कॅरेल, अलेक्सिस : (२८ जून १८७३ – ५ नोव्हेंबर १९४४) अ‍ॅलेक्सिस कॅरेल या फ्रेंच शल्यतज्ञ आणि जीव वैज्ञानिकाचा जन्म फ्रान्समध्ये झाला. त्यांच्या आईने त्यांचे शालेय शिक्षण घरीच पूर्ण केले. युनिव्हर्सिटी ऑफ लिओनमधून बॅचलर ऑफ लेटर्स आणि त्याच विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी मिळवली. पुढे त्यांनी पीएच्.डी. मिळवली. लिओन हॉस्पिटलमध्ये त्यांनी शरीरशास्त्र आणि शल्यचिकित्सा विषय शिकवले. त्यांना एल टेस्टुट यांच्या शस्त्रक्रिया विभागात प्रोसेक्टर पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्याकाळी शरीरशास्त्र विभागात शरीरविच्छेदनाचे काम प्रोसेक्टर यांना दिले जात असे. या विषयात त्यांनी प्रायोगिक काम केले. नंतर ते शिकागोमध्ये गेले आणि त्यांनी शरीरक्रियाशास्त्र विभागात जी. एन. स्टेवर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चमध्ये काम केले. १९१२ पर्यंत त्यांनी पूर्ण वेळ संशोधन केले.

त्रिभुजन (triangulation) पद्धत

कॅरेल तरुण शल्यतज्ञ असताना फ्रान्सचे अध्यक्ष सादी कॅर्नॉट यांचा धारदार शस्त्राने खून झाला. प्रतिहारी शीर (portal vein) तुटल्याने अतिरक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. उपचार करणार्‍या शल्यतज्ञांना ही शीर यशस्वीपणे जोडणे शक्य होणार नाही असे वाटल्याने त्यांच्यावर अपुरे उपचार झाले. या घटनेचा कॅरेल यांच्यावर परिणाम झाला. रक्तवाहिन्या जोडण्यासाठी त्यांनी सुधारित तंत्र शोधले. या तंत्रास त्यांनी त्रिभुजन (triangulation) पद्धत वापरली. रक्तवाहिन्यांचे तीन थर जोडताना रक्तवाहिनीस कमीत कमी इजा होईल असे ते तंत्र होते. लहानपणी त्यांनी रफू कारागीर कसे तंत्र वापरत असत याचे निरीक्षण केले होते. दहा वर्षे कॅरेल यांनी प्राण्यांवर या तंत्राचा वापर करून आपले तंत्र सुधारले. शिरा आणि धमन्या जोडण्यातील पद्धती निर्मितीसाठीच्या या संशोधनासाठी त्यांना १९१२ सालचे शरीरक्रिया विज्ञान आणि वैद्यक या विषयासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. आजसुद्धा त्यांची पद्धत प्रतिरोपण शस्त्रक्रिया आणि वाहिन्या जोडण्यात वापरण्यात येते.

पहिल्या महायुद्धाच्या काळात कॅरेल यांनी फ्रेंच आर्मी मेडिकल कोअरमध्ये मेजर पदापर्यंत काम केले. यावेळी त्यांनी कॅरेल डॅकिन पद्धतीने सैन्यातील जखमांवर उपचार केले. ही पद्धत त्यावेळी प्रचलित झाली होती. कॅरेल यांनी केलेले संशोधन हे प्रयोगिक इंद्रिय व ऊती प्रतिरोपणासाठी केले होते. त्यांनी आपले संशोधन लिओन मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध केले होते. हे तंत्र रक्तवाहिन्या जोडण्यासंबंधी होते. त्यांनी बराच वेळ शीत केलेल्या रक्तवाहिन्या प्रतिरोपण शस्त्रक्रियेसाठी वापरता येतात हे सिद्ध केले होते. त्यापूर्वी त्यांनी प्रतिरोपण शस्त्रक्रियेची पद्धत शोधली होती. चार्ल्स लिंडरबर्ग यांच्या बरोबर त्यांनी निर्जंतुक श्वसन अवयव शरीरातून वेगळे करणारे यंत्र बनवले. (चार्ल्स लिंडरबर्ग यांनी एकट्याने अटलांटिक महासागर विमानातून पार केला होता. यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य लिंडरबर्ग यांनी केले. कॅरोल यांनी लिहिलेल्या द कल्चर ऑफ ऑर्गन्स या पुस्तकात यांबद्दलचे विवेचन केले आहे. तसेच त्यांनी मॅन, दी अननोन हे पुस्तक सुद्धा लिहिले आहे.

फ्रेंच सर्जन थिओडोर टुफ्फिएर या उरो शस्त्रशल्यतज्ञाच्या सहकार्याने त्यांनी हृदय झडपांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. (या शस्त्रक्रिया हृदय झडपा कठीण झाल्याने रक्त कमी दाबाने शरीरास पुरवले जाते याला – volvotomy – हृदय झडप बदलण्याची शस्त्रक्रिया म्हणतात) बरोज या वैज्ञानिकाबरोबर त्यांनी उतीवृद्धी मिश्रणात सारकोमा – (स्नायू अर्बुद) पेशी वाढवल्या. हे तंत्र आज हॅरिसन तंत्र या नावाने ओळखले जाते.

यूएसमधील तज्ञांच्या संस्था सभासद, स्पेन, रशिया, स्वीडन, रशिया, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, व्हेटिकन सिटी, जर्मनी, इटली आणि ग्रीस येथे संस्था सभासद आणि बेलफास्ट, प्रिंस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, बाउन आणि कोलम्बिया विद्यापीठातील मानद डॉक्टरेट त्याना प्रदान करण्यात आल्या. फ्रान्समधील सर्वोच्च सन्मान लीजन द होन्नेर ऑफ फ्रान्स तसेच स्पेन, सर्बिया, ग्रेट ब्रिटन आणि होली सी यांचे सन्मान त्यांना देण्यात आले.

पॅरिसमध्ये वयाच्या त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा