टोनागावा, सुसुमू : (५ सप्टेंबर, १९३९) सुसुमू टोनगावा यांचा जन्म जपानमधील नागोया येथे झाला. टोनगावांचे प्राथमिक शिक्षण टोकियोमधील हिबिया हायस्कूल येथे झाले. शाळेत असतानांच टोनगावा यांना रसायनशास्त्राची गोडी निर्माण झाली. आपल्या रसायनशास्त्राच्या आवडीमुळेच त्यांनी पुढील पदवीचे शिक्षण घेण्यासाठी क्योटो विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात प्रवेश मिळवला व रासायनिक अभियांत्रिकीत शैक्षणिक कारकीर्द करण्याचे ठरविले.

दरम्यानच्या काळात जेकाब व मोनाड यांनी मांडलेल्या ऑपरॉन सिद्धांताच्या संशोधनाने ते भारावून गेले व त्यांना तत्कालीन जीवशास्त्राची नाविन्यपूर्ण शाखा रेण्वीय जीवशास्त्रात रुची निर्माण झाली व त्यांनी रेण्वीय जीवशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी जपानमधील निवडक प्रयोगशाळांपैकी एक असलेल्या क्योटो विद्यापीठाच्या विषाणू संशोधन संस्थेतील इटारू वतनाबे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू केले. सुसुमू टोनगावा प्रयोगशाळेत काम करत असतांनाच त्यांची संशोधनाची प्रगती पाहून अगदी दोनच महिन्यांत  वतनाबे यांनी त्यांना पुढील संशोधन अमेरिकेत करण्याची सूचना केली. वतनाबे यांच्या मदतीने त्यांनी सॅनडिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागातील प्राध्यापक डेव्हिड बोन्नर यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या प्रयोगशाळेत प्रवेश मिळवला. सॅनडिएगोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये त्यांना मसाकी यांच्या मार्गदर्शनाखाली लॅम्ब्डा विषाणूचे ‘ट्रान्सक्रिप्शनल नियंत्रण’ म्हणजे लॅम्ब्डा विषाणूच्या डीएनएपासून आरएनए तयार होणार्‍या प्रक्रियेचे नियंत्रण नेमके कसे केले जाते याचा अभ्यास करून संशोधन प्रबंध सादर केला. ह्या उल्लेखनीय संशोधनाबद्दल त्यांना रेण्वीय जीवशास्त्रात पीएच्.डी. पदवी प्रदान करण्यात आली. नंतर त्यांनी हआशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणून Phi X ØX174 या विषाणूविषयी महत्त्वपूर्ण संशोधन केले.

सुसुमू टोनगावा यांच्या व इतर शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे जीवाणूच्या आदिकेंद्रकी पेशीचे अनेक महत्त्वपूर्ण रेण्वीय जीवशास्त्रीय पैलू तत्कालीन विज्ञान-विश्वाला ज्ञात झाले. आता जगभरातील अनेक वैज्ञानिकांना उच्च सजीवांच्या दृश्यकेंद्रकी पेशोतील (Eukaryotic cell) रेण्वीय जीवशास्त्रातील संशोधनाविषयी मोठी उत्कंठा लागली. उच्चसजीवांच्या पेशीची व गुणसूत्रांच्या रेण्वीय संरचनेची गुंतागुंत चक्रावून टाकणारी होती. टोनगावा यांनी ही गुंतागुंत सोडविण्यासाठी आदिकेंद्रकी पेशी व दृश्यकेंद्रकी पेशीचा संशोधनातील महत्त्वाचा दुवा असलेले पॉलिओमा आणि सिमियन-४० विषाणूंविषयी सखोल अभ्यास करण्याचे ठरविले.

त्याकाळी पॉलिओमा आणि सिमियन-४० या विषाणूसारखे अर्बुद तयार करणारे विषाणू सध्या ते काम करीत असलेल्या रेनाटो डल्बेकोच्या प्रयोगशाळेतच मुख्यतः हाताळले जात असत. परंतु अमेरिकेचा व्हिसा संपणार असल्याने ते स्वित्झर्लंडमधील नव्याने स्थापन झालेल्या बाझल इन्स्टिट्यूट फॉर इम्यूनोलॉजी येथे गेले व तेथे त्यांनी प्रतिक्षमताशास्त्रात संशोधन सुरू केले.

त्यांना प्रतिक्षमताशास्त्राचा अभ्यास करतांना प्रतिक्षमताशास्त्रज्ञ इटा आस्कॉनास व जनुकीय शास्त्रज्ञ चार्ल्स स्टाइनबर्ग यांची खूप मदत झाली. प्रतिपिंडांच्या विविधतेच्या जनुकीय उत्पत्तीवरील वैज्ञानिकांमधल्या संशोधनपर विचार मंथनात ते सामील झाले. त्यांनी रेण्वीय जीवशास्त्रात नेहमी वापरण्यात येणारी प्रतिबंध-विकिरे आणि नुकत्याच शोधण्यात आलेल्या जनुकीय अभियांत्रिकीतील तंत्रांचा वापर करून प्रतिपिंडांच्या विविधतेच्या जनुकीय उत्पत्तीचे कोडे सोडवायला घेतले. यात प्रामुख्याने त्यांना मोनिका शोल्ड, रीटा शुलर या कुशल तंत्रज्ञांनी आणि नोबुमिची होझुमी, मिनोरू हिरामा, क्रिस्टीन ब्रॅक आणि चार्ल्स स्टाइनबर्ग या शास्त्रज्ञांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे संचालक नील्स जेर्ने यांनी त्यांना प्रोत्साहित केले.

त्यांचा ह्या महत्त्वपूर्ण संशोधन कार्यामुळे प्रतिपिंडांच्या विविधतेच्या जनुकीय उत्पत्तीविषयीच्या दीर्घकाळ गूढ असलेल्या सिद्धांताचे निराकरण झाले. टोनगावा यांनी प्रतिकारशक्तीप्रणालीची जनुकीययंत्रणा स्पष्ट केली. प्रतिपिंडांमधील विविधता वारश्याने प्राप्त झालेल्या जनुकीय-खंडाच्या कायिक पुनर्संयोजनामुळे आणि कायिक उत्परिवर्तनाद्वारे निर्मिली जाते असा महत्त्वाचा निष्कर्ष त्यांनी काढला होता.

एम.आय.टी. केंब्रिजच्या कर्करोग केंद्राचे संचालक साल्वाडोर लुरिया यांनी त्यांना कर्करोगसंस्थेत प्राध्यापकपद देऊन अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली. येथे टोनगावा यांनी दोन महत्त्वपूर्ण समस्यांवर काम केले. एक म्हणजे पुनर्रचित प्रतिपिंड जनुक सक्रिय करण्याच्या कायिक पुनर्रचनेच्या भूमिकेचा अभ्यास करणे आणि दुसरे म्हणजे बाझल प्रयोगशाळेतील टी-पेशी विषयीचे संशोधन. १९८३ साली त्यांनी प्रतिपिंड जनुक समूहाशी संबंधित ट्रान्सक्रिप्शन या क्रियेला प्रेरित करणारा पहिला घटक शोधून काढला.

प्रतिकारशक्ती प्रणालीची जनुकीय यंत्रणा नेमकी कशी कार्य करते हे शेकडो वर्षांपासून अनुत्तरित असलेला प्रश्न त्यांनी सोडवला होता. त्यांनी आपल्या प्रयोगातून असे दाखवून दिले की जनुके लाखो प्रकारची प्रतिपिंडे तयार करण्यासाठी स्वतःची पुनर्रचना करतात. या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९८७ सालचा वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नोबेल पुरस्कारप्राप्तीनंतर टोनगावा यांनी आपले संशोधन क्षेत्र बदलुन चेताशास्त्राचे संशोधन करण्याचे ठरविले. टोनगावांनी सस्तन प्राण्यांच्या चेतप्रणालींमध्ये परिचयात्मक ट्रान्सजेनिक आणि जीन-नॉकआउट तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. त्याच्या प्रयोगशाळेत सामाजिक स्मृती, तसेच नैराश्य, स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर आजार यांसारखे मेंदूचे विकार नेमके कसे उद्भवतात याचे नाविन्यपूर्ण पुरावे शोधण्यात यश मिळाले. मानवीय चेताप्रणालीचे वैज्ञानिक गूढ उकलण्यात व भविष्यातील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांचे संशोधन खूपच महत्त्वाचे मानले जाते.

टोनगावा सध्या बोस्टन येथे आपल्या कुटुंबासोबत राहतात.

टोनगावा यांना खालील सन्मान प्राप्त झाले त्यात फाऊंडेशन चेक्लोएटा पुरस्कार, मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, अमेरिका; जेनेटिक्स प्रमोशन फाऊंडेशन, जपान; इम्यूनोलॉजीचा अवेरी लँडस्टेनर पुरस्कार, पश्चिम-जर्मनी; रोच इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजीचा व्ही. डी. मटिया पुरस्कार, नुटले, अमेरिका; गॉर्डनर फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, टोरंटो, कॅनडा;  पर्सन ऑफ कल्चरल मेरिट ‘बंककोरोशा’ ऑफ द जपानी गव्हर्नमेंट; ऑर्डर ऑफ कल्चर ‘बंककुंशो’, जपानच्या सम्राटाकडून; ब्रिस्टल-मायर्स पुरस्कार (कर्करोग संशोधनातील प्रतिष्ठित कामगिरीसाठी); रॉबर्ट कॉख फाऊंडेशन, पश्चिम-जर्मनी, रॉबर्ट कॉख पुरस्कार; अल्बर्ट आणि मेरी लास्कर पुरस्कार, न्यूयॉर्क.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे