बेंजामिन, बर्नार्ड : (८ मार्च १९१० – १५ मे २००२) बेंजामिन यांचा जन्म लंडनमध्ये झाला, त्यांचे शालेय शिक्षण लंडनच्या लुइशॅममधील कोल्फ्स ग्रामरमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी सर जॉन कॅस महाविद्यालयामधून भौतिकशास्त्रातील पदवीचे रात्र-शिक्षण नोकरी करत घेतले. लंडन काउंटी कौन्सिलची (एलसीसी) नोकरी त्यांना स्पर्धात्मक परीक्षेतून मिळाली. उत्तम गणिती कौशल्यांमुळे त्यांना एलसीसीच्या निवृत्तीवेतन निधी विभागात सहाय्यक-विमागणिती पद मिळाले. त्यांचा गणिती कल पाहून तिथल्या दोन ज्येष्ठ विमागणितींनी बेंजामिन यांना विमागणित आणि संख्याशास्त्रात कारकीर्द करण्यास प्रवृत्त केले. इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअरीजची अधिछात्रताही बेंजामिननी मिळवली.

दुसऱ्या महायुद्धातील नोकरीच्या आरंभापर्यंत एलसीसी, जनरल रजिस्टर ऑफिस आणि आरोग्य मंत्रालय यांतून काम करताना बेंजामिन यांचा संबंध वैद्यकीय व्यवसायाशी अनेकदा आला. यातून त्यांचे वैद्यकशास्त्राचे विशेषतः रोगप्रसारशास्त्राचे ज्ञान सखोल झाले. युद्धादरम्यान काही काळ, ब्रिटिश वायुसेनेत संख्याशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले. पूर्वीच्या कामावर परतल्यावर अर्धवेळ चाललेल्या पीएच्.डी.साठी त्यांनी क्षय रोगाने होणाऱ्या मृत्यूच्या विश्लेषणावर प्रबंध सादर केला.

निवृत्तीवेतन हक्कांच्या विकास आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरील त्याचा प्रभाव, हा अहवाल तयार करणाऱ्या संघाचे नेतृत्त्व सक्षमतेने करणे, ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी ठरली. या कामाचा उपयोग पुढील काळात वृद्धापकाळाच्या तरतुदीसाठी आर्थिक आणि वित्तीय समस्यांवर काम करणाऱ्या फिलिप्स समितीला झाला. हा आगळावेगळा अहवाल अद्ययावत करण्याचे कामही बेंजामिननी केले आणि ‘पेन्शन द प्रॉब्लेम्स ऑफ टुडे अँड टुमॉरो’ हा अहवाल तयार केला.

संपूर्ण कारकिर्दीभर त्यांचा संबंध सार्वजनिक आरोग्याशी निगडीत क्षेत्रात संख्याशास्त्र वापरणे, केंद्रीय आणि स्थानिक आरोग्य प्रशासनाला आवश्यक माहिती पुरविण्यासाठी विदा मिळविण्याच्या पद्धती विकसित करणे आणि विदेच्या विश्लेषणपश्चात मिळालेले निष्कर्ष प्रशासनाला चटकन आणि सहज समजतील अशा भाषेत मांडणे, यांच्याशी आला. अकरा वर्षे हे काम केल्यावर त्यांना आरोग्य मंत्रालयाच्या संख्याशास्त्र विभागाचे संचालकपद मिळाले. तीन वर्षांनी ते ‘ग्रटर लंडन कौन्सिलच्या गुप्तचर विभागाचे पहिले संचालक झाले. त्यांचे काम होते, कौन्सिलला योग्य वेळी, योग्य मार्गाने आर्थिक आणि इतर बाबींची माहिती मिळेल हे पाहणे.

बेंजामिन यांचे वैज्ञानिक कार्य आणि रूची व्यापक क्षेत्रांत होती. जवळपास ४० वर्षांत त्यांचे सांख्यिकी, विमागणित आणि जनसांख्यिकी विषयक संशोधनपत्रिकांतून शंभरावर शोधनिबंध प्रकाशित झाले. मुद्देसूद, मनोरंजक आणि एकहाती लिखाण करण्याच्या प्रतिभेमुळे बेंजामिन यांनी मागणीनुसार पाठ्यपुस्तके आणि प्रबंधिका यांची मालिकाच तयार केली. आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, सर आर्थर न्यूजहोम यांचे अमेरिकेतही लोकप्रिय ठरलेले पुस्तक द एलिमेण्ट्स ऑफ व्हायटल स्टॅटिस्टिक्स हे अद्ययावत करण्याची बेंजामिनना विनंती करण्यात आली होती. परंतु अद्ययावत करताना एक नवेच पुस्तक एलिमेण्ट्स ऑफ व्हायटल स्टॅटिस्टिक्स त्यांच्याकडून लिहिले गेले. कारण, तोपर्यंत सार्वजनिक आरोग्य, जनसांख्यिकी आणि तत्संबंधी सांख्यिकी पद्धतीत खूप बदल झाले होते. सोशल अँड इकॉनॉमिक डिफरन्शिअल्स इन फर्टिलिटी; सोशल अँड इकॉनॉमिक फॅक्टर्स ॲफेक्टिंग मॉर्टॅलिटी; हेल्थ अँड व्हायटल स्टॅटिस्टिक्स; डेमोग्राफिक ॲनालिसिस आणि पोप्युलेशन स्टॅटिस्टिक्स हे त्यांचे महत्त्वाचे लेखनकार्य आहे. इतरांच्या आग्रहामुळे ॲनालिसिस ऑफ मॉर्टॅलिटी अँड अदर ॲक्च्युअरिअल स्टॅटिस्टिक्स हे पाठ्यपुस्तक त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअरिजमधील सहकाऱ्यासह लिहिले. नंतरच्या काळांत त्यांनी सर्वसामान्य विम्यावरील विमागणिताचे उपयोजन या नव्या क्षेत्रावरही पाठ्यपुस्तक लिहिले.

विमागणित आणि संख्याशास्त्र यांतील अतुलनीय क्षमतेमुळे बेंजामिनना अनेक सन्मान्य पदे मिळाली. ते आठ वर्षे संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या आयोगावरील ब्रिटनचे प्रतिनिधी, सैन्यात वैद्यकीय सांख्यिकीचे मानद सल्लागार आणि समाजशास्त्र संशोधन परिषदेच्या सांख्यिकी समितीचे सदस्य होते, वर्षभर ते बेंजामिन जनसांख्यिकीच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीसही होते. बेंजामिन, इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअरीजचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष निवडले गेले. विमागणितात अपूर्व योगदान दिल्याबद्दल या इन्स्टिट्यूटतर्फे त्यांना सुवर्ण पदक देण्यात आले. बेंजामिन रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीचेही मानद सचिव आणि अध्यक्ष होते. या सोसायटीनेही त्यांच्या अविस्मरणीय कार्याचा गौरव गाय सुवर्ण पदक देऊन केला.

निवृत्तीनंतर बेंजामिन नवस्थापित सिव्हील सर्व्हिस कॉलेजमधील सांख्यिकी अभ्यासाचे पहिले संचालक झाले. यांनतर ते सिटी युनिव्हर्सिटीत विमागणितशास्त्राचे संस्थापक-प्राध्यापक झाले आणि नंतरही निमंत्रित व्याख्याता, सल्लागार म्हणून कार्यरत राहिले. इथे त्यांनी बनविलेला देशातील विमागणितशास्त्राचा प्रथम अभ्यासक्रम अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्यांच्या चार विद्यार्थ्यांना पीएच्.डी. मिळाली. त्यानंतर त्यांनी असोसिएशन ऑफ ब्रिटीश इन्शुरन्स या संस्थेच्या आधारे सिटी विद्यापीठाच्या बिझिनेस स्कूलमध्ये संशोधन, विमा आणि गुंतवणूक केंद्र स्थापन करण्याचा ध्यास घेतला. नाविन्यपूर्ण असलेल्या या कल्पनेला तेव्हा विरोध झाला. मात्र बेंजामिन यांच्या मृत्यूपश्चात सिटी विद्यापीठाचा विमागणित आणि संख्याशास्त्र विभाग कॅस बिझिनेस स्कूलशी जोडला गेला. भरीव योगदानांसाठी सिटी विद्यापीठाने बेंजामिनना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान केली.

जीवन-विम्याव्यतिरिक्तच्या विमा दाव्यांचे प्रतिमान बनविण्याच्या क्षेत्राचे ब्रिटनमधील एक संस्थापक अशी ओळख बेंजामिन यांना लाभली.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर