थीओबाल्ड, स्मिथ : (३१ जुलै १८५९ – १० डिसेंबर १९३४) थिओबाल्ड स्मिथ यांचा जन्म अमेरिकेतील अल्बानी येथे झाला. कॉर्नेल विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली व त्यानंतर अल्बानी वैद्यकीय महाविद्यालयातून एम.डी.ची पदवी मिळवली. त्यांच्या वैद्यकीय विद्यालयातील पदवी शिक्षणानंतर स्मिथ यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ‘वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ म्हणून काम केले. त्यांच्या काही माजी प्राध्यापकांच्या सांगण्यावरून स्मिथ यांनी वॉशिंग्टनच्या अमेरिकी कृषी विभागातल्या पशुवैद्यकीय तुकडीत स्थान प्राप्त केले व तेथे संशोधन प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून रुजू झाले.

नंतर ते नुकत्याच स्थापन झालेल्या ब्युरो ऑफ ॲनिमल इंडस्ट्री (बी. ए. आय.) मध्ये निरीक्षक झाले. या संस्थेची स्थापना डुक्करामधले संसर्गजन्य रोग, गुरांचा न्युमोनिया, टेक्सास गुरा-ढोरांचा ताप अशा विविध प्रकारच्या प्राण्यांच्या आजारांवर तोडगा काढण्यासाठी केली गेली होती. येथे यांनी बी. ए. आय. चे अध्यक्ष डॅनिअल साल्मन यांच्या निर्देशनाखाली कामास सुरुवात केली. स्मिथ यांनी सल्मोनेल्ला (salmonella) नावाच्या जीवाणू प्रजातीचा शोध लावला होता. या जीवाणू प्रजातीचे नाव डॅनिअल साल्मनच्या नावावरूनच देण्यात आले. डॅनिअल साल्मन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अतिसंवेदनशीलता (Anaphylaxix) या मानवी शरीराच्या प्रतिजनास दिल्या जाणार्‍या प्रतिसादाचा अभ्यास केला. त्याला थिओबाल्ड स्मिथ परिणाम असे म्हणत असत. डुकरामध्ये जीवाणू लसीकरणाचा प्रभावीपणा शोधण्याच्या दोन वर्षाच्या शोधकार्यादरम्यान स्मिथ यांना जाणवले की त्यांनी हाँग कॉलराला कारणीभूत जीवाणूंचा शोध लावलाय. त्यानंतर स्मिथ यांनी आपले लक्ष टेक्सास फिवर नावाच्या गुरा-ढोरांना कमजोर करणार्‍या रोगावर केंद्रित केले. किल्बोर्ने यांच्यासोबत संशोधन करून स्मिथ यांनी बेबेसीआ बिगेमिनाचा (Babesia bigemina) शोध लावला हा सूक्ष्मजीव गोचीड (tick) मधला आदिजीव परजीवी असून टेक्सास फिवरसाठी कारणीभूत होता. एखादा संधिपाद प्राणी संसर्गजन्य रोग पसरविण्यास जवाबदार असू शकतो याचे हे पाहिले उदाहरण ठरले व त्या नंतर अशा अनेक आजारांसाठी जवाबदार असणार्‍या संधिपाद किड्यांचा शोध लागला.

स्मिथ यांनी  कोलंबिया विद्यापीठात, म्हणजे सध्याचे जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठामध्ये  शिकवत असतांना बॅक्टेरिऑलॉजी विभागाची स्थापना केली. स्मिथ यांनी पाणी, स्वच्छता या विषयावर संशोधन सुरू केले व पोटोमेक (Potomac) नदीच्या पाण्यात ‘कॉलायफॉर्म’ जिवाणूंचे प्रमाण तपासून पाहिले. पुढील पाच वर्षं स्मिथ यांनी हे कार्य पुढे नेत हडसन नदी व तिच्या उपनद्यांचा सुद्धा अभ्यासात समावेश केला.

बी. ए. आय. येथे स्मिथ यांची कामगिरी उल्लेखनीय व उत्पादनक्षम होती. परंतु त्यांच्या मनात फेडरल सरकारच्या नोकरशाही विरुद्ध व त्यांच्या पर्यवेक्षकामधल्या नेतृत्व गुणांच्या अभावामुळे रोष निर्माण होत असे. हार्वर्ड विद्यापीठात तुलनात्मक रोगनिदानशास्त्राचे  प्राध्यापकपद व ‘मॅसेच्युसेट्स स्टेट बोर्ड ऑफ हेल्थ’ येथे रोगनिदानशास्त्र प्रयोगशाळेत संचालकपद अशा दोन नियुक्त्या स्वीकारत त्यांनी केंब्रिजला स्थलांतर केले. स्मिथ रॉकफेलर वैद्यकीय संशोधन संस्थेच्या प्राणी रोगनिदानशास्त्र विभागात संचालक म्हणून रुजू झाले व तेथूनच निवृत्त झाले.

स्मिथ यांना त्यांच्या प्राणी व मनुष्यांच्या रोगांवर केलेल्या विशेष संशोधनाबद्दलबद्दल रॉयल सोसायटीच्या प्रतिष्ठित कोपले मेडलने गौरविण्यात आले.

स्मिथ यांनी अनेक महत्त्वाची शोधकार्य केली. स्मिथ यांनी मनुष्य व गुराढोरांमध्ये होणार्‍या क्षयरोगामधला स्पष्ट फरक सांगितला; त्यांनी डास हे ‘मलेरिया’ पसरविण्याचे माध्यम असण्याची शक्यता दर्शवली; त्यांनी ॲनाफीलेक्सिस (anaphylaxis) चा शोध लावला; स्मिथ यांनी काही प्रकारचे विष व विष प्रतिकार करणार्‍या तत्त्वांचा घटसर्पाच्या लसीकरणासाठी उपयोग केला; गुराढोरांमधल्या संसर्गजन्य गर्भपात या रोगाच्या साथीचा तपास करत असतांना स्मिथ यांनी गायीतल्या ‘फिटल मेम्ब्रेन डिसीझसाठी जबाबदार असणार्‍या जीवाणूंचे वर्णन केले. आज हे जीवाणू कॅम्पायलोबॅक्टर फिटस (Compylobacter fetus) नावाने ओळखले जातात.

अमेरिकेतील न्यूयोर्क, येथे त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :   

समीक्षक : रंजन गर्गे