राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान : (स्थापना: १ जानेवारी १९६६) वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान संस्थेच्या (सीएसआयआर) नियमाप्रमाणे या संस्थेचे कार्य चालते. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे मुख्य कार्य गोव्याच्या दोना पावला येथून चालते. याशिवाय कोची, मुंबई आणि विशाखापट्टणम येथे समुद्रविज्ञान संस्थेची प्रादेशिक केंद्रे आहेत. आंतरराष्ट्रीय हिंदी महासागराच्या (इंटरनॅशनल इंडियन ओशन एक्पेडिशन- आय. आय. ओ. ई.) अभ्यासात भारतातील वैज्ञानिक अनुसंधान संस्थेचा सहभाग होता. यासाठी पाच वर्षे सर्वेक्षण मोहीम चालू होती. सर्वेक्षणात अरबी समुद्र बंगालचा उपसागर व हिंदी महासागराचा सखोल अभ्यास करण्यात आला. सर्वेक्षणात लक्षात आलेली बाब म्हणजे जगभरातील इतर सागरांपेक्षा भारताभोवती असलेल्या सागरी क्षेत्राची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. भारताच्या किनारपट्टीजवळील सागरी क्षेत्रात तेल संशोधन जैवविविधता, उत्पन्नाचे स्रोत, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, सागरी मोती उत्पादन या सर्वांच्या संशोधनासाठी समुद्रविज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली.
राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे उद्दिष्ट भारतीय सागरी क्षेत्राबद्दलचे ज्ञान वृद्धिंगत करणे व मिळवलेल्या ज्ञानाचा सावर्जनिक हितासाठी उपयोग करणे असे आहे. या संस्थेमध्ये जैवविज्ञान, रसायनविज्ञान, भूगर्भशास्त्र आणि भूभौतिकविज्ञान या पारंपारिक विज्ञान शाखा व सागरी अभियांत्रिकी, सागरी उपकरणे आणि सागरी पुरातत्त्वविज्ञान यावर संशोधन केले जाते.
समुद्रविज्ञान संस्थेमधील संशोधनात विविध सागरी प्रक्रिया, सागरी जलस्रोतांची हालचाल, समुद्राच्या पातळीतील वाढ, जैवविविधता, सागरी अन्नसाखळी, खोल पाण्यात व किनाऱ्याजवळील जीवांची मुबलकता, पर्यावरणातील बदलांचा जैवविविधतेवर व अन्नसाखळीवरील परिणाम, सागरी अभियांत्रिकी, सागरी पाण्यातील कार्बनी अन्नकण, जलजीवापासून औषधे व उपयुक्त घटक वेगळे करणे, मानवी हस्तक्षेपामुळे सागरी अधिवासातील बदल, कार्बन-डायऑक्साइड ग्रहण क्षमतेवरील परिणाम, सागरी उपयुक्त जीवांची वाढ, भक्षक जीवापासून त्यांचे रक्षण, सागरी खनिज संपत्तीचा शोध, सागरतळाचे अचूक नकाशे, खनिज तेलाचा शोध, सागरी तळातील बदल, सागरी तळाची निरीक्षणे व रेखाटने करण्यायोग्य यंत्रमानवाचा उपयोग, सागरी संशोधनासाठी उपकरणे विकसित करणे आणि त्यांचा व्यापारी उपयोग अशा विविध कामांचा समावेश होतो. जगभरातील सागरी माहितीची देवाणघेवाण व्यापारी तत्त्वावर करण्यात ही संस्था अग्रेसर आहे. सागरी पुरातत्त्व संशोधनात ऐतिहासिक नौकानयनाचे मार्गव सागरी किनाऱ्याजवळील मानवी संस्कृतीचा अभ्यास येथे केला जातो.
राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेमार्फत समुद्रकिनाऱ्याजवळील सागरी क्षेत्राच्या अभ्यासासाठी पुढील सेवा पुरवली जाते. सागरतळाच्या पृष्ठभागाचे नकाशे बनवणे, सागरतळाखालील भूपृष्ठाची व त्याखाली असलेल्या माती, वाळू खनिजे यांची माहिती, तळाशी साठलेल्या गाळाचे पृथक्करण, बंदरात जहाजांना येण्याच्या व जाण्याच्या मार्गाचे नवीनीकरण व आरेखन, सागरी क्षेत्रातील पर्यावरण विषयक बदलांची नोंद ठेवणे, लाटा, पाणी, क्षारता व खाड्यांचा सतत अभ्यास इत्यादी. ज्या ठिकाणापासून भरती रेषा सुरू होते तेथून पुढे सागरात असलेल्या उथळ क्षेत्रास भूखंड मंच म्हणतात. मासेमारी, मस्यव्यवसाय करणाऱ्या बोटी यांच्या दृष्टीने भूखंड मंच हा मासे, कालवे माशांची पिल्ले, शेवंडे, मोती उत्पादन, समुद्र वनस्पती उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सुमारे ऐंशी टक्के सागरी अन्न या भागातून मिळते. या भागात होणारे प्रदूषण पूर्ण उत्पादन धोक्यात आणू शकते. समुद्रविज्ञान संस्था भूखंड मंचावरील सागरी क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांची नोंद ठेवते. सागरी पाण्यात अपघाताने सोडलेले बोटीमधील तेल तवंगाच्या रूपाने किनारपट्टीवर भयंकर परिणाम करतात. अशा तेल तवंगास प्रतिबंध, पृथक्करण व उपाय सागरी विज्ञान संस्थेमार्फत सुचवले जातात. पाण्याखाली जाऊन प्रत्यक्ष निरीक्षण करणे हा समुद्रविज्ञान संस्थेच्या कामाचा नेहमीचा भाग आहे.
समुद्रविज्ञान संस्थेच्या तीन प्रादेशिक केंद्रामध्ये कामाचे नियोजन झालेले आहे. गोवा येथील मुख्य समुद्रविज्ञान संस्थेव्यतिरिक्त मुंबईमधील उपकेंद्रात सागरी प्रदूषण त्याचा जैवसृष्टीवर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला जातो. सागरी रसायनविज्ञान, जीवविज्ञान व भौतिकविज्ञानाशी निगडित सागरी पर्यावरण समस्यावर उपाय सुचवले जातात. विशाखापट्टणम येथील उपकेंद्रात मुंबई उपकेंद्राप्रमाणेच काम केले जाते. फक्त बंगालचा उपसागर व अंदमान निकोबारपर्यंतचे सागरी क्षेत्र या उपकेंद्राच्या अखत्यारीत येते. कोची केंद्रामध्ये सागरी जीवशास्त्र आणि त्याच्याशी निगडित रसायनशास्त्र यावर संशोधनावर केले जाते. सागरी जैव-विविधता, प्रवाळांचे आरोग्य, सागरांची खाद्यान्न उत्पादन क्षमता आणि सागरी जीव व जीवाणुंपासून औषध निर्मितीची शक्यता या प्रमुख विषयांवर कोची केंद्रात भर दिला जातो.
संदर्भ :
समीक्षक : मोहन मद्वाण्णा