केशर : (हिं. केसर, झाफ्रॉन; गु. केशर; सं. कुंकुम; इं. मेडो क्रॉकस, सॅफ्रन क्रॉकस; लॅ. क्रॉकस सॅटायव्हस;  कुल – इरिडेसी). केशरच्या झाडाचे मूलस्थान आशिया मायनरमधील लेव्हँट होय. सध्या त्याची लागवड यूरोपमध्ये फ्रान्स, स्पेन, इटली व प. आशियात होते तसेच चीन व पाकिस्तान (क्वेटा) येथे व भारतात (काश्मीरमधील १,६४३ मी. उंचीवरील पांपूर गावी) करतात. भावप्रकाश  या संस्कृत ग्रंथात केशराचा ‘कुंकुम’ असे उल्लेख केला आहे व त्यावरून केशराचे उत्पादन व व्यापार काश्मीरमध्ये प्राचीन काळापासून चालत असावा. रोमन, ग्रीक व हिब्रू यांच्या काळी केशराची लागवड होत असे. सुरुवातीस ग्रीकांचा शाही रंग केशरी असे व केशरी रंगाचे सडे दरबारात व नाट्यगृहात टाकीत असत. बाबर व जहांगीर यांच्या काळातील लेखांत केशराच्या काश्मीरमधील व्यापाराचा उल्लेख आढळतो. तसेच फार पूर्वी सिलिशियातील कॉरीकस या गावीही केशराचे मोठे उत्पादन होत असे व कॉरीकसवरून केशराच्या वंशाला क्रॉकस  हे लॅटिन नाव मिळाले असावे. दहाव्या शतकात स्पेनमध्ये अरब लोक केशराची लागवड करीत. मध्ययुगात ते औषधी व इतर उपयोगांमुळे बरेच महत्त्वास आले होते.

केशराचे शारदीय फुलझाड लहान असून त्याला जमिनीत शल्कयुक्त घनकंद (खवलेयुक्त गड्डे) असतात. त्यांपासून जमिनीवर रेखाकृती गवतासारखी बारीक पाने येतात. फुले एकाकी, नळीसारखी व जांभळी असून त्यांत पिवळे परागकोश व लालसर नारिंगी किंजल्क असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे  इरिडेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे येथे किंजल्काचे तीन भाग असून एकूण लांबी २.५ सेंमी असते.

केशराची लागवड उताराच्या जमिनीत करतात; लागवड करण्यापूर्वी सु. आठ वर्षे कसलेच पीक काढीत नाहीत. लागवडीसाठी उपयोग करण्याचे कंद तीन वर्षांचे झाल्यावर बाजूंनी खोल चर काढलेल्या चौकोनी भुसभुशीत वाफ्यामध्ये सु. एक मी. अंतरावर लागवड करतात. साधारणतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात लागवड करतात व एकदा कंद लावले म्हणजे १४ वर्षांपर्यंत राहतात व या काळात त्यांना पाणी किंवा खत देत नाहीत.

केशरासाठी फुलातील किंजल्काची टोके अगदी सकाळी खुडतात व भट्टीवर तसेच किंवा कागदांच्या थरांमध्ये त्यावर जाड फळीचे वजन ठेवून वाळवितात व त्यामुळे केशराच्या वड्या होतात. तसेच उन्हातही वाळवितात. सुमारे ४०,००० फुलांपासून असे सु. अर्धा किग्रॅ. केशर मिळते, यामुळे ते फार महाग पडते. हे पहिल्या प्रतीचे केशर होय. याला ‘शाही झाफ्रॉन’ म्हणतात. ते काढल्यावर राहिलेल्या किंजल्काच्या पांढऱ्या तंतूंपासून ‘मोगल’ नावाचे हलक्या दर्जाचे केशर मिळते. शेवटी वाळलेली फुले काठीने हळू चोपून किंवा बडवून पाण्यात टाकतात. फुलाचा केशराच्या द्दष्टीने चांगला असलेला भाग तळाला साचतो, त्याला ‘निवळ’ म्हणतात. तरंगणारे फुलाचे भाग पुन्हा चोपून पाण्यात टाकतात व निवळ काढतात. निवळीपासून केलेल्या केशराला ‘लांचा’ म्हणतात व ते हलक्या दर्जाचे असते.

केशराचा प्रमुख उपयोग मिठाई व तत्सम खाद्य पदार्थांना स्वाद व रंग (पिवळट नारिंगी) आणण्यास करतात. ते लोणी, चीज, केक व तत्सम पदार्थ तसेच श्रीखंड, बासुंदी, साखरभात, लाडू, खीर इ. मिठाई व तत्सम खाद्यपदार्थांत वापरतात.  रंगाचा उपयोग इतरत्रही करतात. लोहाचा उपयोग (रंगबंधक) करून केलेली केशरी छपाई सोनेरी दिसते. सल्फ्यूरिक अम्ल, नायट्रिक अम्ल वा आयर्न सल्फेट यामुळे केशराचा रंग निळा किंवा हिरवा होतो. केशराचा औषधी उपयोग जुना आहे. ते सौम्य स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारे), उत्तेजक, अग्निदीपक (भूक वाढविणारे), वायुनाशी, उद्वेष्टनाशक (झटके येण्यास प्रतिबंध करणारे), तंत्रिका (मज्जा) शामक, सौम्य मादक, मूत्रल (लघवी साफ करणारे), आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारे) असते.  अधिक प्रमाणात वाजीकर (कामोत्तेजक) व मादक आहे. मासिक पाळी सुरू होण्यासाठी किंवा त्या सुमारास होणाऱ्या कंबरदुखीवर केशर उपयुक्त असते, परंतु अधिक प्रमाणात गर्भपातक असते. खरचटणे, साध्या जखमी, संधिवात इत्यादींवर केशराचा लेप लावतात. केशरात क्रॉसीन, क्रोकरीन, पिक्रो-क्रॉसीन, कॅरोटीन, लायकोपेज इ. रासायनिक द्रव्ये व बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा