जैन, हरी क्रिष्ण (२८ मे १९३० – ८ एप्रिल २०१९) हरी क्रिष्ण जैन यांचा जन्म हरियाणा राज्यातील गुरगाव येथे झाला. हरि क्रिष्ण जैन हे दिल्ली विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विषयात बीएस्सी ऑनर्स झाले. त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) येथे सहयोगी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी पीएच्.डी. मिळविण्यासाठी लंडनच्या रॉयल कमिशनच्या विज्ञान संशोधन शिष्यवृत्तीवर युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ वेल्सच्या अ‍ॅबेरिस्टविथ कॅम्पसमध्ये डॉक्टरेटचा अभ्यास केला आणि परत आल्यावर भारतीय कृषि संशोधन संस्थेमध्ये पेशी वैज्ञानिक म्हणून रुजू झाले.

ते भारतीय पेशी वैज्ञानिक आनुवंशिकीतज्ञ व वनस्पती उत्पादक होते. आनुवंशिक पुनर्संयोजन आणि आंतर गुणसूत्र नियंत्रण योगदानासाठी ते ओळखले जातात. भारतीय कृषि संशोधन केंद्रामध्ये परतल्यानंतर त्यांनी डेल्फिनियममधील जनुकीय पुनर्संयोजन क्रियेतील पेशीक्रियेवर संशोधन केले. आंतर गुणसूत्र पातळीवर याचे नियंत्रण कसे होते हे त्यांनी शोधून काढले. यावरून इतर संशोधकांनी या पद्धतीचे संशोधन करून त्याची खात्री करून घेतली. त्यांनी टोमॅटो आणि फळमाशीवर केलेल्या संशोधनातून रासायनिक उत्परिवर्तके नेमकी कशी परिणाम करतात हे शोधले. भारतीय कृषि संशोधन केंद्रातर्फे त्यांनी अधिक उत्पन्न देणार्‍या गहू पिकावरील संशोधनाचे कार्य हाती घेतले. वनस्पती पेशीतील रायबोसोमनिर्मिती हे  त्यांच्या संशोधनातील महत्त्वाचे क्षेत्र होते. त्यांनी शोधलेल्या आंतर पीक पद्धतीचा वापर पुढे कृषि संशोधन केंद्राने पुरस्कृत केला. Plant Breeding: Mendelian to Molecular Approaches; Genetics: Principles, Concepts and Implications; Green Revolution: History, Impact and Future अशा महत्त्वाच्या पुस्तकांचे लेखन व अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत.

ते बारा वर्षे जननशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत राहिले तर नंतर संचालक पदावरून निवृत्त होईपर्यंत ते इंडियन ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्येच कार्यरत होते. नंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन सल्लागार गटाच्या आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन आंतरराष्ट्रीय सेवा (सीजीआयएआर) येथे उपसंचालक म्हणून काम पाहिले. मग त्यांनी महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या राजस्थान कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, उदयपूर येथे शैक्षणिक कारकीर्द चालू ठेवली, तोपर्यंत इंफाळच्या केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांची नेमणूक झाली.

जैन यांनी लिलियम, ज्यात वनऔषधी लावल्या आहेत. अशा वनस्पतींची एक प्रजाती आणि त्याच्या मेयोटिक पेशी विभागातील सुरुवातीच्या संशोधनांमधून गुणसूत्र संक्षेपण आणि पेशीकेंद्रक संश्लेषण दरम्यानचा संबंध त्यांना दिसून आला.

जैन यांनी भारत सरकारची वैज्ञानिक सल्लागार समिती आणि उत्तर प्रदेश राज्य नियोजन आयोगचे सदस्य म्हणून काम केले. त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्रच्या अन्न व कृषी समितीचे अध्यक्षपद आणि युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फिंअर प्रोग्रामचे भारतीय विभाग आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागच्या जैव तंत्रज्ञान विषयक सल्लागार समितीचे सदस्यपद भूषवले होते. आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या शेतीविषयक सल्लागार गटाचे ते अध्यक्ष होते. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे सन्मान्य वैज्ञानिक या पदावर निवडून आले आहेत. इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमीत ते कार्यरत होते आणि त्यांनी राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

त्यांनी इंफाळच्या केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक अशी पदे भूषवली. त्यांना रफी अहमद किडवई पुरस्कार, बोरलाग पुरस्कार, ओम प्रकाश भसीन पुरस्कार, शांती स्वरूप भटनागर,पद्मश्री, जनुकशास्त्रातील उत्क्रांती संकल्पनांचा अभ्यास आणि त्यांचे कृषी व सामाजिक परिणाम यांच्या प्रकल्पांसाठी, जवाहरलाल नेहरू फेलोशिप, डॉ. बी.पी. पाल पुरस्कार, भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशनचा बी.पी. पाल मेमोरियल पुरस्कार, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे फेलो, भारतीय विज्ञान अकादमीचे निवडलेले फेलो, दोन भारतीय अकादमी, नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया आणि नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्सेसचे फेलो, भारतीय कृषी संशोधन संस्थेचे डॉक्टर ऑफ सायन्स असे सन्मान लाभले. केंद्रीय कृषी विद्यापीठाचां  डॉ. एच. के. जैन सीएयू राष्ट्रीय कृषि संशोधन पुरस्कार  त्यांच्या सन्मानार्थ दिला जातो.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा