सपुष्पवनस्पती अतिशय उत्क्रांत वनस्पती असून जगभरात त्यांच्या सुमारे तीन लाखांहून अधिक प्रजाती आहेत. या सपुष्प वनस्पतींच्या वर्गीकरण अभ्यासात पुष्पसंरचनेला फार महत्त्व आहे. वर्गीकरणात केलेले पुष्परचनेचे वर्णन बऱ्याच अंशी क्लिष्ट असते आणि हे ज्ञान आकलनास सहज, सोप्या व अचूक प्रकारे मांडता यावे म्हणून पुष्पसूत्र व पुष्पचित्र या संकल्पना उदयास आल्या.
पुष्पसूत्राचा पहिला विचार कॅसल (Cassel; १८२०) यांनी केला असला तरी या कल्पनेचे मुख्य सूत्रधार मार्टियस (Martius; १८२८) मानले जातात. पुष्पसूत्रात एखाद्या रासायनिक सूत्राप्रमाणेच अक्षर व चिन्हांच्या साहाय्याने फुलातील विविध अवयवांच्या रचनेची व गुणधर्मांची संक्षिप्त रूपात माहिती दर्शविलेली असते. हे सूत्र फुलाच्या अवयवांची संख्या, त्याच्या अंडाशयाची स्थिती, बाजूंची समानता, फुलाचे लिंग अशा बाबींचा उल्लेख करते, पण यात अवयवांच्या परस्परसंबंधित जागेचा तपशील नसतो. फुलाच्या प्रत्येक अवयवाला ठरावीक अक्षर योजलेले असते तर समानता, लिंग यांसाठी चिन्ह वापरलेली असतात. विविध फुलांमधील साम्य व विसंगती या तुलनात्मक पुष्परचनेच्या अभ्यासात पुष्पसूत्राचा विशेष फायदा होतो. वर्गीकरणशास्त्रात पुष्पसूत्रांचा वापर समाविष्ट होण्यासाठी व त्यांमध्ये प्रमाणता, सुसूत्रता येण्यासाठी प्रेनर (Prenner), बेटमन (Bateman) आणि रुडाल (Rudall) यांच्या २०१० सालच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे.
जर्मन वनस्पतीतज्ज्ञ आइख्लर (Eichler; १८७५ व १८७८) यांना पुष्पचित्रनिर्मितीच्या पायाभरणीचा जनक मानले जाते. पुष्पचित्र हे फुलाच्या आडव्या छेदाचे चित्रात्मक असे द्विमितीय स्वरूप आहे. यात फुलाच्या मुख्य अवयवांचे, त्या अवयवांच्या अवस्थेचे, फुलाच्या लिंगाचे व प्रकाराचे तसेच काही प्रजातीनुरूप लक्षणीय अवयवांचे (उदा., मकरंद ग्रंथी) समजण्यास सुलभ असे चित्रीकरण केलेले असते. प्रत्येक अवयवाला निवडक चित्राने दर्शविण्यात येते व प्रामुख्याने ज्या अक्षाच्या आधारे फुलाचा आडवा छेद घेऊन चित्रीकरण केलेले असते, त्याचाही यात समावेश असतो. त्यामुळे फुलाची रचना जटिल जरी असली तरी ती पुष्पचित्राच्या माध्यमातून दर्शविणे शक्य होते. या माहितीचे स्वरूप अभ्यासकानुसार थोडेफार बदलत जाते, परंतु पुष्पचित्राचा प्राथमिक उद्देश (पुष्परचनेची सुलभता) मात्र टिकून राहतो.
पुष्पसूत्र व पुष्पचित्र या दोन्हींच्या काही त्रुटी आहेत. पुष्पसूत्रात फुलाच्या अवयवांचा आकार, त्यांची अक्षालगतची दिशा यांचा अभाव असतो, तर पुष्पचित्रात अंडाशयाची स्थिती दर्शविणे व या चित्राचा मजकुरात उल्लेख करणे कठीण जाते. हेच जर या दोन्हींचा एकत्र वापर केला तर हे एकमेकांना अधिक पूरक ठरतात व पुष्परचनेच्या गणिताचा सोयीस्कर उलगडा करतात.
संदर्भ :
- Prenner, G., Bateman, R. M. & Rudall, P. J., Floral formulae updated for routineinclusion in formal taxonomic descriptions, Taxon 59(1): 241–250, 2010.
- Ronse de Craene, L. P., Floral Diagrams: An Aid to Understanding Flower Morphology and Evolution, Cambridge University, UK. pp. 441, 2010.
समीक्षक : शरद चाफेकर