ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंटअँड मॅनेजमेंट (क्वाडॅम), पुणे : (स्थापना: फेब्रुवारी, १९९८) पुण्याची ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंटअँड मॅनेजमेंट उर्फ ॲक्वाडॅम ही एक नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहे. वीस वर्षांहून अधिक काळ ही संस्था भूजलासंबंधीच्या मूलभूत संकल्पना आणि त्यांच्याशी संबंधित विषयांचे संशोधन यांमधे कार्य करत आहे. भूजलशास्त्र विषयाचे प्रशिक्षण देणे आणि भूजलविषयक ज्ञान सर्वसामान्यांपर्यत पोहोचवून त्यासंबंधी जनजागृती करणे ही ह्या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. भारतासारख्या कृषीप्रधान देशात प्रामुख्याने भूजलावर अवलंबून असणार्‍या, तथापि त्या विषयीच्या औपचारिक शिक्षणापासून वंचित रहिलेल्या सामान्य जनतेपर्यंत भूजलशास्त्राविषयाचे ज्ञान नेण्याची गरज आहे. ती गरज ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) भूगर्भशास्त्र विभागातल्या काही भूजलशास्त्रज्ञ प्राध्यापकांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली.

स्थानिक लोकांच्या सहभागाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने भूजलाची माहिती गावस्तरावर गोळा करणे, या विश्वसनीय माहितीच्या आधारे लोकांना प्रशिक्षित करणे, भूजलपुनर्भरणवाढीच्या उपाययोजना सुचवणे, भूजलपुरवठ्यात खंड पडू नये यासाठी धोरणात बदल सुचवणे अशी कामे गेली अनेक वर्षे ॲक्वाडॅम संस्था सातत्याने करत आहे.

भूगर्भातील पाण्याचा सर्वाधिक वापर करणारा देश म्हणजे भारत. कोणत्याही नैसर्गिक संसाधनाच्या अतिवापराचे दुष्परिणाम होत असतात, तसेच ते भूजलाच्या अमर्याद उपशाचेही होत असतात. आज ते आपल्यासमोर दृश्य स्वरूपात येऊन भेडसावत आहेत. आपल्या देशात भूजलाच्या गुणवत्तेची समस्यासुद्धा दिवसेनदिवस भीषण होत चालली आहे. वाढती मागणी, अपुरा पुरवठा अणि भूजल संसाधनाची मर्यादित उपलब्धता यांसारख्या समस्यांवर उपाय म्हणून कृति-आधारित संशोधन आणि त्याचबरोबर विविध स्तरावरील कार्यकर्त्यांचे क्षमतावर्धन करून ॲक्वाडॅम माहिती गोळा करते; आणि ह्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या इतर संस्था आणि धोरणकर्त्यांपर्यंत ती पोहोचवते.

भूजलधारकावर आधारित (ॲक्विफिर बेस्ड) कृतीशील संशोधन आणि भूजलाविषयी वैज्ञानिक माहितीचा सोप्या भाषेत प्रसार आणि प्रचार ही अ‍ॅक्वाडॅमच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत. यासाठी अ‍ॅक्वाडॅम भारतभरातील साडेतीनशेहून अधिक बिगरशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, केंद्रशासन आणि काही राज्यशासने यांच्या बरोबर काम करत आहे. अ‍ॅक्वाडॅमने भूजलाचा विकास आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, अध्यापक आणि विद्यार्थी इत्यादींनाही प्रशिक्षणात सहभागी करून घेतले आहे.

केंद्रस्तरीय आणि वेगवेगळ्या राज्यस्तरीय भूजल व्यवस्थापन धोरणांमधे अ‍ॅक्वाडॅमने उपयुक्त सूचना केल्या आहेत. भारताच्या भूजल मूल्यांकन कार्यपद्धतीत सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. बाराव्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय भूजलधारक-मापन-कार्यक्रमाचा विकास यांसारख्या उपक्रमांमधेही अ‍ॅक्वाडॅमचे योगदान आहे. भारतातील निरनिराळ्या ठिकाणच्या भूजलसमस्या सोडविण्यासाठी अ‍ॅक्वाडॅमने प्रयत्न केले आहेत. काही राज्यांमधली पाण्याशी निगडित मंत्रालये भूजल व्यवस्थापनाबाबत अ‍ॅक्वाडॅमशी सल्लामसलत करत असतात.

गेल्या काही वर्षांमधे अ‍ॅक्वाडॅमने भूजलविषयक गावपातळीवरील माहितीसंकलन, संशोधन आणि प्रशिक्षण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून भारताच्या विविध भागांमधे काम केले आहे. भूजल व्यवस्थापनासाठी भूजलाच्या एकाच स्रोतावर अवलंबून असणाऱ्या सर्वजणांचा सहभाग; आणि डोंगराळ भागातील भूजलस्रोत आणि झरे यांचे एकात्मिक व्यवस्थापन या दोन संकल्पना राष्ट्रीय स्तरावर राबवण्यामधे अ‍ॅक्वाडॅमचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यासाठी अ‍ॅक्वाडॅमने जवळपास सर्व राज्यांमध्ये विविध स्थानिक संस्थांच्या माध्यमातून काम केले आहे. शेजारील देशांमधेही, विशेषत: नेपाळ आणि भूतानमधील प्रशिक्षण आणि संशोधन प्रकल्पांमधे, अ‍ॅक्वाडॅमचा सहभाग आहे. अ‍ॅक्वाडॅमने येणाऱ्या काळाची पाउले ओळखून शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात भूजलशास्त्र आणि भूजलव्यवस्थापन या विषयांच्या समावेशासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. आजमितीस अ‍ॅक्वाडॅम देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून भूजलविज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम विकसित करण्यात सक्रिय आहे. तसेच अंतर्निवासी (इंटर्नशिप) पद्धतीने अ‍ॅक्वाडॅम पदव्युत्तर विद्यार्थ्यांना भूजल समस्यांबद्दल माहितीही देते आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणाचा अनुभवही मिळवून देते.

आज अ‍ॅक्वाडॅममधून प्रशिक्षण घेतलेले अनेक प्रशिक्षणार्थी खाजगी क्षेत्रात, तसेच शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांमधे भूजलासाठी सर्वेक्षण, माहिती संकलन, ज्ञानदान आणि व्यवस्थापनाच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

संदर्भ :

समीक्षक : विद्याधर बोरकर