असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया (स्थापना – १९८३) असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया (अमी) ही देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांपैकी एक संस्था आहे. स्थापनेच्या सुरुवातीपासूनच या संस्थेने देशातील सूक्ष्मजीवशास्त्र विकासात विशेषतः संशोधन, शिक्षण आणि वाणिज्य क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे. सध्या ४५०० पेक्षा अधिक आजीव आणि वार्षिक सदस्य व ४०० कॉर्पोरेट सदस्य या असोसिएशनशी जोडलेले आहेत. अमी या संस्थेच्या संपूर्ण भारतात ३६ शाखा आहेत व त्या प्रत्येक शाखेत एक अध्यक्ष आणि एक सचिव तथा कोषाध्यक्ष नेमलेला असतो.

गेल्या काही दशकादरम्यान झालेल्या शेती, औषध, पर्यावरण, उद्योग, जनुकीय अभियांत्रिकी व इतर क्षेत्रांत झालेले संशोधन आणि त्याच्या व्यावहारिक उपयोजितेमुळे सूक्ष्मजीवशास्त्र विषयाला महत्त्वाची विज्ञानशाखा म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. याची दखल घेत व्हिजन २०१२ मध्ये असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडियाच्या अंतर्गत इंडियन अकॅडमी ऑफ मायक्रोबायोलॉजीकल सायन्सेसची स्थापना करण्यात आली. अकॅडमीचे प्रमुख  ध्येय भारतात सूक्ष्मजीवशास्त्राला लोकप्रिय आणि मजबूत करणे हे आहे. या व्यतिरिक्त अकॅडमी ऑफ मायक्रोबायोलॉजीकल सायन्सेस जगातल्या विविध आंतरराष्ट्रीय अकादमींच्या सहकार्याने कार्य करते.

अकॅडमी ऑफ मायक्रोबायोलोजीकल सायन्सेसचे कार्य: अकादमीची शिष्यवृत्ती अकादमीतर्फे सूक्ष्मजीवशास्त्रात उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केलेल्या जगविख्यात व्यक्तींना फेलो ऑफ इंडिअन अकॅडमी ऑफ मायक्रोबायोलोजीकल सायन्सेसची उपाधी देण्यात येते.

परिसंवाद / परिषदा / कार्यशाळा: अकॅडमी सूक्ष्मजीवशास्त्राच्या विकासकार्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तिच्या शाखांना सुरुवातीला काही प्रमाणात निधी प्रदान करून मदत करते. अकॅडमी तिच्या सभासदांना परिषदेच्या नोंदणी शुल्कासाठी व परिषदेत भाग घेण्यासाठी होणार्‍या प्रवासासाठी देखील निधी उपलब्ध करून देते.

ज्ञानाचा प्रसार: अकॅडमी सूक्ष्मजीवशास्त्रातील ज्ञानाच्या प्रसारासाठी कार्यरत असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देते.

वार्षिक पुस्तिका आणि इतर प्रकाशने: अकॅडमी दरवर्षी पुस्तिका व इतर प्रकाशने छापण्यासाठी देशभरातून प्रस्ताव मागवते व त्याच्या प्रकाशनाचा कार्यकारी परिषद निर्णय घेते.

आर्थिक व्यवस्थापन: अकॅडमीचे अंदाजपत्रक संयोजक तयार करतात. असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया गेल्या ४५ वर्षांपासून तिमाही जर्नल इंडियन जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजी प्रकाशित करते आणि दरवर्षी देशात एक राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करते. इंडियन जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजीला मूलभूत संशोधन कार्य व संशोधन आढावा प्रकाशित केल्याने जगातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन नियतकालीकांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. २००७ पासून इंडियन जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजी हे स्प्रींजर सोबत सहप्रकाशित होत आहे. सध्या या जर्नलचे मुख्य संपादक डॉ. व्ही. सी. कालिया आहेत.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे