टेस्ला, निकोला : (१० जुलै १८५६ – ७ जानेवारी १९४३) निकोला टेस्लाचा जन्म क्रोएशियातील स्मिलान या गावी झाला. हा भाग तत्कालीन ऑस्ट्रो-हंगेरीअन साम्राज्याचा होता. ऑस्ट्रीयामधील ग्राझ येथील तंत्रविद्यापीठामध्ये त्याने शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला, पण ते त्याने अर्धवट सोडले. त्यानंतर त्याने पुढील शिक्षण प्राग येथील विद्यापीठात घेतले.
शिक्षणानंतर त्याने बुडापेस्टला टेलीफोन कंपनीमध्ये विद्युत अभियंता म्हणून नोकरी पत्करली. त्यानंतर तो काही काळ पॅरिसमधील कॉन्टिनेन्टल एडिसन कंपनीमध्ये रुजू झाला. तिथे त्याने दिष्ट जनित्र (डायनॅमो) बनवला. प्रवर्तन चलित्र (इन्डक्शन मोटर) बनवण्याचे त्याचे प्रयोग तेव्हा चालूच होते. एडिसनने शोधलेल्य़ा दिष्ट प्रणालीपेक्षा (डी. सी.) प्रत्यावर्ती धारा (ए.सी.) प्रणाली ही आधिक उपयुक्त आहे, याची त्याला पुरेपूर खात्री पटलेली होती. त्याने त्याचे पहिले प्रवर्तन चलित्र (इन्डक्शन मोटर) बनवले.
टेस्ला नंतर अमेरिकेला आला. काही दिवस त्याने एडिसनकडे काम केले. पण तेथे त्याचे मन रमले नाही. एव्हाना शास्त्रज्ञांना हाताशी धरुन त्यांच्या संशोधनातून पॆसे मिळवण्याची व्यापारी वृत्ती अमेरिकन कंपन्यांमध्ये सर्रास चालू झाली होती. एडिसनच्या कंपनीच्या अनेक शेअर्सचे नियंत्रण हे जे. पी. मॉर्गनच्या हातात होते. एडिसनने त्याच काळात दीष्ट जनित्रापासून (डी.सी. जनरेटर) वीज निर्मिती सुरू केली होती, पण त्यामध्ये बऱ्याच ऊर्जेचा ऱ्हास होत असे. एडिसनच्या दिष्ट प्रणालीतील (डीसी सिस्टीम) ऊर्जेच्या ऱ्हासाला पर्याय, प्रत्यावर्ती धारा (ए. सी. सिस्टीम) आहे हे निकोला टेस्लाच्या ध्यानात आले होते. त्याने एडिसनला व मॉर्गनला हे पटवून देण्याचा प्रयत्नही केला पण तो अयशस्वी झाला. मग त्याने एडिसनची कंपनी सोडली. लवकरच त्याला द्वे आणि त्रीणी प्रावस्थिक प्रवर्तन चलीत्र (टू फेज व थ्री फेज इन्डक्शन मोटर), द्वे आणि त्रीणी प्रावस्थिक दिष्ट जनित्र (टू फेज आणि थ्री फेज जनरेटर) ची एकस्वे (पेटंट) मिळाली. त्याचवेळी टेस्लाने चार स्थिर ध्रुवाच्या (स्टेटर पोलच्या) तीन प्रकारच्या विद्य़ुत चलित्रांचे (मोटारींचे) संशोधन प्रसिद्ध केले. ‘Non self-starting Reluctance Motor’; ‘Wound Rotor forming self-starting Induction Motor’; ‘Synchronous motor with separately excited DC supply to rotor winding.’
त्याचवर्षी त्यांनी शोधलेल्या बहूप्रावस्थिक प्रत्यावर्तीधारा प्रणाली (पॉलीफेज सिस्टीम ऑफ अल्टरनेटींग करंट), जनित्र (डायनॅमोज), रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आणि चलित्राची (मोटरची) संशोधने जॉर्ज वेस्टिंगहाऊसच्या वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रीक कंपनीला वापरायला दिली व नंतर त्यालाच विकली. त्याच सुमारास त्याने स्वतःच्या प्रयोगशाळेची स्थापना केली. टेस्लाने विद्युत दोलायमानक (इलेक्ट्रिक ऑसिलेटर) आणि उच्च दाबाचा रोहित्र (हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर) बनवला. त्यालाच टेस्ला कॉईल म्हणतात. रेडिओ टेक्नॉलॉजीमध्ये ही वापरली जाते. टेस्ला कॉइल ही उच्च कंपनांना उच्चदाबाच्या विद्युतनिर्मितीकरिता वापरली होती. आधुनिक जगात टेस्ला कॉईल निर्वात प्रणालींमध्ये विद्युत गळती शोधक म्हणून वापरली जाते.
शिकागोला भरलेल्या ‘कोलंबिअन एक्स्पोझिशन’ ह्या प्रदर्शनामध्ये जॉज वेस्टिंगहाउसने टेस्लाने शोध लावलेल्या प्रत्यावर्ती धारा प्रणालीच्या (अल्टरनेटिंग करंट सिस्टीम) सहाय्याने संपूर्ण प्रदर्शन दिव्यांनी प्रकाशित केले. वेस्टींगहाऊस कंपनीने नायगारा येथील धबधब्यावर प्रत्यावर्ती जनित्र (ए. सी. जनरेटर) बसवला आणि तिथे पहिले वीजनिर्मिती केंद्र उभे केले. हे केंद्र टेस्लाच्या संशोधन व सल्ल्यावर आधारीत होते.
मार्कोनीच्या रेडिओ शोधाच्या दोन वर्षांआधी टेस्लाने रेडिओ लहरींच्या प्रक्षेपणाचे प्रात्यक्षिक दाखवले होते. ते संशोधन त्याच्या हयातीत त्याच्या नावाने मान्यताप्राप्त झाले नाही. न्यूयॉर्कमधील इलेक्ट्रिकल उपकरणांच्या प्रदर्शनात त्याने रेडिओ लहरींच्या नियंत्रणाने तलावात एक बोटही चालवली होती. रेडिओ लहरींचा शोध अजून लोकांना समजला नव्हता, तेव्हा टेस्लाने ही बोट रेडिओ लहरींवर चालवून दाखवली होती.
विजेमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. प्रत्यावर्ती धारेमुळे (अल्टरनेटींग करंट) वर्तुळाकार गतीत फिरणारे (रोटेटिंग) चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. मायकेल फॅरेडेच्या ह्या शोधाचे, तंत्रज्ञानाच्या स्वरुपातले प्रत्यक्ष व्यावहारीक उदाहरण हे निकोला टेस्लाने त्याच्या प्रवर्तन चलित्राच्या (इन्डक्शन मोटर) रुपाने दिले. तिला कॉम्युटेटरची व दिष्ट चलित्राप्रमाणे (डीसी मोटर) बाहेरून उर्जा देण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे तिच्यातील ऊर्जा ऱ्हास अतिशय कमी होता. ती प्रवर्तक रहित (स्टार्टर) होती.
टेस्लाच्या ह्या शोधामुळे मानवी संस्कृतीच्या प्रगतीच्या परिभाषेतच आमूलाग्र बदल झालेला आहे. एकशे अडतीस वर्षांपूर्वी त्याने शोधलेली एक-प्रावस्थिक चलित्र (सिंगल फेज मोटर) ही आजही जगात सर्वत्र वापरली जाते. जगातील एकूण विद्युत ऊर्जा वापरापॆकी ५०% ऊर्जा ही केवळ प्रवर्तन चलित्र (इन्डक्शन मोटर) मुळे वापरली जाते. वीज निर्मीती, वितरण आणि ऒद्योगिक क्षेत्र ह्या मध्ये तिचा वापर जगभर केला जातो.
विल्यम रॉंटेंजनला क्ष-किरणांच्या शोधाचा जनक मानले जाते. निकोला टेस्लाने त्याच सुमारास अमेरिकेत प्रथमच क्ष-किरणांची निर्मिती करून स्वतःच्या पायाचे छायाचित्र काढले होते. त्याने कोऍक्सिअल केबलच्या निर्मिती करता पेटंट घेतले. ऊर्जा वितरणाकरता आधुनिक जगात समअक्षीय तारा (कोऍक्सिअल केबल) वापरल्या जातात. त्यांच्या निर्मितीचे श्रेय टेस्लाच्या नावे जाते. संदेशवहनाकरता आधुनिक जगात ह्या तारा वापरल्या जातात कारण त्यात संधारित्र (कपॅसिटर) ऊर्जा ऱ्हास कमी असतो. काळाच्या ओघात त्या बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले तरी त्यांच्या रचेनेच्या मूळ शोधाचे श्रेय टेस्लाकडे जाते.
रेडिओ, रडार, सर्वप्रकारच्या मोटर्स, उच्च-कंपनांची दाबक्षेत्रे, कॉइल्स ह्या सर्वांच्या निर्मितीमागे टेस्लाच्या वॆज्ञानिक संशोधन संकल्पनांचा हात आहे. त्याच्या नावाने तीनशे पेटंट आहेत.
टेस्लाची स्मरणशक्ती अत्यंत कुशाग्र होती. तो बहुभाषिक होता. त्याला अनेक मानसन्मान मिळाले होते. सर्बियाच्या बेलग्रेड ह्या राजधानीमध्ये त्याच्या नावाचे संग्रहालय आहे. १८९६ मध्ये फ्रान्समध्ये निकोला टेस्लाची व स्वामी विवेकानंदांची भेट झाली होती.*टेस्लाच्या सन्मानार्थ SI प्रणालीने मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी (B), {B=f/a} ह्या एककाला ’टेस्ला’ हे नाव दिले आहे.
ज्या वर्षी टेस्लाचे निधन झाले त्याच वर्षी, त्याच्या निधनानंतर कोर्टाने मार्कोनीची चार पेटंट अवैध ठरवली आणि टेस्लाचा त्यावरील अधिकार मान्य केला.
रोबोट ॲक्च्युएटरपासून टर्न-टेबलपर्यंत आणि पाण्याच्या पंपापासून ते ड्रिलिंग मशीनपर्यंत, टेस्लाने शोधलेल्या मोटारींचा वापर केला जातो. एकोणिसाव्या शतकातील या शास्त्रज्ञाच्या नावाने, एकविसाव्य़ा शतकात विद्युत-चलीत गाड्या बनवणाऱ्या निकोला आणि टेस्ला ह्या कंपन्या निर्माण झाल्या ह्यातच त्याच्या कार्याची महती दिसून येते.
संदर्भ :
- मराठी पारिभाषिक शब्द : महाराष्ट्र राज्यपाठ्य पुस्तक निर्मिती व अभासक्रम मंडळ, पुणे
समीक्षक : अ. पां. देशपांडे