लिओनार्दो द विन्चि : (१५ एप्रिल १४५२ – २ मे १५१९) लिओनार्दो द विन्चि इटालीत जन्मले. लिओनार्दो यांनी त्याकाळच्या संपूर्ण इटालीत ज्येष्ठ, ख्यातनाम अशा, आंद्रिआ देल व्हेराच्चिओ या चित्र-शिल्पकाराकडे उमेदवारी केली. लिओनार्दो यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी काम शिकायला सुरुवात केली. कार्यानुभवातून लिओनार्दो यांनी प्रमाणबद्ध नकाशे काढणे, धातुकाम, रसायनशास्त्र, साचे वापरून प्रतिकृती बनवणे, लाकूड काम करणे, चित्रे काढणे व रंगवणे, शिल्पे साकारणे यात कौशल्य मिळविले. लिओनार्दो यांनी शरीरातील भागांचे अगदी काळजीपूर्वक निरीक्षण केले. स्नायू, स्नायूपुच्छे (tendons), अस्थिरज्जू (ligaments), अस्थी, अन्य – मऊ इंद्रिये यांचा अभ्यास केला.
त्यानंतर ते लुडोविको स्फोर्झा यांच्या दरबारात लष्करी अभियंता म्हणून मिलान येथे राहिले. लुडोविको मिलानचे ड्यूक, आणि प्रत्यक्षात सर्वोच्च प्रशासक होते. लुडोविको यांना लष्करी स्थापत्य अभियंता हवा आहे हे लिओनार्दो यांना समजले. लुडोविकोंसाठी लिओनार्दो यांनी स्वतःबद्दल एक टिपण बनवले. त्यातून त्यांच्या चतुरस्त्र कार्यकुशलतेची ओळख होते.
शांतता काळात माझी स्थापत्यकला इमारती, घरे, बाजार, प्रेक्षागृहे, पाणी वाहून नेण्याचे कालवे, यासाठी वापरता येईल. आपल्या टिपणात अभिजात कलेच्या आविष्कारांचा उल्लेख लिओनार्दो यांनी मुद्दामच ओझरता केला. लष्करी उपयुक्ततेवर भर दिला. तरीही लुडोविको स्फोर्झा यांना या माणसाच्या कर्तबगारीची ओळख पटली. परिणामी ते लिओनार्दो यांचे खंदे पुरस्कर्ते बनले. त्यांनी लिओनार्दो यांना आवश्यकतेनुसार शस्त्रास्त्रे, पाणबुड्या बनविणे अशी सरकारी कामे दिलीच. शिवाय १४९० मध्ये द लास्ट सपर ही अभिजात धार्मिक चित्रकलाकृती निर्माण करण्यास प्रोत्साहन आणि अर्थसहाय्य दिले. लिओनार्दो यांनी व्हर्जिन ऑफ द रॉक्स, लेडी विथ ॲन अर्मिन, द व्हिट्रुवियन मॅन, साल्व्हाडोर मुंडी ही प्रशंसनीय चित्रे या काळात काढली. लिओनार्दो एखादी वस्तू, घटना पाहून तिचे अतिशय बारकाईने निरीक्षण करून सचित्र टिपणे काढीत. त्यांनी कधी शाळा कॉलेजमध्ये जाऊन औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. त्यांना गणित येत नव्हते. लॅटिन भाषाही येत नव्हती. त्यामुळे अन्य वैज्ञानिक त्यांना मान देत नसत. परंतु लिओनार्दो आपले काम सातत्याने करत.
लुडोविको यांनी स्फोर्झा यांच्या दरबारात एकूण सतरा वर्षे काम केले. लुडोविको यांनी तेवीस फूट उंच आणि ऐंशी टन वजनाचा त्यांचे वडील, मिलानचे ड्यूक यांचा काशाचा पुतळा बांधण्याची महत्त्वाकांक्षी कामगिरी लिओनार्दो यांच्याकडे सोपवली. हे काम वेळखाऊ आणि किचकट होते. दुर्दैवाने ते पूर्ण होण्याआधीच लुडोविको यांच्याविरुद्ध फ्रेंचांनी मिलानवर हल्ला केला.
त्यानंतर लिओनार्दो रोमला गेले. तेथे तीन वर्षे त्यांनी पोपसाठी काही प्रकल्पांवर काम केले. फ्लोरेन्स आणि मिलानमध्ये त्यांना मानवी मृत देहाचा अभ्यास करण्याची संमती मिळाली होती. मार्कांतिआनो देला तोरेस या डॉक्टरांबरोबर काम करून लिओनार्दो शरीर विच्छेदनात निपुण झाले. लिओनार्दो यांनी स्वतःच जाहीर केल्यानुसार त्यांनी आयुष्यात एकंदर तीस मृतदेहांचे विच्छेदन केले. सुमारे तेरा हजार शब्द आणि दोनशे चाळीस चित्रे एवढा नोंदऐवज त्यानी तयार केला. त्यापैकी फारच थोडा त्यांच्या ट्रीटाइज ऑन पेंटिंग ग्रंथात वापरला गेला.
![](https://marathivishwakosh.org/wp-content/uploads/2022/09/Leonardo-1-217x300.jpg?x35034)
पुढील सुमारे सोळा वर्षे लिओनार्दो इटालीभर योग्य पुरस्कारकर्त्याच्या शोधात भ्रमण करीत राहिले. एक वर्ष त्यांनी लष्करी अभियंता म्हणून सैन्यात नोकरीही केली. लिओनार्दो यांचे प्रयाण कोठेही झाले तरी त्यांचे विद्यार्थी, प्रशसंक आणि त्यांच्या कलाकृतींच्या, धनलाभासाठी नकला करणारे, त्यांच्या मागे येत. लिओनार्दो अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेचे आणि विविध क्षेत्रात गती असणारे अलौकिक व्यक्तिमत्व होते. ते स्थापत्यविशारद, चित्रकार, शिल्पकार, मानचित्रकार (ड्राफ्ट्समन), आणि वैज्ञानिक होते. विज्ञानात त्यांना वनस्पतीशास्त्र, शरीररचनाशास्त्र, जीवाश्मशास्त्र, खगोलशास्त्र यात जास्त रस होता. या सर्वच ज्ञानशाखांत लिओनार्दो यांनी अप्रतिम कामगिरी केली. पंधरा-सोळाव्या शतकात यूरोपात विद्येचे पुनरूज्जीवन झाले. धार्मिक पगडा कमी होऊन समाज ज्ञानी व्हावा. ज्ञानातून जीवनव्यवहार विवेकी व्हावे यासाठी प्रयत्न झाले. असे प्रयत्न करणाऱ्या लोकांपैकी लिओनार्दो द विन्चि एक अग्रगण्य व्यक्ती होते.
लिओनार्दो लोकांना माहीत झाले ते त्यांच्या अत्यंत सुंदर, रंगीत चित्रांमुळे. त्यांच्या नोंद वह्यादेखील प्रसिद्ध झाल्या. त्यांतील अचूक आशयासाठी आणि सुबक, प्रमाणबद्ध, शरीर रचनेचे सखोल ज्ञान दाखवणाऱ्या आकृत्यांसाठी, चित्रांसाठी जाणकारांना त्या एक समृद्ध ठेवाच वाटू लागला. लिओनार्दो यांच्या टिपणाच्या कागदपत्रांची संख्या एकंदर तेरा हजार इतकी आहे. त्यात मजकूर आणि चित्रे, कला आणि विज्ञान यांचा समावेश आहे. भोवतालच्या जीवनाबद्दल दररोज टिपणे लिहीत राहिल्यामुळे एवढा मोठा नोंदसंग्रह उपलब्ध झाला. त्यात वाणसामानाच्या याद्या, लहान बाळांच्या आणि प्राण्यांच्या भावमुद्रा, खडकनिर्मिती क्रिया, तसेच पाण्यावर चालता येईल अशा खास बुटांची रचना, पाण्यातील भोवरे, वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या अवयवांची रचना, युद्धोपयोगी सामग्री अशी नानाविध विषयांची रेलचेल आहे.
लिओनार्दो एका विषयावरील नोंदीत चित्रे आणि मजकूर एकाच पानावर देत. याचा फायदा म्हणजे मजकूर व चित्रे एकत्र सापडत. उदा., बाजूला दिलेल्या गर्भाशयातील भ्रूणाच्या चित्रासह त्याचा माहिती व मजकूरही दिला आहे. लिओनार्दो यांच्यामुळे जगात प्रथमच गर्भस्थ भ्रूणाबद्दल चित्र आणि माहिती अभ्यासकांसाठी उपलब्ध झाली. रक्तवाहिन्या, हृदय, जननसंस्था यावरही लिओनार्दोंनी नोंदी लिहिल्या.
घोडे, गायी, पक्षी, माकडे, अस्वले, बेडूक, अशा प्राण्यांच्या तुलनात्मक शरीररचना दाखवणाऱ्या सचित्र नोंदीही त्यानी केल्या आहेत. माणसांच्या आणि प्राण्यांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या नजरेतून सुटला नाही. वृद्धत्व आणि रोग दाखवणारी अनेक चित्रे त्यांनी काढली. लिओनार्दो यांच्या चित्रात मानवी आणि प्राणी शरीरे जिवंत वाटतात ती लिओनार्दोंच्या शरीररचना अभ्यासामुळे.
लिओनार्दो यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते उजवीकडून डावीकडे फारसी, अरेबिक प्रमाणे लिहीत. भौतिकी आणि अभियांत्रिकीत उड्डाण करणारे यंत्र, हवेचे मळसूत्र अशी हेलिकॉप्टरची पूर्वरूपे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संततगती (perpetual motion) आणि घर्षण अभ्यासून काही निश्चित नियम मिळतात का पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एखाद्या यंत्राचे आतील भाग एकमेकांपासून मुद्दाम अलग करून दाखवणे ही चित्रपद्धती त्यांनी प्रथमच वापरायला सुरू केली. वाफेवर चालणारी तोफ बनवण्याचे प्रथम प्रयत्न लिओनार्दो यांनीच केले. रथासारखे पण समोर गोल फिरणारे चार मोठे कोयते लावलेले युद्धवाहन त्यांनी बनवले.
लिओनार्दो यांनी आपल्या चित्रांतून आधुनिक मानवी मूल्ये लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मृत्यूला सहाशेपेक्षा अधिक वर्षे झाली. तरी अजूनही संस्कृती, चित्रकला, रंगचित्रे, शिल्पकला कामांची चर्चा होते तेव्हा लिओनार्दो यांच्या नावाचा आदरपूर्वक आवर्जून उल्लेख होतोच. लिओनार्दो विवेकवादी होते. त्यांनी प्रसंगी धर्मविरोधी विचारही मांडले.
मोनालिसा ही लिओनार्दो यांची ते फ्लोरेन्समध्ये रहात असताना काढलेली कलाकृती त्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती गणली जाते. अनेक तज्ज्ञ आणि रसिकांच्या मते ही जगातील सर्वोत्कृष्ट चित्र कलाकृती आहे. लिओनार्दो यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या ट्रिटाइज ऑन पेंटिंग नावाच्या ग्रंथात कलाकारांनी प्रचलित विचारांप्रमाणेच कलाविष्कार केला पाहिजे असे नाही. असे त्यांनी प्रतिपादन केले.
आयुष्याच्या शेवटी, फ्रान्सिस पहिले, यांच्या आमंत्रणाला मान देऊन ते फ्रान्सला गेले. तेथे लिओनार्दो यांना राजपुरस्कृत प्रमुख रंगचित्रकार, अभियंता, स्थापत्यकार असे सन्मानाचे पद देण्यात आले. चांगले वेतन आणि राजमहालाजवळ प्रशस्त घर राजे फ्रान्सिस यांनी त्यांना बहाल केले. फ्रान्समध्ये तीन वर्षे राहिल्यानंतर क्लोस लुस, आम्ब्वा येथे लिओनार्दो यांचा देहांत झाला. मेंदूत रक्तस्राव – मस्तिष्काघात हे मृत्यूचे कारण असावे.
लिओनार्दो यांच्या मृत्युसमयी खुद्द राजे फ्रान्सिस, त्यांच्या जवळ देखभाल करत होते असे मानतात.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Leonardo-da-Vinci
- https://www.fulltextarchive.com/cache/The-Notebooks-of-Leonardo-Da-Vinci-Complete1.html
- The Notebooks of Leonardo Da Vinci, Jean Paul Richter, 1883
समीक्षक : मोहन मद्वाण्णा