लॅम, विलिस युजिन : (१२ जुलै १९१३ – १५ मे २००८) विलिस यांचा जन्म अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजलिस येथे झाला. विलिस यांचे शालेय शिक्षण ओकलॅंड आणि लॉस एंजलिस पब्लिक हायस्कूल येथे झाले. शालेय जीवनापासूनच विलिस यांना गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात विशेष रुची होती. शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला व रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी. एस. ही पदवी मिळविली. नंतर याच ठिकाणी राहून त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. एखाद्या स्फटिकातून होणारे न्यूट्रॉन्सचे विकिरण एखाद्या पदार्थात होणारे मंद न्यूट्रॉन्सचे प्रग्रहण या विषयांवर त्यांनी संशोधन केले. याच बरोबरीने केंद्रकाशी संबंधित विद्युतचुंबकीय गुणधर्मांचा त्यांनी अभ्यास केला. सुप्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि अणुबाँब निर्मिती प्रक्रियेत नेतृत्व करणारे जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या मार्गदर्शनाखाली विलिस यांनी हे संशोधन केले. यासाठीच विलिस यांना पीएच्‌.डी. पदवी मिळाली. त्याकाळी संगणनविषयक पद्धती पुरेशा विकसित नसल्यामुळे म्योसबाऊर परिणामासारखी (Mössbauer effect) महत्त्वाची कल्पना उजेडात येऊ शकली नाही. जी पुढे तब्बल १९ वर्षांनी सर्वांसमोर आली.

विलिस यांनी भौतिकीतील अनेक संकल्पनांचा सखोल अभ्यास केला, जसे की न्यूट्रॉन आणि वस्तुमान यामधील आंतरक्रिया, बीटा ‍र्‍हास, विश्वकिरण वर्षाव, युग्मनिर्माण, रेणूंमधील चतुर्ध्रुव आंतरक्रिया वगैरे.

विलिस यांनी आपला विद्यार्थी रॉबर्ट रदर्‌फोर्ड यांच्या सहाय्याने एका विशेष प्रयोगाद्वारे (Lamb-Retherford experiment) हायड्रोजन वर्णपटाचा अभ्यास केला. यात असे दिसून आले की हायड्रोजनच्या दुसर्‍या कक्षेतील दोन उपकक्षांच्या ऊर्जेत फरक आहे की जो डिरॅक समीकरणाने (Dirac equation) पूर्वानुमानित केला नव्हता. डिरॅक समीकरणाने या दोन्ही ऊर्जा समान असल्याचे म्हटले होते. या दोन ऊर्जेमधील फरकालाच लॅम विस्थापन (Lamb shift) असे म्हणतात. विलिस यांच्या या प्रयोगातच आधुनिक क्वांटम विद्युतगतिशास्त्र (modern quantum electrodynamics) या शास्त्राची बीजे रोवली गेली. रिचर्ड फाईनमन, जुलियन श्विंगर इत्यादी शास्त्रज्ञांनी नंतर या शास्त्राचा विकास केला. लॅम विस्थापनाचे आणखी एक महत्त्व असे की या प्रयोगातून सूक्ष्म संरचना स्थिरांक (fine structure constant) हा आता एक दशलक्ष भागांत एक इतक्या अचूकतेने ठरविता येऊ शकतो. या महत्त्वाच्या संशोधनासाठीच विलिस यांना १९५५ सालचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार पॉलिकार्प कुश यांच्याबरोबर विभागून दिला गेला.

संशोधनासोबतच विलिस यांनी कोलंबिया विद्यापीठात अध्यापनाला प्रारंभ केला. पुढे कोलंबिया रेडिएशन प्रयोगशाळेतही त्यांनी काम केले. नंतर स्टॅनफर्ड विद्यापीठात पाच वर्षे त्यांना अध्यापनाची संधी मिळाली. आणि त्यानंतरची सहा वर्षे ऑक्सफर्ड विद्यापीठात वायकेहम प्राध्यापक (Wykeham Professor) या मानाच्या पदावर विलिस यांची नेमणूक झाली. याशिवाय येल आणि अरीझोना या विद्यापीठातही विलिस यांनी अध्यापन केले.

विलिस यांनी संशोधनपर लेख लिहून ते फिजिकल रिव्ह्यू या उच्च दर्जाच्या संशोधन-नियतकालिकामध्ये प्रकाशित केले. हे लेख त्यावेळच्या अणुभौतिकीतील संशोधक विद्यार्थ्यांना अत्यंत उपयोगाचे ठरले.

विलिस लॅम यांनी १९७४ साली ॲरीझोना विद्यापीठात अध्यापनाला सुरुवात केली. तेथेच दीर्घकाळ संशोधन आणि अध्यापनाचे काम करून भौतिकी आणि प्रकाशीय शास्त्रामधील मानद प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञाला दिला जाणारा रीजन्टस् प्राध्यापक हा बहुमानही विलिस यांना मिळाला. तसेच त्यांना शास्त्रीय संशोधनक्षेत्रातील सर्वोच्च अशा नॅशनल सायन्स मेडलने गौरविण्यात आले. त्यांनी त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने प्रकाशीय शास्त्रामध्ये संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची योजना केली. ती विलिस लॅम (ज्युनिअर) शिष्यवृत्ती या नावाने दिली जाते.

अशा या महान भौतिकशास्त्रज्ञाचा पित्ताशयाच्या विकाराने ॲरीझोनामधील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर, टेक्सन येथे मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : सुधीर पानसे