हंटर, जॉन : (१३ फेब्रुवारी १७२८ – १६ ऑक्टोबर १७९३) जॉन हंटर यांचा जन्म स्कॉटलंडमधील पूर्व किलब्रिज या शहराजवळील काल्डरवूड या गावी झाला. शल्यचिकित्सक भाऊ हंटर यांच्याकडे जॉन यांनी शव विच्छेदनाचे कार्य सुरू केले. पुढील बारा वर्षांमध्ये त्यांनी जवळजवळ दोन हजार प्रेतांचे विच्छेदन करून विविध आजारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभ्यासासाठी गरोदर महिलांची प्रेते मिळावीत म्हणून त्यांनी प्रयत्न केले. गरोदरपणी रक्तदाब वाढल्यामुळे आणि मूत्रातील प्रथिनाचे प्रमाण वाढल्यामुळे त्या काळात हे मृत्यू होत असत. आजच्या काळात अशा कारणांनी मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे पण उपचारांअभावी तेव्हा अनेक जॉन हंटर यांनी आपला अभ्यास अखंडपणे चालू ठेवला. आपल्या अभ्यासातून त्यांनी वैद्यकीय क्षेत्राला उपयोगी  पडणारी माहिती त्यांनी गर्भधारणा झालेल्या गर्भाशयाची रचना या शीर्षकाच्या अंतर्गत उपलब्ध करून ठेवली आहे. या अभ्यासात त्यांनी ४ स्त्रियांच्या गर्भाशयाचा अभ्यास केला होता. दुर्दैवाने या चारी स्त्रियांचा गर्भवती असतांना मृत्यू झाला होता. रक्तदान करणारे लोक त्या काळात भरपूर होते आणि त्यावेळी त्यासाठी फारसे नियम ठरविलेले नव्हते. त्यामुळे शारीरिक आजार असलेले लोकदेखील रक्त दान करीत असत. जॉन हंटर यांनी अशा जमा केलेल्या रक्ताचा भरपूर अभ्यास केला.

शरीराच्या एखाद्या भागावर जी सूज येते त्याचे कारण शरीरातील संरक्षक प्रणाली त्यावेळी कार्यरत असते आणि सूज हा त्याचा परिणाम असतो, सूज म्हणजे रोग नव्हे हे त्यांनी आपल्या अभ्यासातून सांगितले.  वैद्यकीय इतिहासात त्यांनी आणखी एक महत्त्वाचे काम केले आहे. एका स्त्रीला मूल होत नव्हते तेंव्हा तिच्या नवऱ्याच्या शुक्रबीजांचे कृत्रिम पद्धतीने रोपण करून तिला गर्भधारणा करून दाखविण्यात त्यांना यश आले होते. मानवाच्या शरीरात कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा होण्याचे हे पहिलेच नोंदलेले उदाहरण आहे.

हे काम करीत असतांनाच दरम्यानच्या काळात इ. स. १७५४ मध्ये जॉन यांनी शल्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून लंडनच्या सेंट जॉर्ज इस्पितळात प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम यशस्वीपणे पुरा केला. इ. स. १७६० मध्ये त्यांनी सैन्यामध्ये शल्यचिकित्सक म्हणून नोकरी स्वीकारली. सैन्यात दोन वर्षाच्या काळात विविध  प्रकारच्या जखमा हाताळण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाला. दोन वर्षांनी परत लंडनला आल्यावर प्रशिक्षणार्थी म्हणून कामाचा अनुभव नाही म्हणून त्यांना काम मिळण्यास बराच त्रास झाला. काही वर्षे दंतवैद्याकडेदेखील उमेदवारी करावी लागली. जर दात आकाराने योग्य असेल आणि दात्याकडून मिळाल्याबरोबर लावला तर घेणाऱ्याचे शरीर असा दात स्वीकारू शकेल असे त्यांना वाटत होते. त्यांच्या एका रुग्णाला त्यांनी अशा पद्धतीने ३ दात बसवून दिले आणि ते जवळजवळ ६ वर्षे टिकले अशी नोंद आढळून येते. शेवटी इ. स. १७६८ साली त्यांना शल्यचिकित्सक म्हणून मान्यता मिळाली. त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. एडवर्ड जेन्नर त्यांच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकून गेले. इ. स. १७६७ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. इ. स. १७७६ मध्ये त्यांची तिसऱ्या जॉर्ज राजाचा शल्यचिकित्सक म्हणून नेमणूक झाली. राजाचे सर्व प्राणीसंग्रहालय त्यांना आपल्या अभ्यासासाठी उपलब्ध झाले. त्यांना राजाचा हत्ती मृत झाल्यावर त्याचे शव विच्छेदन करण्याची संधी प्राप्त झाली होती. वैद्यकीय  इतिहासातील हत्तीच्या शव विच्छेदनाचे हे पहिलेच उदाहरण होते.

हंटर यांनी ‘गनोरिया’ या लैंगिक रोगाचा अभ्यास केला होता. त्यासाठी प्रतिबंधक लस तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांचे या विषयावर लिहिलेले पुस्तक मात्र वैद्यकीय इतिहासात ज्ञानाची भर टाकणारे होते. त्यांनी बरीच पुस्तके लिहिली. त्यात नॅचरल हिस्टरी ऑफ ह्युमन टूथ; ए ट्रीटाईज व गनोरियल डिसीजेस; ए ट्रीटाईज ऑन ब्लड इंफ्लेमेशन आणि गन शॉट वून्ड्स यांचा समावेश होता. त्यांनी इ.स. १७८३ मध्ये जे संग्रहालय निर्माण केले त्याचा आवाका आश्चर्यकारक होता. या संग्रहालयात ५००० हून अधिक फॉरमॅलीन प्ररक्षित ओले नमुने, ३००० हून अधिक भुसा भरलेले प्राणी आणि त्यांच्याशी संबंधित वाळविलेले नमुने, १२०० जीवाष्म, जवळजवळ एक हजार सांगाडे आणि हजारापेक्षा अधिक रोगट अवयव होते. हा सर्व विज्ञानसमृद्ध  खजिना नंतर ब्रिटिश सरकारने रीतसर आपल्या ताब्यात घेतला आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सकडे सुपूर्द केला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे