तिलापिया हे कोलोटिलापिनी (Coelotilapini), कॉप्टोडोनिनी (Coptodonini), हेटेरोटिलापिनी (Heterotilapini), ओरिओक्रोमिनी (Oreochromini), पेल्माटोलापाइन (Pelmatolapiine), टिलापाइन (Tilapiine) या जमातीतील (Tribes) सिक्लिड माशांच्या सुमारे १०० प्रजातींचे सामान्य नाव आहे. हे मासे मुख्यत: ओढे, नाले, तलाव, नद्या यांमध्ये आढळतात. हे गोड्या पाण्यातील मासे असून ते खाऱ्या पाण्यात अत्यंत कमी प्रमाणात आढळतात. कॉप्टोडोनिनी आणि ओरिओक्रोमिनी या जमातीतील तिलापिया मासे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. कारण प्रथिनांचा मोठा स्रोत, कमी वेळात होणारी जलद वाढ, मोठा आकार, चवीला रुचकर या वैशिष्ट्यांमुळे या जमातीतील माशांची मत्स्यशेतीकरिता निवड केली जाते. जगामध्ये मत्स्यशेतीकरिता उपयुक्त जाती म्हणून कार्प व सालमन या माशांनंतर तिलापिया माशाचा तिसरा क्रमांक लागतो.
सदर नोंदीमध्ये मोझाम्बिक तिलापिया (Mozambique tilapia) या माशाचे वर्णन आले आहे. मोझाम्बिक तिलापिया हा मासा अस्थिमत्स्य उपवर्गातील सिक्लिफॉर्मिस (Cichliformes) गणातील सिक्लिडी (Cichlidae) कुलातील ओरिओक्रोमिस (Oreochromis) प्रजातीतील असून याचे शास्त्रीय नाव ओरिओक्रोमिस मोझाम्बिकस (Oreochromis mossambicus) असे आहे. हा मासा मूळचा दक्षिणपूर्व आफ्रिकेतील गोड्या पाण्याच्या नद्या व तलाव यांतील स्थानिक मासा आहे. कोलंबियामध्ये या माशाला ब्लॅक तिलापिया (Black Tilapia), तर दक्षिण आफ्रिकेमध्ये यास ब्लू कर्पर (Blue Kurper) असे म्हणतात.
तिलापिया माशाचा रंग धुरकट हिरवा किंवा पिवळसर असून शरीरावर अंधुक पट्टे असतात. प्रौढ माशाची लांबी सुमारे ३९ सेंमी. व वजन १.१ किग्रॅ.पर्यंत असते. अधिवासानुसार शरीराचा रंग व आकार यांत विविधता आढळते. याचे शरीर दोन्ही बाजूने चपटे व खोलगट असते. अन्य सिक्लिड माशांप्रमाणे याच्या कल्ल्याखालील हाडे एकत्रित होऊन दातांप्रमाणे त्यांची रचना झालेली असते. एक जटिल स्नायूसंच कल्ल्याच्या वर आणि खाली एकत्रित येऊन आणखी एका जबड्याप्रमाणे कार्य करतो. मोझाम्बिक तिलापिया मासा अत्यंत खादाड असून अनेक प्रकारचे खाद्य पचवू शकतो. त्याचे तोंड बाहेरच्या बाजूस झुकलेले असून ते जाड सुजलेल्या ओठांनी वेढलेले असते. जबड्यामध्ये शंकूच्या आकाराचे दात असतात. तिलापिया माशामध्ये पृष्ठ पर अधिक लांब असतो. पृष्ठ पराच्या दोन्ही बाजूस पार्श्वरेखा संस्था (Lateral line system) दोन ते तीन खवल्यांच्या रांगेखाली असते. पाण्याच्या तापमानाची नोंद घेणे हे पार्श्वरेखा संस्थेचे कार्य आहे. पार्श्वरेखा पृष्ठ पराच्या मागे तुटक होऊन पुढे शेपटीपर्यंत जाते.
एकेकाळी तिलापियाचा वापर जलवनस्पतींची वाढ कमी करण्यासाठी केला जात होता. यांचे खाद्य पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती तसेच काही तंतुमय एकपेशीय वनस्पती ह्या आहेत. केनियामध्ये तिलापिया माशांचा उपयोग डास प्रतिबंधक म्हणून केला जात असे. डासांच्या अळ्या हे त्याचे प्रमुख अन्न आहे. त्यामुळे डास व मलेरिया या दोन्हीचे नियंत्रण होत असे.
तिलापिया समशीतोष्ण पाण्यात सहसा जगत नाही. कारण त्याला उष्ण पाण्याची सवय आहे. ओरिओक्रोमिस ऑरिअस (Oreochromis aureus) हा निळ्या रंगाचा तिलापिया शीत पाण्यात राहतो. परंतु, पाण्याचे तापमान ७० से. झाले तर ते मृत्यूमुखी पडतात. तर काही प्रजाती ११० ते १७० से. तापमानाचे पाणी सहन करतात. थोडक्यात तिलापिया सर्वत्र आढळणारा मासा आहे. तिलापियाच्या तापमान असंवेदनशीलतेमुळे हा मासा कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. उदा., साल्टोन समुद्रातील खाऱ्या पाण्यात तिलापिया प्रजननक्षम राहतो. अशा ठिकाणी तिलापिया मासा सहज जगतो.
मानवी प्रयत्नामुळे हा मासा उष्ण व उपोष्ण कटिबंधात सोडला गेला. नव्या अधिवासात याचे स्वरूप आक्रमक, स्थानिक प्रजाती नाहीसा करणारा व सहज टिकाऊ असे बदलले आहे. यामुळे हा मासा मत्स्यशेतीसाठी अत्यंत चांगला मानला जातो. कारण तो कोणत्याही नवीन वातावरणाशी लगेच समरस होऊन जातो.
वनस्पती, प्लवक, कुजणारे अन्न, एकपेशीय जिवाणू, माशांची अंडी, माशांची छोटी पिले, जलवनस्पती, पाण्यात तळाला उगवलेल्या वनस्पती इत्यादी मोझाम्बिक तिलापिया माशाचे खाद्य आहे. हा सर्वभक्षी असल्याने कोठेही तग धरू शकतो. त्याच्या अशा सवयीमुळे मोझाम्बिक तिलापिया माशांची संख्या वाढत गेल्यास उपलब्ध अन्न कमी पडते. अशावेळी यातील मोठे मासे स्वजातीतील लहान माशांनाच भक्ष करतात.
मोझाम्बिक तिलापिया मासा दुसऱ्या महिन्यात प्रजननक्षम होतो. त्यांचे प्रजनन वेगाने घडते. मादी एका वर्षात ४–६ वेळा अंडी घालते आणि अंडी लाखांच्या संख्येत घातली जातात. प्रजनन काळात नर मासे एकत्रित येऊन स्वत:चे प्रदर्शन करतात. प्रियाराधनावेळी नर मासा मादीला आकर्षित करण्यासाठी विशेष प्रकारचा ध्वनी पाण्यात सोडतो. प्रजननावेळी नराच्या शरीरातील मूत्र व फेरामोन (संकेती रसायन) यांद्वारे मादीशी संपर्क केला जातो. मादीच्या शरीरात फेरोमोनमुळे बदल होतात. नराच्या प्रबळपणाची एकदा फेरोमोनमुळे जाणीव झाली म्हणजे मादी उत्तेजित होते. प्रजनन काळात नर तिलापिया पाण्याच्या तळाशी माती उकरून घरटे बनवतो. ताकदवान नर मोठे घरटे तयार करतो. त्यामध्ये मादी भरपूर अंडी घालते. नर अंडी फलित करतो. नर मासा घरट्याची राखण करतो. तसेच तो पाण्यातील अनेक कोनाडे, परिसर आपल्या ताब्यात घेतो. कारण मादी सर्व अंडी स्वत:च्या तोंडामध्ये घेऊन संरक्षणासाठी फिरत असते. फलित अंड्यांमधून पिले बाहेर येतात. अधून मधून ही पिले मादीच्या तोंडातून बाहेर येतात व पुन्हा मादीच्या तोंडात आश्रयासाठी जातात. या प्रकारास ‘मुख वाढवण’ (Mouth brooding) असे म्हणतात. मादी नर माशास फक्त प्रजनन काळात जवळ येण्याची संधी देते. एरवी मोझाम्बिक तिलापिया त्याच्या जीवनचक्रात अत्यंत आक्रमक व हल्लेखोर म्हणून प्रचलित आहेत. याचा आयु:काल सुमारे ११ वर्षांचा आहे.
मोझाम्बिक तिलापिया अत्यंत कणखर अशी प्रजाती आहे. प्रजनन व मस्त्यव्यवसायासाठी तुलनने सोपी आहे. त्यांचे मांस दिसण्यास पांढरे आणि खाण्यास अत्यंत चविष्ट असते. जागतिक पातळीवरच्या मस्त्यशेतीमध्ये तिलापियाच्या प्रजातीचे प्रजनन व व्यावसायिक शेतीतील प्रमाण साधारणत: ४% एवढे आहे. मोझाम्बिक तिलापियाची वाढ ही मंद गतीने होते. परंतु, याच्या संकरित जाती अतिजलदपणे वाढतात, तसेच विविध अधिवासात त्या सहजपणे तग धरू शकतात. या माशांमध्ये संकरीकरणाची उच्च क्षमता आहे. यामुळे मत्स्यशेतीमध्ये याच्या अधिकाधिक संकरित जातींचा उपयोग केला जातो.
मोझाम्बिक तिलापिया मासा १९५२ मध्ये भारतामध्ये आणला गेला व विविध मत्स्यकेंद्रांमध्ये त्याची पैदास करण्यात आली. सुरुवातीला मत्स्यकेंद्रामध्ये वाढविला जाणारा हा मासा नंतर नद्या, धरणे, तलाव यांमध्ये सोडण्यात आला. भारतामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाला. परंतु, वेगाने प्रजनन होत असल्याने त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. याचा परिणाम म्हणून माशांच्या स्थानिक प्रजाती नष्ट होऊ लागल्या. १९५९ मध्ये भारतीय मत्स्य संशोधन समितीने मोझाम्बिक तिलापिया माशाच्या प्रसारावर बंदी घातली होती. सद्यस्थितीमध्ये तिलापिया मासा जगातील ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. महाराष्ट्रात या माशाला तिलापी मासा, चिलापी मासा किंवा डुक्करमासा असेही म्हणतात.
१९७० च्या शेवटी भारताला नाईल तिलापियाची (Oreochromis niloticus) ओळख झाली. मत्स्योपादनासाठी या माशामध्ये जनुकीय बदल केला गेला. २००५ मध्ये यमुना नदीमध्ये नाईल तिलापियाची संख्या नगण्य होती. परंतु, यानंतर दोन वर्षांमध्येच यमुना नदीतील एकूण माशांच्या प्रजातींपैकी या माशांची संख्या ३.५% एवढी अधिक झाली. तर २०१५ मध्ये गंगा नदीतील नाईल तिलापिया माशांची संख्या तेथील एकूण माशांच्या प्रजातींच्या ७% ने अधिक होती.
मोझाम्बिक तिलापिया हा कोणत्याही प्रदूषित ते अत्यंत प्रदूषित पाण्यात (उदा., जैविक, रासायिक, अम्लयुक्त, अल्कलीयुक्त इत्यादी पाण्यात) देखील प्रतिरोध करू शकतो. म्हणूनच यास जैवआमापन जीव (Bioindicator) असे म्हटले जाते. दक्षिण आफ्रिकेमध्ये या माशाचा उपयोग पाण्यातील विषाच्या तीव्रतेचे प्रमाण जाणून घेण्यासाठी व पाण्यातील धातूचे प्रमाण मोजण्यासाठी तसेच इतर माशांवर होणाऱ्या परिणामांवरच्या अभ्यासासाठी केला जातो. हा मासा प्रदुषित पाण्यात वाढत असल्यामुळे जड धातूसारखे अतिशय घातक घटक काही प्रमाणात त्याच्या शरीरात साठून राहतात. त्यामुळे हा मासा खाणाऱ्याला त्याचा त्रास होऊ शकतो, असे काही अभ्यासकांचे मत आहे. तिलापिया मासा पाण्याच्या तळाशी माती उकरून घरटे बनवत असल्याने ज्या पाण्यात याचे प्रमाण अधिक आहे अशा ठिकाणचे पाणी गढूळ दिसते. नद्यांच्या वाढत्या प्रदूषणामुळे स्थानिक माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. तसेच तिलापिया माशांच्या वाढत्या संख्येमुळे सद्यस्थितीत माशांच्या स्थानिक प्रजाती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याचा मासेमारीवर देखील विपरीत परिणाम होत आहे. तसेच स्थानिक पाण्याच्या स्रोतांमधील तिलापियांची अमर्याद वाढ ही गंभीर पर्यावरणीय समस्या बनली आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने तिलापिया ही जाती स्थानिक माशांच्या प्रजातींना धोकादायक असणारी अत्यंत आक्रमक जाती म्हणून घोषित केली आहे.
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Mozambique_tilapia
- https://thefishsite.com/articles/tilapia-farming-in-india-a-billion-dollar-business
- https://thefishsite.com/articles/tilapia-life-history-and-biology
- https://nfdb.gov.in/PDF/GUIDELINES/1.%20Guidelines%20for%20Responsible%20Farming%20of%20Tilapia%20in%20India.pdf
समीक्षक : नंदिनी देशमुख