सभोवताली पचनसंस्था प्रणाली, जीव प्रणाली, सौर प्रणाली, निवडणूक प्रणाली, शासन प्रणाली, संगणक प्रणाली, शाळा प्रणाली, शिक्षण प्रणाली अशा अनेक प्रणाली आहेत.

वैशिष्ट्ये : अनुदेशन प्रणालीची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

 • प्रणालीमध्ये अनेक घटक असतात.
 • प्रणालीतील घटक परस्परांशी सबंधित असतात.
 • प्रणालीतील विविध घटक परस्परांशी सूत्रबद्ध व शिस्तबद्ध रीत्या बांधलेले असतात.
 • काही प्रणाली सूक्ष्म असतात, तर काही प्रणाली महाकाय असतात. उदा., सूक्ष्मजीव ही सूक्ष्म, तर पर्यावरण ही महाकाय प्रणाली आहे.
 • प्रणाली ही सापेक्ष संकल्पना आहे.
 • प्रणालीत पृथक्करणात्मक विचारांपेक्षा समष्टीवादी दृष्टिकोणातून विविध घटकांचा विचार केला जातो.
 • प्रणाली ही उद्दिष्टांधिष्टित असते.
 • प्रणाली ही बद्ध किंवा मुक्त असते.
 • प्रणालीत विविध पर्याय असतात.
 • प्रणालीची वैशिष्ट्ये प्रणालीतील घटकांपेक्षा वेगळी असतात.
 • प्रत्येक प्रणालीत सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम होतो.
 • प्रणालीतील घटकांची विशिष्ट मांडणी असते.
 • प्रणालीतील घटकांची मांडणी आंतरभरण, प्रक्रिया, बाह्योत्पत्ती अशा स्वरूपांत असते.

आधारभूत विचारप्रवाह : शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या प्रभावामुळे अभ्यासक्रम व शैक्षणिक उपक्रम यांचे नियोजन जास्त नेमकेपणाने व पद्धतशीरपणे करण्याबाबतची जाणीव शिक्षणतज्ज्ञांना झाली. यासाठी अनुदेशन प्रणाली ही संकल्पना ज्या विचारप्रवाहातून जन्माला आली, त्याची दखल घेणे आवश्यक आहे. या विचारप्रवाहांना अनुदेशन प्रणालीचे आधारभूत विचारप्रवाह म्हणतात. अनुदेशन प्रणालीचा विकास होण्यासाठी पुढील गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत.

 • व्यक्तिगत भेद : व्यक्तिगत भेद मानसशास्त्रातील तत्त्व आहे. कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात. अनेक बाबतींत हे व्यक्तीगत भेद असतात. अनुदेशन प्रणाली रचनेत व्यक्तिगत भेदानुसार घटकांची मांडणी असते.
 • वर्तनवाद : जे. बी. वॉटसन यांच्या वर्तनवादाचा शिक्षण प्रणालीवर मोठा परिणाम झालेला आहे. ध्येये साध्य करण्यासाठी लहान लहान उद्दिष्टे मांडायला हवीत, हा विचार वर्तनवादामुळे शिक्षण क्षेत्रात आला. स्कीनर यांचे क्रमन्वित अध्ययन तंत्राचा उपयोगही अनुदेशन प्रणालीत केला जातो.
 • उद्दिष्टांचे वर्गीकरण : शिक्षण प्रक्रियेचे नियोजन करताना नियोजनकर्त्याला उद्दिष्टांच्या वर्गीकरणाची गरज भासू लागली.
 • प्रगत तंत्रविज्ञान : आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात बदल झाला. अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रणाली, विश्लेषण संकल्पनेचा परिणाम शिक्षण प्रणालीच्या नियोजनात झाला. त्यातून प्रगत तंत्रविज्ञानाचा स्वीकार केला गेला.
 • संक्रांतीविज्ञान : नियंत्रण व संदेशवहन यांचे शास्त्र म्हणजे संक्रांतीविज्ञान. अनुदेशन प्रणाली रचनेतही अनेक घटक असतात. त्या घटकांत आंतरक्रिया व नियंत्रण ठेवण्यासाठी संक्रातीविज्ञान या विचार प्रवाहांचा स्वीकार केला गेला.

रचना : अनुदेशन प्रणालीची काही वैशिष्ट्ये तिच्या अर्थावरून स्पष्ट होतात.

 • घटक : अनुदेशन प्रणालीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी, पालक, पुस्तके, भौतिक व अध्ययनविषयक सुविधा इत्यादी मूर्त व अमूर्त घटक समाविष्ट असतात.
 • समष्टीवादी दृष्टिकोण : अनुदेशन प्रणाली रचनेत पृथक्करणात्मक विचाराऐवजी समष्टीवादी दृष्टिकोणातून विविध घटकांचा व त्यांच्या परस्परसंबंधाचा विचार केला जातो.
 • उद्दिष्टाधिष्टित व पद्धतशीर प्रक्रिया : अनुदेशन प्रणाली संरचनेमध्ये ध्येय व उद्दिष्टे, पाठ्यक्रम, अध्यापन पद्धती, तंत्रे व साधने, मूल्यमापन या सर्व बाबींचा पद्धशीरपणे समावेश असतो.
 • परस्पर आंतरक्रिया : शिक्षण प्रक्रियेच्या विविध घटकांत परस्पर आंतरक्रिया होत असतात. या क्रियांमधून एक गतिशील, सूत्रबद्ध व्यवस्था निर्माण होते.
 • सापेक्ष संकल्पना : अनुदेशन प्रणाली रचनेतील विविध घटकांत परस्पर आंतरक्रिया होत असल्याने ती सापेक्ष संकल्पना आहे. यामध्ये शाळा, वर्ग, शिक्षण प्रणाली या लहान-मोठ्या प्रणाली एकमेकांशी निगडित असतात.
 • मुक्त किंवा लवचिक प्रणाली : नवीन माहिती व मिळालेल्या तथ्याद्वारे सतत बदल होत असतात. त्यामुळे अनुदेशन प्रणाली बंदिस्त नाही.
 • विविध पर्याय : अनुदेशन प्रणाली रचनेत एकच पर्याय नसून अनेक विकल्प असतात.
 • प्रत्याभरण : अनुदेशन प्रणाली रचनेचा आराखडा तयार करताना प्रत्याभरण व्यवस्था केलेली असते.

नुदेशन प्रणाली रचनेतील विद्यार्थी गरजा ठरविणारे घटक, शिक्षण प्रक्रियेतील घटक आणि फलनिष्पत्ती ठरविणारे घटक हे अभ्यासक्रम रचनेवर परिणाम करणारे तीन घटक आहेत. अनुदेशन प्रणालीचे कार्य संस्था, समाज व शिक्षण यांच्यातील समन्वयाने चालते. शिक्षण क्षेत्रातील अध्ययन अध्यापनविषयक समस्या सोडविण्यासाठी अनुदेशन प्रणाली रचनेचा वापर केला जातो. त्यात गरजा विश्लेषण, उद्दिष्ट निश्चिती, पर्यायी योजना व पद्धती, अनुदेशन घटकांची रचना, उपलब्ध सामग्री व मार्गदर्शन यांचे विश्लेषण, उपायांची योजना, अनुदेशन साहित्याची जुळवाजुळव, मूल्यमापन यंत्रणा आणि प्रत्याभरण या मुद्यांचा विचार केला जातो.

समीक्षक : अनंत जोशी