अर्नाल्ड, फ्रान्सिस हॅमिल्टन : (२५ जुलै १९५६) फ्रान्सिस हॅमिल्टन अर्नाल्ड यांचा जन्म पेन्सिल्व्हानिया स्टेटच्या एजवुड या पिटसबर्ग उपनगरात झाला. स्क्विरल हिल येथील टायलर अलेडेरडिस हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. हायस्कूल शिक्षण सुरू असताना त्यांनी रस्त्यावर विनंती करीत व्हिएतनाम युद्धाविरुद्ध निदर्शन करण्यासाठी वाशिंग्टन डी.सी. पर्यंत एकटीने प्रवास केला होता. स्वत: स्थानिक जाझ क्लबमध्ये कॉकटेल वेट्रेस आणि टॅक्सी ड्रायव्हरसारखी कामे केली.
त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये बीएस पदवी मिळवली. पदवीबरोबर त्यांचे सहविषय अर्थशास्त्र, रशियन आणि इटालियन भाषा हे होते. सोबतच त्यांना पदवीपूर्वीच आंतराष्ट्रीय संबंध शाखेची पदवी मिळाली. दुसरे वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी इटलीचा प्रवास केला तिथे त्यांना एका कारखान्यात अणुभट्टीचे सुटे भाग बनवायचे होते. परत आल्यानंतर त्यानी प्रिन्स्टन ऊर्जा व पर्यावरण केंद्रामध्ये आपले राहिलेले शिक्षण पूर्ण केले.
प्रिन्स्टनमधून पदवी घेतल्यानंतर दक्षिण कोरिया आणि ब्राझील मध्ये सोलर एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्या इंजिनियर या नात्याने काम करीत होत्या. हे काम करत असताना त्यांनी सौर ऊर्जेचा वापर दूरवर असलेल्या गावांना कसा होईल यावर संयुक्त राष्ट्रासाठी शोधनिबंध प्रसिद्ध केले. बर्कले येथील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून त्यांनी केमिकल इंजिनियरिंगमधील पीएच्.डी. मिळवली. याच वेळी जीवरसायन विज्ञानात त्यांना आवड उत्पन्न झाली. हार्वे वारेन ब्लांच यांच्या प्रयोगशाळेत जेव्हा त्यांच्या प्रबंधावर चर्चा झाली त्यावेळी बर्कले युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट कमिटीने त्यांना रसायनशास्त्राची पार्श्वभूमी नसल्याने पदवीपूर्व रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा सल्ला दिला.
पीएच्.डी.नंतर अर्नाल्ड यांनी जैव-भौतिकीरसायन विषयात पोस्ट डॉक्टरल रिसर्च बर्कले युनिव्हर्सिटीत पूर्ण केले. त्या कलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यागत प्राध्यापक होत्या. नंतर त्या पूर्णवेळ प्राध्यापक झाल्या. सध्या केमिकल इंजिनियरिंग, बायोइंजिनियरिंग आणि बायोकेमिस्ट्रीमधील लायनस पॉलिंग प्रोफेसर आहेत. अनेक महत्त्वाच्या सल्लागार समित्यांवर त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या सहकारऱ्यांसह विभागून ४० एकस्वे त्यांच्या नावावर आहेत.
अर्नाल्ड यांनी विकरांच्या मार्गदर्शित उत्क्रांतीविषयी दिशादर्शक संशोधन केले आहे. विकर हे प्रथिनरेणू असून जैवरासायनिक क्रिया अधिक वेगाने घडवून आणतात. उत्परिवर्तनामुळे विकरांचे कार्य किंवा परिणामकारकता बदलणे शक्य झाले तर जैविकक्रिया अधिक वेगाने होतील हा या मागील उद्देश आहे. नैसर्गिक निवडक्रियेने विकर अधिक प्रभावी होण्याची प्रक्रिया चालू असते. नैसर्गिक निवड अस्तित्वात असलेल्या जनुकक्रमामधून, नवी विकरे निवडते. मात्र ही क्रिया वेळ-खाऊ आहे. विकर प्रथिनात उत्परिवर्तन वेगाने व्हावे म्हणून त्याच्या जनुकक्रमामध्ये त्यांनी मुद्दाम उत्परिवर्तने घडवून आणली. तसेच या उत्परिवर्तनाचा परिणाम तपासला. त्यांची ही युक्ती लागू पडली. यातून तयार झालेली प्रथिने पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी ठरली. याचे पहिले प्रयोग त्यांनी पुनर्वापर करता येईल अशा इंधननिर्मितीसाठी केला. तसेच पर्यावरणस्नेही औषधे त्यांना बनवता आली.
त्यांच्या मार्गदर्शित उत्क्रांतीच्या संशोधनाबद्दल त्यांना २०१८ या वर्षाचा रसायनविज्ञानातील नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला. या विषयातील नोबेल पुरस्काराच्या ११७ वर्षांच्या इतिहासात त्या पाचव्या आणि अमेरिकेतील पहिल्या महिला संशोधक ठरल्या. नोबेल पुरस्कारातील पन्नास टक्के रक्कम त्यांना एकटीला व उरलेली रक्कम जॉर्ज स्मिथ आणि ग्रेगरी विंटर या दोघात विभागली गेली. प्रिन्स्टन विद्यापीठामधून नोबेल पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या महिला पदवीधर आहेत. बीबीसीने सन्मानाने निवडलेल्या पहिल्या शंभर महिलांमध्ये त्यांची निवड केली गेली.
कॅल्टेक (कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ) मध्ये मार्गदर्शित उत्क्रांतीसाठी खास उभारलेल्या प्रयोगशाळेत त्या सध्या संशोधन करीत आहेत. पर्यावरणस्नेही रसायने, हरित ऊर्जा संसाधने आणि सेल्युलोज विघटक विकरे यावरील संशोधन हे या प्रयोगशाळेचे वैशिष्ट्य आहे.
संदर्भ :
समीक्षक : किशोर कुलकर्णी