मेटलॅन्ड, ह्यूज बेथ्यून: (१५ मार्च, १८९५ ते १३ जानेवारी, १९७२) ह्यूज बेथ्यून मेटलॅन्ड या कॅनेडियन शास्त्रज्ञाने युनिव्हर्सिटी ऑफ टोरॉंन्टो येथून एम.बी ही पदवी घेतली. एक वर्ष सूक्ष्मजीवशास्त्रातील फेलो म्हणून टोरॉन्टो येथे त्यांनी काम पाहिले. त्यानंतर इंग्लंडला येऊन लेफ्टनंट म्हणून रॉयल नेव्हीमध्ये दाखल झाले. रॉयल नेव्हल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अनेक वर्षे सेवा केली. त्यानंतर डिप्लोमा मिळवून ते परत टोरॉंन्टो येथे शास्त्रज्ञ म्हणून परतले. पदक्रम चढत जाऊन ते विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे मुख्य झाले. त्यांना एम.डीच्या प्रबंधातील उत्कृष्ट कामासाठी स्टार मेडल प्राप्त झाले.
काही वर्षांनंतर त्यांनी जर्मनीत काम केले. लंडनला परतल्यानंतर त्यांना वैज्ञानिक सल्लागार समितीवर नेमले गेले. लिस्टर इन्स्टिट्यूटमध्ये सर जोझेफ आर्कराईट यांच्यासारख्या शास्त्रज्ञांसमवेत काम करायची संधी प्राप्त झाली व त्यांना विषाणूंवर शास्त्रशुद्ध संशोधन करता आले.
लिस्टर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी फुट ॲन्ड माऊथ डिझीजवर खूप संशोधन केले. त्यावरचे अनेक शोधनिबंध जर्नल ऑफ कंपॅरेटिव्ह पॅथालॉजी ॲन्ड थेराप्यूटिक्समध्ये प्रसिद्ध झाले. या विषाणूंचा परिणाम उंदीरसदृश गिनीपिग या प्राण्यांवर होत असल्याचे त्यांना दिसून आले. या विषाणूंवर विविध भौतिक व रासायनिक पदार्थांचा परिणाम होत नव्हता. त्यामुळे त्यांचा नायनाट फार अवघड होता. या विषाणूंचे वेगवेगळे प्रकार व उपप्रकार होते व प्रयोगशाळेत त्यांचे जनन अशक्य होते. न्यूट्रलायझेशन टेस्टने विषाणूंचे प्रमाण कळू शकत होते व लसीद्वारा प्राण्यांमध्ये प्रादुर्भाव रोखणे शक्य होते हे त्यांनी शोधून काढले.
त्यानंतर जवळजवळ ३ दशके त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मॅन्चेस्टर येथे बॅक्टीरिऑलॉजीचे प्राध्यापकपद सांभाळले. येथे त्यांचे मुख्य काम विद्यार्थ्यांना शिकवणे असले तरी संशोधनकार्य त्यांनी जोमाने चालूच ठेवले.
त्यांनी आपल्या डॉक्टर पत्नीसमवेत मँचेस्टरमध्ये वॅक्सीनियाच्या विषाणूंवर संशोधन केले. (वॅक्सीनियाचे विषाणू वापरून तयार केलेली लस देवी ह्या रोगापासून बचाव करण्यासाठी वापरली जाऊ शकते). सशाच्या रक्तातील पेशीविरहित लस (serum) व मूत्रपिंडाची ऊतींमध्ये विषाणूंचे जनन करण्यात त्यांना यश आले. विषाणूंच्या वाढीसाठी संवर्धनाचे तंत्र प्रथमच यशस्वीरित्या वापरून मेटलॅन्ड यांनी विषाणू शास्त्रात आणि पर्यायाने लसनिर्मिती शास्त्रात क्रांती केली. पोलिओच्या विषाणूंची वाढही ह्यात होऊ शकते असे कळल्यावर साक पोलिओ वॅक्सीन तयार करण्यास या ज्ञानाची मदत झाली. या यशाने उल्हसित होऊन परत त्यांनी आपला मोर्चा फूट ॲन्ड माऊथ डिसिझकडे वळवला. अशा तऱ्हेने आधी अशक्य असलेले शक्य झाले. विषाणूंचे मानवी किंवा प्राण्यांच्या शरीराबाहेर जनन करता येणे (in vitro) हा एक फार मोठा टप्पा होता. त्यामुळे विषाणूंमुळे होणारे रोग व त्यावर उपाय ह्याबाबत बरीच कोडी उलगडली. हीमोफिलस परट्यूसिस (Hemophilus pertussis) व इतर जीवाणूंच्या विषाचेही विश्लेषण त्या दोघांनी केले.
मेटलॅन्ड यांच्या पुढाकाराने रोगपरिस्थिती विज्ञान (epidemiology) ही एक नवीन शाखा विकसित झाली. सार्वजनिक आरोग्य, रोगांची लागण व प्रादुर्भाव, रोगांचा नायनाट ह्या त्या वेळच्या जटिल समस्याच संशोधनाचे मूळ ठरल्या. घटसर्प, डांग्या खोकला, आमांश, टायफॉइड, क्षय यासारख्या भयंकर रोगांवर उपाय शक्य होऊ लागले.
सेवानिवृत्त झाल्यानंतर मेटलॅन्ड यांनी इतर शास्त्रज्ञांसमवेत कुआलालुंपुर, मलेशिया येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये कामास सुरुवात केली. मलेशियासारख्या देशात, नवीन तंत्रज्ञान वापरून, आव्हानात्मक अशी रोगनिदान पद्धती, सार्वजनिक आरोग्य व लस तयार करण्याचे मोठे काम हाती घेतले. पटकी (कॉलरा) व देवी या रोगांचे लसीकरण महत्त्वाचे होते. त्यांनी मलेशियाभर आरोग्याविषयी सुधारणा केल्या. ह्या कालावधीत असंख्य उत्तम शिष्य तयार केले.
मेटलॅन्ड यांचा ह्रदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ :
समीक्षक : रंजन गर्गे