रेडिंग्टन, फ्रॅंक मिशेल :  (१० मे १९०६ – २३ मे १९८४) लंडनमधील लीड्स येथे फ्रॅंक मिशेल रेडिंग्टन यांचा जन्म झाला. रेडिंग्टन लिव्हरपूल येथील प्राथमिक शाळेत आणि नंतर लिव्हरपूल इन्स्टिट्यूटमध्ये शिकले. लहान वयातच हृदयाला झालेल्या जंतुसंसर्गामुळे, शाळेत त्यांची दीर्घकाळ अनुपस्थिती असे. तरीही परीक्षांमध्ये ते नेहमीच अव्वल ठरत. गणित हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. गणितातील विशेष नैपुण्यामुळे त्यांना खुल्या शिष्यवृत्तीसह केंब्रिजच्या मॅग्डेलेन महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला.

केंब्रिजमधील ट्रायपॉस त्यांनी सन्मानासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. गणिताची आवड असूनही त्यात व्यावसायिक कारकीर्द करणे पसंत नसल्यामुळे त्यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअरिजची विमाशास्त्राची परीक्षा यशस्वीपणे दिली.

रेडिंग्टन, त्या काळातील लंडनस्थित बहुदेशीय आणि नामांकित प्रुडेंशियल कंपनीमध्ये, प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले. तेथे त्यांना अधिछात्रवृत्ती मिळाली. कामासाठी त्यांना मूल्यांकन आणि सांख्यिकी हा खास विभाग मिळाला. इथे विमाशास्त्रातील अत्यंत वैविध्यपूर्ण समस्या सोडविल्यामुळे त्यांना लहान वयातच प्रुडेंशियलमध्ये सहाय्यक विमाशास्त्रज्ञ नेमले गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर विमा व्यवसायाच्या गरजा बऱ्याच वाढल्यामुळे रेडिंग्टननी प्रुडेन्शियल विमा कंपनी ज्या ज्या देशांत व्यवसाय करत होती, तेथील विमाहप्त्त्यांच्या दरांमध्ये सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. ना-नफा करारांसाठी त्यांनी संशयाचे वादळ वाढवणे ही संकल्पना वापरली. या संकल्पनेनुसार अल्प-मुदतीच्या विमापत्रांपेक्षा दीर्घ-मुदतीच्या विमापत्रांवरील हानीची जोखीम अधिक असते. त्यामुळे रेडिंग्टननी विमापत्रांवर शुल्क आकारण्याच्या तत्कालीन पद्धतीत बदल करून, ना-नफा दीर्घ-मुदतीच्या विमापत्रांवर अधिक शुल्क तर अल्प-मुदतीच्या विमापत्रांवर कमी शुल्क आकारले. याचबरोबर त्यांनी गतकालीन आधारसामग्रीचे विश्लेषण करून शुल्क आकारणीसाठी नवीन गणिती सूत्रे तयार केली. त्याकाळी परदेशांतील व्यवसाय महत्त्वाचे ठरल्यामुळे त्यांनी प्रुडेंशियलच्या नफ्याचे मूल्यांकन देशानुसार करण्यासाठी सुधारित पद्धती प्रचलित केल्या.

रेडिंग्टन प्रुडेन्शियलचे मुख्य विमाशास्त्रज्ञ झाले आणि सेवानिवृत्तीपर्यंतची सतरा वर्षे ते या पदावर होते. रेडिंग्टन यांच्या गुणवत्तापूर्ण दूरदृष्टीचा उपयोग विमा व्यवसायाला अनेकप्रकारे झाला. रेडिंग्टननी हेरले की, सर्व देशांमधील एकच अधिलाभांश दर तेथील विमापत्रधारकांसाठी फार काळ योग्य ठरणार नाही. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी कोणत्याही देशांतील अधिलाभांश दर कमी न होऊ देताच कंपनीच्या मूळ आवक संपत्तीतच स्थानिक पातळीवर भर घालण्याचे उपाय योजून वित्तीय शिस्त कायम ठेवली. रेडिंग्टन यांनी त्याशिवाय विमापत्रधारकांना अंतरिम अधिलाभांश न देता अंतिम अधिलाभांश देणे, हे धोरण राबविले तसेच विमापत्रधारकांची गुंतवणूक प्रतिक्षम करण्याची म्हणजे सुरक्षित राहील याची खबरदारी घेतली.

निवृत्तीवेतन योजना लाभकारी ठरण्याच्या दृष्टीने ना-नफा गुंतवणूक करार योग्य ठरणार नाहीत, हे ओळखून रेडिंग्टननी नफ्यासहीत करार सुरू केले. विमाकाराच्या वित्तपुरवठ्याला योग्य दिशा देणे हे विमाशास्त्र आणि गुंतवणूक धोरण यांच्यामधील सुमेळावर अवलंबून असते, हे उमजून त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांशी सतत संवाद साधला.

सन १९५० मध्ये समभागांच्या आणि मालमत्तेच्या भांडवली मूल्यांद्वारा लोकांच्या उत्पन्नांत झालेली वाढ इतकी मोठी आणि अचानक होती की आयुर्विमापत्रधारकांना उचित फायदा देण्यासाठी पारंपरिक प्रत्यावर्ती अधिलाभांश प्रथा कुचकामी असल्याचे जाणून रेडिंग्टननी अंतिम अधिलाभांश वितरीत करण्याची पद्धत प्रुडेन्शियलमधून सुरू केली. ती नंतर इतर विमा कंपन्यांतूनही प्रचलित झाली.

लाइफ ऑफिसेस असोसिएशनचे (एलओए) उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना रेडिंग्टनना विमा उद्योगासाठी खूप महत्त्वाची कामे करता आली. उदाहरणार्थ, १९५६ मधील भारतातील जीवनविमा कंपन्यांच्या राष्ट्रीयीकरणानंतर, परदेशी विमाधारकांना मिळणाऱ्या भरपाईच्या अटींवर चर्चा करण्यासाठी भारतभेटीवर आलेल्या एलओएच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व रेडिंग्टननी यशस्वीपणे केले.

एलओएच्या अध्यक्षपदी असताना रेडिंग्टननी तत्काळ-वार्षिकीवरील कर आकारणी जवळजवळ व्याजदराइतकी केली. तसेच स्वयंरोजगाऱ्यांसाठीचे निवृत्तीवेतन त्यांनी सामान्य नोकरदारांच्या निवृत्तीवेतनाच्या योजनेतील तत्त्वांशी सुसंगत केले. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनांना वित्तपुरवठा करणे, हे त्यांच्यासाठी विशेष आवडते आव्हानात्मक काम होते. एलओएचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन मंडळ आणि स्कॉटिश कार्यालये यांच्या संयुक्त मंडळावर त्यांनी अध्यक्ष या नात्याने केलेले काम पुढील कामांना पूरक ठरले. वित्तपुरवठ्याचा संबंध उद्योग आणि व्यवसाय या दोघांतील समस्यांशी असल्यामुळे, रेडिंग्टननी आपले या क्षेत्रांतील अनुभव, कौशल्य आणि दबदबा वापरून विमाउद्योगाची भरभराट साधली. सर्व राजकीय पक्षांमध्ये जिच्यावर एकमत होईल अशी वित्तपुरवठा करणारी स्थिर व्यवस्था निवडणे आणि तिचा पुरस्कार करणे, यासाठी विमा उद्योगाला मार्गदर्शन करण्याचे कठीण कामही रेडिंग्टननी केले.

रेडिंग्टन ब्रिटीश इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअरिज या संस्थेच्या कामाशी जोडलेले होते. ते इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असताना रेडिंग्टननी ब्रिटनच्या तत्कालीन राष्ट्रीय निवृत्तीधोरणाची निर्भत्सना केली होती. सध्याच्या पिढीला भरघोस निवृत्तीवेतनाची हमी आगाऊ देऊ करणे म्हणजे, भावी पिढी गहाण टाकण्यासारखे असल्याचे मत त्यांनी मांडले. राष्ट्रीय निवृत्तीवेतनावर त्यांनी प्रकाशित केलेली नॅशनल पेन्शन्स:अ‍ॅन अपील टु स्टेट्समनशिप ही पुस्तिका जनतेत निवृत्तीवेतनसंबंधी व्यापक जागृती करण्यासाठी वापरली गेली.

रेडिंग्टन यांचा ‘रिव्ह्यू ऑफ दि प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ ऑफिस व्हॅल्युएशन्स’ हा महत्त्वाचा शोधनिबंध, जर्नल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअरिज मधून प्रकाशित झाला. तोवरच्या ब्रिटीश शोधनिबंधांतील सर्वांत प्रसिद्ध मानला गेलेला हा शोधनिबंध विमा व्यवसायाबाहेरही सर्वाधिक उद्धृत होतो. विमाकंपनीच्या उत्पन्नाचे स्त्रोत आणि उत्तरदायित्त्व यांच्यातील आंतरसंबंधावर विमाशास्त्र विकसित करण्यासंबंधात हा शोधनिबंध आगळावेगळा ठरला. त्यातील प्रतिक्षमता ही रेडिंग्टनची मूलगामी संकल्पना विशेष लक्षवेधी ठरली ही संकल्पना स्थिर उत्पन्नाच्या रोखेसंग्रहाला बदलत्या व्याजदरांपासून कसे प्रतिक्षम करावे, ते निश्चित करते. एखादा रोखेसंग्रह प्रतिक्षम असेल तर त्याच्याबाबतीत रेडिंग्टन यांच्या मते पुढील दोन समीकरणे खरी ठरली पाहिजेत:

यात VL दायित्त्वाशी निगडीत रोख-जावक ओघ असून VA हा विद्यमान संपत्तीद्वारा विमाकंपनीकडील रोख-आवक ओघ आहे. दोन्हीसाठी व्याज दर एकच (d) आहे. या क्षणी जर VA = VL असे मानले आहे, पण VA हा VL पेक्षा अधिक असेल तर ती अतिरिक्त संपत्ती निधी-मुक्त मानून तिची गुंतवणूक वेगळी केली पाहिजे. व्याज दर वाढले किंवा घटले तरी दुसऱ्या समीकरणातील डाव्या बाजूची किंमत धनच राहील आणि कंपनी फायद्यात राहील.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे रेडिंग्टन प्रुडेंशियलमधून मुदतपूर्व निवृत्त झाले. तोपर्यंत त्यांनी व्यवसायाला दिलेल्या अपूर्व योगदानाचा गौरव इन्स्टिट्यूटने सुवर्णपदक देऊन केला. त्यानंतर त्यांनी गतकार्यकाळांतील समस्यांवर चिंतन करून जीवनविमा कार्यालयांचे मूल्यांकन आणि लाभांश वितरण पद्धतीवर अनेक शोधनिबंध आणि लेख लिहिले. अ‍ॅक्च्युरीज जर्नलच्या वाचकांनी ब्रिटनमधील सर्वांत महान विमाशास्त्रज्ञ म्हणून रेडिंग्टन यांची निवड केली होती. ती त्यांनी जवळपास पन्नास वर्षे विमाशास्त्राच्या आदर्श विचारांना आणि त्यांच्या मांडणीला केलेल्या योगदानाची पावती म्हणता येईल.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर