अँड्र्यू ब्रूक्स : (१० फेब्रुवारी १९६९ – २३ जानेवारी २०२१) अँड्र्यू ब्रुक्स यांचा जन्म ब्रॉन्क्सविल न्यूयॉर्क येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ओल्ड ब्रिड्ज टाऊनशिप, न्यू जर्सी येथे झाले. नंतर पशुवैद्य होण्याच्या उद्देशाने त्यांनी प्राणीविज्ञानामध्ये पदवी संपादन केली. परंतु स्लोन केटरिंग कॅन्सर केंद्रात इंटर्नशिप केल्यानंतर मानवी रोगांमध्ये त्यांना रुची निर्माण झाली आणि रॉचेस्टर विद्यापीठातून त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र आणि इम्यूनोलॉजीमध्ये पीएच्.डी. मिळविली.

पीएच्.डी. नंतर चार वर्षे त्यांनी रॉचेस्टर विद्यापीठात निर्देशक पदावर कार्य केले. नंतर ते रटझर्स विद्यापीठात काम  करण्यासाठी न्यू जर्सीला परतले. पर्यावरणीय औषधी आणि अनुवंशशास्त्र, पर्यावरणीय आणि व्यावसायिक आरोग्यविज्ञान, विषचिकित्साविज्ञान इत्यादी शाखांमध्ये ते कार्यरत होते. नंतर ते रटझर्स विद्यापीठात पेशी आणि केंद्रकाम्ल भांडारात (सेल अँड डीएनए रिपॉजिटरी) माहिती व्यवस्थापन (डेटा मॅनेजमेंट) आणि संशोधन विश्लेषण विभागात कार्यरत झाले. कालांतराने ही संस्था इन्फिनिटी बायोलॉजिक्स या नावाने खाजगी झाली आणि ब्रुक्स त्याचे प्रमुख झाले.

कोविड महामारीमध्ये त्यांनी चाचणीसाठी एक नवीन तंत्र शोधून काढले. नाकातोंडातून स्वाब घेऊन करण्याच्या चाचणीसाठी वेळ जास्त लागतो, सॅम्पल घ्यायला तज्ञ माणसाची गरज असते. ब्रुक्स यांनी निर्माण केलेल्या पद्धतीमध्ये रुग्णाच्या थुंकीवर तपासणी केली जायची. यामध्ये वेळ कमी लागतो, सॅम्पल घेणे एकदम सोपे आहे आणि आरोग्यसेवकांना धोकाही कमी होतो. चाचणीचा निकाल यायलाही कमी वेळ लागतो. या चाचणीच्या वापरासाठी एप्रिल २०२० मध्ये सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाली. आतापर्यंत ४० लक्ष लोकांनी ह्या चाचणीचा वापर केला आहे. या संशोधनासंदर्भात सांगताना ब्रुक्स म्हणतात, शास्त्रज्ञ म्हणून आतापर्यंत एवढा ताण मी कधीच अनुभवला नव्हता, परंतु ध्येय मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे होते. या जीवनकाळात परत अशी परिस्थिती येणार नाही अशी आशा करतो.

आतापर्यंत ब्रुक्स यांची सत्तरच्या आसपास प्रकाशने आणि हजाराच्यावर उतारे प्रकाशित झाले आहेत. कोविड व्यतिरिक्त त्यांचे स्मृती आणि शिक्षण यामध्ये आण्विक पातळीवर काय घडते या क्षेत्रात संशोधन आहे.

गोल्फ त्यांचा आवडता खेळ होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर हौशी खेळाडू म्हणूनही त्यांनी भाग घेतला होता.

हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. कोविड महामारीमध्ये त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.

संदर्भ :

समीक्षक : अनिल गांधी