कर्बी, विलियम : (मे १९१४ – ३१ ऑगस्ट १९९७) विलियम कर्बी यांचा जन्म दक्षिण अमेरिकेतल्या डाकोटा प्रांतात स्प्रिंगफिल्ड येथे झाला. कनेक्टिकटमधल्या हार्टफोर्ड येथील ट्रिनिटी महाविद्यालयातून त्यांना बी.एस. ही पदवी मिळाली. कॉर्नेल विद्यापीठातून विलियम कर्बी वैद्यकीय पदवीधर झाले. विलियम यांनी वैद्यकीय पदवी मिळवल्यावर स्टनफोर्ड वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम सहाय्यक निवासी डॉक्टर व नंतर मुख्य निवासी डॉक्टर म्हणून काम पाहिले. या काळात लोवेल रांझ व आर्थर ब्लूमबर्ग यांच्या बरोबर कर्बी यांनी सल्फोनामाईड या कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या औषधाचा वापर आणि स्ट्रेप्टोकोकस या रोगजंतूची रक्तातील पातळ द्रवाबरोबर, सीरमबरोबर होणारी प्रतिक्रिया यासारख्या सांसर्गिक रोगाचे निदान करण्यासाठी किंवा त्यांचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या विषयांवर संशोधन केले. १९३० च्या दशकाच्या शेवटी पहिले प्रतिजैविक पेनिसिलीन अस्तित्वात आले. याच काळात विलियम कर्बी वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाले होते. सैन्यात असतानाच पेनिसिलीनच्या सुरुवातीच्या काळात या प्रतीजैविकावर जे संशोधन झाले त्यात विलियम कर्बी यांचाही सहभाग होता. प्रतिजैविके जिवाणूंवर काय परिणाम करतात हे शोधण्यात त्यांना कमालीचा रस होता. स्टफायलोकोकस हा जीवाणू प्रतिजैविक निष्क्रिय करेल असा घटक बनवतो हे त्यांच्या ध्यानात आले व यावर लिहिलेला आपला लेख एका संशोधन पत्रिकेत त्यांनी प्रसिद्ध केला हा निष्क्रिय करणारा घटक म्हणजेच पेनिसिलीनेज हे विकर होय हे नंतरच्या संशोधनाने सिद्ध केले.

सैन्यातील काम संपुष्टात आल्यानंतर ते सहाय्यक व्याख्याते म्हणून स्टनफोर्ड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. इथेच त्यांना संशोधनात रुची निर्माण झाली. त्यांचे बरेचसे संशोधन सांसर्गिक रोगांचे निदान कसे करायचे किंवा त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्यावर इलाज कसे करता येतील यासारख्या लगेच प्रत्यक्षात उपयोग करता येईल अशा विषयांवर बेतलेले असायचे. या कामामुळे सांसर्गिक रोगांवरील वैद्यकीय तज्ञ म्हणून त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासात उपयुक्त होतील असे मुख्यत्वे क्षय रोगावर किंवा न्यूमोनिया रोगावर त्यांनी लिहिलेले लेख तेव्हाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पुस्तकात अंतर्भूत करण्यात आले होते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या वैद्यकीय प्रशालेत संस्थापक सदस्य आणि सांसर्गिक रोग विभागाचे प्रमुख म्हणून कर्बी यांची नेमणूक करण्यात आली.

विभागप्रमुख या नात्याने त्यांनी अनेक वैद्यकीय विद्यार्थी किंवा डॉक्टरांना प्रशिक्षण दिले किंवा त्यांच्या सहाय्याने वेगवेगळे उपक्रम राबवले. उदाहरणार्थ जीवाणूना ‘जैसे थे’ स्थितीत ठेवणार्‍या व त्यांचा समूळ नायनाट करणार्‍या प्रतिविकांमध्ये रोग्याच्या दृष्टीकोनातून फारसा फरक नाही हे त्यांनीच दाखवून दिले. १९५० नंतरच्या दशकात अनेक नवनवीन प्रतिजैविके उदयाला आली. टेट्रासायक्लीन, इरीथ्रोमायसीन, स्पायरोमायसीन, नोव्होबायोसीन यासारख्या अनेक प्रतिजैविकांची परिणामकारकता त्यांनी सिद्ध केली. व्हांकोमायसीन हे प्रतिजैविक पेनिसिलीनला विरोध करणार्‍या स्टाफायलोकोकस या जीवाणूंनी होणार्‍या आजारात उपयुक्त आहे हे दाखवण्यात किंवा मेथीसिलीन, जंटामायसीन यांचा जिवाणूंवर होणारा परिणाम सिद्ध करण्यात त्यांचा वाटा आहे.

ही नवीन प्रतिजैविके निर्माण करण्यात जरी मानवाला यश आले तरी त्यांचा वेगवेगळ्या जीवाणूंवर कितपत परिणाम होतो, कोणत्या रोगांविरुद्ध लढताना कोणते प्रतिजैविक वापरता येईल हे पाहण्यासाठी त्यांनी बॉयर, शेरीस आणि टर्क यांच्या साथीने छोट्या कागदी चकत्यांचा वापर करून अगार प्रसार चाचणी (Agar diffusion test) प्रमाणित केली. तोपर्यंत प्रत्येक डॉक्टर आपल्या मनाप्रमाणे चाचण्या घेत व प्रतिजैविकांचा कोणतीही मात्रा वापरत.

A , B , C या छोट्या कागदी चकत्यांचा वापर करून अगार प्रसार चाचणी घेतली जाते.

कर्बी यांच्या संशोधनामुळे कोणते प्रतिजैविक कोणत्या रोगजंतूंवर इलाज करण्यासाठी वापरता येईल हे वैद्यकीय तज्ञांना कमी वेळात ठामपणे सांगता येऊ लागले आणि वैद्यकीय क्षेत्रात एकप्रकारे क्रांतीच झाली. एंटेरोकोकाय या जिवाणूंवर पेनिसिलीन किंवा ॲमिनोग्लायकोसीड प्रतिजैविके एकेकटी वापरण्याऐवजी एकत्रितपणे वापरली तर अधिक परिणामकारक ठरतात किंवा पेनिसिलीन रक्तद्रवातील घटकांशी बांधले जाते आणि त्यामुळे त्याच्या प्रक्रियेत बदल होऊ शकतो यासारखे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे शोध लावण्याचे श्रेय मुख्यत्वे त्यांच्याकडे जाते.

वेगवेगळ्या सांसर्गिक रोगांवर आणि प्रतिजैविकांवर त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांत व संशोधन पत्रिकांत एकूण दोनशे पंधरा लेख लिहिले आहेत.

अनेक बक्षिसे आणि मानसन्मान त्यांना मिळालेच पण अमेरिकन समाजाचा, सांसर्गिक रोगांचा अभ्यास आणि उपचारावरील संशोधनासाठी असलेला आत्यंतिक प्रतिष्ठेचा ‘ब्रिस्टॉल’ पुरस्कार, वॉशिंग्टन वैद्यकीय महाविद्यालयात निवृत्तीनंतरही प्रोफेसर राहण्याचा सन्मान त्यांना मिळाला.

कर्बी आपल्या सिअटल येथील राहत्या घरात मृत्यु पावले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे