माल्पिघी, मार्सेलो : (१० मार्च १६२८ – ३० नोव्हेंबर १६९४) बोलोन्याजवळील क्रेवाल्कोरमध्ये मार्सेलो यांचा जन्म झाला. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी बोलोन्या विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांना बोलोन्या विद्यापीठाने वैद्यक आणि तत्त्वज्ञान या दोन्ही क्षेत्रातील डॉक्टरेट दिली. त्यानंतर त्यांना अध्यापनाचे काम मिळाले. तुस्कानीचे दुसरे फर्डिनांड, यांनी माल्पिघी यांना पिसा विद्यापीठात सैद्धांतिक वैद्यकशास्त्रात प्राध्यापकपद देऊ केले. वयाच्या केवळ अठ्ठाविसाव्या वर्षी माल्पिघी यांची पिसा विद्यापीठाने प्राध्यापकपदी नेमणूक केली. निरीक्षणे करणे, प्रत्यक्ष प्रयोग करणे, त्यातून ज्ञान मिळवणे ही माल्पिघीं यांची पद्धत होती. पण त्यांना झालेल्या विरोधामुळे व प्रकृती अस्वास्थ्यामुळे माल्पिघी इटालीत बोलोन्या येथे परतले.
माल्पिघी यांनी हार्वे यांच्या शोधानंतर तेहेत्तीस वर्षांनी केशिका (केशवाहिन्या- capillaries) धमनी आणि शिरा यांचा दुवा असलेल्या अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांचा शोध लावला. माल्पिघी यांच्या शोधांनी सतराव्या शतकातील भ्रूणशास्त्र, ऊतीशास्त्र, विकृतीशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांचा चेहरामोहराच बदलून टाकला. दुसऱ्या शतकातील प्रसिद्ध ग्रीक वैद्यकतज्ज्ञ, तत्त्वज्ञ गेलन, यांच्या कालापासून कित्येक शतके वैद्यकशास्त्रात काही समजुती प्रचलित होत्या. पण त्या समजुती माल्पिघी यांच्या सूक्ष्मदर्शक वापरण्याच्या प्रत्यक्ष पुराव्यामुळे बदलल्या.
विल्यम हार्वे यांना हृदय, धमन्या आणि शिरा माहीत होत्या. कारण नुसत्या डोळ्यांनी हेच भाग दिसू शकत. माल्पिघी यांनी सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने बेडकाच्या फुफ्फुसांच्या अंतर्भागाचे बारकाईने निरीक्षण केले. सूक्ष्मदर्शकामुळे त्यांना हवा भरलेल्या फुफ्फुसाच्या पातळ पारदर्शक भिंतीत केशिका दिसू शकल्या. फुफ्फुसात हवा आणि रक्त एकमेकांत मिसळतात असा अंदाज त्यांनी केला. कारण त्यांना फुफ्फुस धमन्या, फुफ्फुस नीला तसेच केशिका दिसल्या होत्या.
प्रा. बोरेली या माल्पिघी यांच्या मित्राने त्यांना इटालीच्या सिसिली बेटावरील विद्यापीठाच्या अध्यापक वृंदात जाण्याचे सुचवले. तेथे त्यांना व्हिस्कॉंती ज्याकोमो रूफो फ्रान्क्विला या विज्ञानप्रेमी प्रतिष्ठित घराण्यातील जुन्या विद्यार्थ्यांचाही पाठिंबा मिळाला. तेथेच माल्पिघी अध्यापन आणि संशोधन करत राहिले.
माल्पिघी यांनी यकृत, प्लीहा (spleen), वृक्क (kidney) अशा इंद्रियांच्या सूक्ष्मरचनेचा ऊतींचा अभ्यास केला. प्लीहेच्या अंतर्भागाच्या रचनेने त्यांनी दिलेले तपशील अचूक होते. त्यांच्या सन्मानार्थ प्लीहेच्या घटकांना माल्पिघीयन पिंड (Malpighian corpuscles of the spleen) असे नाव देण्यात आले. प्लीहेतील भाग क्वचित विकृत वेगाने वाढतात. हे त्यांचे निरीक्षण थॉमस हॉजकिनना प्लीहेच्या कर्करोगाचा अभ्यास करण्यास उपयोगी पडले. नंतर अधिक सखोल काम झाल्यावर या अपसामान्यतेला ‘हॉजकिन्स डिसीज’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
मूत्रपिंडांच्या सूक्ष्मरचनेची त्यांनी काढलेली चित्रे आणि लिहून ठेवलेले बारकावे यांच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी मूत्रपिंडांतील कणांसारख्या भागाना माल्पिघीयन कणिका हे नाव (Malpighian corpuscles of kidneys) दिले गेले. मूत्रपिंडांतील मोठे, डोळ्याना सहज दिसू शकणारे द्रोणांसारखे भाग माल्पिघीयन पिरॅमिड्स (Malpighian pyramids) नावाने परिचित झाले आहेत.
माल्पिघी यांना कीटकांना फुप्फुसे नसतात. पण शरीरात हवा येण्या-जाण्यासाठी छिद्रे असतात. कीटकांच्या शरीरात उत्सर्जनासाठी आतड्याला चिकटून अतिसूक्ष्म नलिकांचे जाळे असते हे त्यांनी शोधून काढले. अशा नलिकांना माल्पिघीयन सूक्ष्म नलिका (Malpighian tubules) म्हणतात.
त्यांनी लिहिलेल्या द पॉलीपो कॉर्डीस या ग्रंथात रक्त साकळण्यासबंधी निरीक्षणे नोंदून ठेवली आहेत. अखंड आणि कापल्या गेलेल्या, अशा दोन्ही प्रकारच्या रक्तवाहिन्यांतील रक्ताबद्दल त्यात वर्णने आहेत. हृदयाच्या उजव्या आणि डाव्या कप्प्यांतील (अनुक्रमे ऑक्सिजनचे प्रमाण कमी आणि जास्त असल्याने) रक्ताच्या रंगात फरक असतो हे निरीक्षणही त्यात नोंदले आहे. माल्पिघी यांना त्याकाळात फायब्रिनोजेन हे प्रथिन माहीत नव्हते. पण रक्तगाठ सावकाश घट्ट होत जाताना पाहून धाग्यांचे जाळे गाठीला आधार ठरत असावे असा कयास त्यानी बांधला. तो नंतर खरा ठरला. जास्त प्रगत तंत्रज्ञानामुळे, नव्या उपकरणांमुळे, रासायनिक प्रक्रियांच्या सखोल ज्ञानामुळे, कालांतराने या साऱ्या रचनांबद्दल अधिक अचूक आणि सविस्तर माहिती उपलब्ध झाली.
माल्पिघी यांच्या बोलोन्या, पिसा, मेसिना विद्यापीठांतील अनेक प्रकारच्या संशोधनाची माहिती मिळाल्यावर द रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे सचिव हेन्री ओल्डेन्बर्ग यांनी त्यांना आपल्या संशोधनाबद्दल कळवण्याची विनंती केली. मग त्यांनी रेशीम कीटकाच्या संशोधनाची माहिती कळवली. द रॉयल सोसायटीच्या फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्समध्ये नियमितपणे त्यांचे लिखाण प्रसिद्ध होऊ लागले. माल्पिघी यांना द रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे मानद सदस्यत्व देण्यात आले. असे सदस्यत्व मिळालेले ते पहिलेच इटालियन नागरिक होते. काही काळाने द रॉयल सोसायटीने माल्पिघी यांच्या कामाचे महत्त्व ओळखून दोन खंडांमध्ये त्यांचा पत्रव्यवहार प्रकाशित केला. त्यात प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र अशा दोन्ही ज्ञानशाखांचा समावेश आहे. पुढे या खंडांच्या आणखी दोन आवृत्त्या निघाल्या.
वनस्पतींची मुळे, खोडे, साली, बिया, त्यांचे अंकुरण, कीटकांनी अंडी खुपसून ठेवल्यामुळे नंतर वनस्पतींमध्ये वाढणाऱ्या गाठी म्हणजे गॉल फॉर्मेशन (gall formation) यांचे त्यांनी निरीक्षण केले. माल्पिघी यांनी फुलांतील इंद्रियांची चित्रे काढून ठेवली. काही चित्रांत माल्पिघी यांनी मकरंद (nectar) स्रवणाऱ्या ग्रंथी दाखवल्या आहेत. त्यांचे वनस्पतीविषयक लेखन नीट जतन न केल्याने, दीर्घकाळ अनुपलब्ध होते. त्यांच्या निधनानंतर सुमारे शंभर वर्षांनी ते लिखाण सापडले. तेव्हा त्यांच्या वनस्पतीज्ञानाचे कौतुक लीनियस या अग्रगण्य स्वीडिश वर्गीकरण शास्त्रज्ञाने एका वनस्पतीकुलाचे नाव माल्पिघीएसी ठेऊन केले.
रक्तातील तांबड्या पेशी (erythrocytes) माल्पिघी यांनी पाहिल्या आणि त्यांचे वर्णन लिहून ठेवले. जॅन स्वॅमरडन यांनी रक्तातील तांबड्या पेशी माल्पिघी यांच्यापूर्वी पाहिलेल्या होत्या. परंतु त्यांच्यापेक्षा जास्त बारकावे माल्पिघी यांनी नोंदविले. माणसाच्या कातडीतील आतल्या थराचे वर्णन त्यांनी लिहून ठेवले. कालांतराने या थराला त्यांचे नाव (Malpighian layer) देण्यात आले. हाडांच्या व अस्थिमज्जा (bone marrow) शोथ – दाह (osteomyelitis अस्थिशोथ) अभ्यास त्यांनी केला. जिभेच्या वरील पृष्ठभागावर सूक्ष्म अंकुरक (papillae) असतात. हे अंकुरक चेतातंतूच्या टोकाशी वसलेले असतात हे माल्पिघी यांच्या लक्षात आले. त्यांचा उपयोग रुची संवेग वहनात होत असावा असा अंदाज त्यानी नोंदून ठेवला. मेंदू रचनेचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी मेंदू ही ग्रंथी आहे असे मानले. आता नव्या संशोधनानंतर ही समजूत बदलली आहे.
कोंबडीच्या अंड्यात वाढणाऱ्या भ्रूणाचा अभ्यास करून प्रख्यात रॉयल सोसायटीसाठी शब्द आणि चित्रांची नोंद मालिकाच त्यांनी तयार केली. ‘द फॉरमॅतिओन पुली इन ओवो’ आणि ‘द ओवो इन्क्युबातो’ नाव धारण करणाऱ्या या नोंदींत कोंबडीच्या भ्रूणाची कवचधारी अंड्यात क्रमबद्ध वाढ कशी होते त्याबद्दल लिहिले. अंडी उबवून ठराविक तासांनी त्यांच्या भ्रूणांचा त्यांनी अभ्यास केला. अंड्यात असणाऱ्या, केवळ काही तास एवढे वय असलेल्या भ्रूणात मेंदू, नेत्रपुटिका (optic vesicle; नेत्र गोलक), हृदय, महाधमनी या भागांची वाढ कशी होते याचे वर्णन त्यांनी लिहून ठेवले. हे वर्णन आज साडेतीनशे वर्षांनीही अचूक ठरलेले आहे.
सतराव्या शतकातील एक अभ्यासू, जिज्ञासू वैज्ञानिक म्हणून माल्पिघी यांनी यूरोपात जणू शोधमालिकाच सादर केली. सूक्ष्म शरीररचनाशास्त्र, ऊतीशास्त्र, भ्रूणशास्त्र अशा जीवशास्त्रातील नवनवीन शाखांचे जनक म्हणून त्यांचे नाव झाले.
त्यांची बारावे पोप इनोसन्ट यांचा वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली गेली.
मेंदूत अचानक झालेल्या रक्तस्रावामुळे त्यांचा रोम येथे मृत्यू झाला. बोलोन्यातील त्यांच्या संगमरवरी मृत्यूशिलेवर त्यांच्या जीवनाचे सार नोंदविले आहे. त्यातील लॅटीन शब्द आहेत Summum Ingenium, Integerrimam Vitam, Fortem Strenuamque Mentem, Audacem Salutaris Artis Amorem त्याचा मराठी भावार्थ होईल, ‘असामान्य बुद्धिमत्ता, आयुष्यभराची प्रामाणिकता, कणखर आणि खंबीर मन आणि वैद्यक शास्त्राबद्दल डोळस अपार प्रेम.’
संदर्भ :
- https://meridian.allenpress.com/aplm/article-split/123/10/874/452098/Marcello-Malpighi
- https://www.youtube.com/watch?v=b6imeoBjMBc चित्रफीत
- Howard Adelmann, Marcello Malpighi and the Evolution of Embryology, 5 vol. (1966).
- Discorso sul Malpighi (1965), a critical analysis in Italian of Malpighi as a man & a scientist.
- Malpighi’s treatise De polypo cordis (1666). https://www.ncbi.nlm.nih.gov/ .. J M Forster
समीक्षक : मोहन मद्वाण्णा