आंतरजालीय समाज हा एक अस्पष्ट असा विस्तीर्ण समूह आहे, जो एकाच वेळेस असंख्य लोकांनी जोडलेला असतो; परंतु समूहाची वैशिष्ट्ये आणि सीमा मात्र त्यामध्ये स्पष्टपणे दिसत नाही. आंतरजालीय समूहाद्वारे प्रत्येकजण दूरदूर पोहचू शकतो आणि अनेक लोकांबरोबर जोडला जाऊ शकतो. सामाजिक आंतरजाल ‘कमकुवत संबंधांचा समूह’ मानला जातो. अर्थात, हे संबंध जरी कमकुवत असले, तरी ते व्यक्तीसाठी महत्त्वाचे संसाधन आहे. उदा., नोकरी शोधण्यासाठी या आंतरजालाचा भरपूर उपयोग होतो.
आंतरजालीय समाज ही संकल्पना समूहांच्या किंवा संघटनांच्या व्याख्येच्या पलीकडे आहे. समूह किंवा संघटना यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची सीमा असते. त्यामध्ये समोरासमोरील प्रत्यक्ष आंतरक्रिया गृहित असतात. याविरुद्ध आंतरजालीय समाजाची संकल्पना नात्यांचे आणि संबंधांचे अतिशय वेगळे आणि नावीन्यपूर्ण रूप कल्पिते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ही नाती दूर अंतरांवरूनही विकसित होतात. आंतरजालाच्या माध्यमातून सामाजिक संकेतस्थळावरून एकाच वेळेस अनेक लोकांना एकमेकांशी जोडता येऊ शकते. सामाजिक आंतरजालीय माध्यमातून दोन व्यक्ती, दोन समूह किंवा राष्ट्र-राज्येही एकमेकांशी जोडली जाऊ शकतात. सामाजिक आंतरजाल लहान, सरळ किंवा अतिशय मोठे आणि गुंतागुंतीचे असू शकतात; कारण सामाजिक आंतरजाल एकापासून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे अशा अनेक थरांमधून विकसित होत असतात. एकाच वेळी एकाचे किंवा काहींचे अन्य एका किंवा काहींशी, तसेच अनेकांशी संवादातून नाते निर्माण होऊ शकते. यातील व्यक्तींच्या भूमिका, पद किंवा स्थान वैविध्यपूर्ण असतात आणि वेगवेगळ्या लोकांबरोबरचे नाते, पोहोच वेगवेगळ्या स्वरूपात असते. या आंतरजालाचे वैशिष्ट्य त्यांच्या वैविध्यात आहे. अशा नात्यांची वारंवारिता आणि तीव्रता वेगवेगळी असू शकते. त्यांची दिशा, आशय तसेच गुणवत्ता यांमध्ये भरपूर वैविध्य असू शकते. सामाजिक आंतरजालांवरील काही नाती अतिशय घट्ट विणीची, एकमेकांशी घट्टपणे जोडलेली असू शकतात; तर काही विरळ, सैल बंध असलेली असू शकतात. आंतरजालांमधून जोडले गेलेले लोक हे महाविद्यालये, विद्यापीठे, स्थनिक समुदाय किंवा राजकीय पक्ष यांतून जोडले गेलेले असू शकतात. अधिकतर आंतरजाल हे तरुण, शहरी, निमशहरी आणि शिकलेल्या व्यक्तींनी व्यापलेले दिसते.
प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ मॅन्युएल कास्टल्स यांच्या मते, ‘आंतरजालीय समाज म्हणजे असा समाज की, जेथे समाजातील महत्त्वाच्या संरचना आणि व्यवहार या लहानसहान स्वरूपातल्या विद्युतीय साधनांमार्फत बनलेल्या माहिती आणि संप्रेषण आंतरजालाने आकाराला येतात’. मोठ्या प्रमाणावर सामाजिक आंतरजालांनी व्यापलेल्या जगात आज सामाजिक संबंधसुद्धा आपल्या अस्तित्वासाठी या आंतरजालांवर अवलंबून आहेत. सामाजिक आंतरजालांमधील सामाजिक नाती-संबंध आणि संप्रेषणाच्या आकारबंधांमध्ये काही निश्चित बदल दर्शवितात. काही आंतरजाल संबंध अतिशय जवळचे, पारंपरिक स्वरूपाचे असतात. उदा., महाविद्यालयाचे मित्र, जे अनेक वर्षांनीही ईमेलवर किंवा भ्रमणध्वनीवर संपर्कात राहतात; परंतु सामन्यत: आंतरजालसंबंध हे अशा लोकांमध्ये अधिक असतात की, ज्यांच्याबद्दल आपण फक्त ऐकून असतो किंवा ते आपल्याबद्दल ऐकून असतात; पण त्यांच्या बरोबर आपली प्रत्यक्ष आंतरक्रिया असलीच तरी खूप कमी असते.
आंतरजालामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असून त्याचे स्वरूप सतत बदलत असते. भ्रमणध्वनी हे आंतरजालाचे एक साधन आहे. करोडो भ्रमणध्वनी हे अगदी क्षणार्धात करोडो व्यक्तींना कोठेही व केव्हाही संपर्कात आणत असतात. भ्रमणध्वनीचे तंत्रज्ञान प्रचंड वेगाने बदलत आहे. त्याच बरोबर आंतरजालीय संबंधांचे स्वरूपही अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. भ्रमणध्वनीचा प्रसार आणि प्रभाव जगभर आहे. दिवसागणिक स्वस्त होत चाललेल्या भ्रमणध्वनीचा प्रसार गरीब, कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्येसुद्धा प्रचंड होत आहे. भ्रमणध्वनीमुळे आपल्या संपर्क आणि संप्रेषणाचे आकृतीबंध संपूर्णपणे बदलून गेले आहेत. निव्वळ भ्रमणध्वनीवरून आज आपण जगातील कोणाशीही, कोणत्याही वेळेस संबंध प्रस्थापित करू शकतो. इतिहासात आपण प्रथमच अशा ठिकाणी पोहोचलो आहोत, जेथे व्यक्ती, समाज सतत संपर्कात असू शकतो. या आंतरजालीय संपर्कामुळे अनेक महत्त्वाचे बदल झालेले दिसतात. उदा., भ्रमणध्वनीमुळे घर आणि बाहेर या दोन अवकाशातील पारंपरिक विभाजन किंवा दुभंग जवळजवळ नाहीसा झाला आहे. त्याच बरोबर हे साधन कोठेही, कधीही व्यक्तीच्या आयुष्यात हस्तक्षेप करताना दिसतात. व्यावसायिक, कौटुंबिक नात्यांच्या संपर्काचे आकृतिबंध यामुळे मोठ्या प्रमाणावर बदलतात. भारतासारख्या सरंजामी विचारसरणीच्या देशात या नव्या साधनाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर बंधने व शोषण तीव्र करण्यासाठी झाल्याची अनेक उदाहरणे दिसून आली. उदा., दुय्यम कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून कार्यालयीन बाहेरची कामे सांगणे; तसेच पत्नी, बहिण, मुलगी यांच्यावर नजर ठेवणे इत्यादी.
भ्रमणध्वनीमुळे व्यक्ती अधिक स्वतंत्र झाली की, तिची बंधने वाढली हे ज्याच्या त्याच्या सामाजिक स्थानावर ठरते. काही अभ्यासकांच्या मते, भ्रमणध्वनीमुळे सतत संपर्कात राहिल्यामुळे कौटुंबिक संबंध अधिक बळकट झाले. शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेरगावी किंवा परदेशी असलेली मुले आपल्या आई-वडिलांच्या संपर्कात राहण्याची शक्यता वाढली. जुन्या मित्र-सहकार्यांबरोबर अनेक वर्षांनी संपर्क होऊ लागला. म्हणजेच, सामाजिक सामंजस्य किंवा ऐक्य यांची गुणवत्ता ठरवण्यामध्ये भ्रमणध्वनी हे आंतरजालीय साधन महत्त्वाची भूमिका निभावते. भ्रमणध्वनीप्रमाणेच इतर सामाजिक आंतरजालीय साधनेसुद्धा व्यक्तींच्या नातेसंबंधांमध्ये, सामाजिक आंतरक्रीयांमध्ये आता महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. असंख्य आंतरजालीय समूह वैयक्तिक ते व्यावसायिक अशा विविध उद्दिष्टांसाठी सक्रीय आहेत. उदा., फेसबुक, व्हाट्स अॅप, इंस्टाग्राम, ट्विटर, इमेल, टेलिग्राम इत्यादी.
सामाजिक आंतरजालांनी व्यक्तिगत नातेसंबंधांचे स्वरूप आंतर्बाह्य बदलले. सामाजिक आंतरक्रियेसाठी व्यक्ती समोर असण्याची गरज संपविली. समुदायांचे अर्थ बदलले. पारंपरिक समुदायांप्रमाणे महाजाल समुदाय स्थानिक नाहीत. त्यांच्या सदस्य संख्येला सीमा नाही. काळ आणि अवकाश यांचे संदर्भ पूर्ण बदलले. काही टीकाकार या परीघटनेला समुदाय म्हणायला तयार नाहीत. त्यांच्या मते, सामाजिक आंतरजाल आपल्याला ‘दरिद्री (कमी गुणवत्तेच्या) संप्रेषणा’कडे घेऊन जात आहेत. याउलट, सामाजिक आंतरजालाच्या समर्थकांच्या मते, आंतरजालीय समूह स्वत:ची एक उपसंस्कृती बनवितात. त्यांची वेगळी भाषा, मूल्ये, नियमन, कायदे असतात. हे समूह एकमेकांना मदत करणे, माहिती पुरविणे, भावनिक आधार देणे हे तर करतातच; परंतु वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक बंध प्रस्थापित करून सदस्यांची स्वप्रतिमा निर्माण होण्यामध्येसुद्धा मदत करतात. येथे समाजाने परीघावर ढकललेल्या व्यक्ती आणि समूहांचे उदाहरण देता येईल. उदा., समलिंगी व्यक्तींना स्वत:चे सामाजिक आंतरजालीय समुदाय निर्माण करून एकमेकांसाठी सुरक्षित संवादाची जागा निर्माण करता येते. एकत्र येऊन आपले प्रश्न मांडता येऊ शकतात, समस्यांचे समाधान करता येऊ शकते, संघटित आवाज उठवता येऊ शकतो. या शक्यता पारंपरिक समुदायांनी नाकारलेल्या असतात.
माहिती आधारित समाजामध्ये समावेशन आणि वर्ज्य किंवा वगळणे या दोन प्रक्रिया अंतर्भूत असतात, असे कास्टल्स यांचे मत आहे. उत्पादन, उपभोग, दळणवळण आणि उर्जा यांची रचना करणार्या जागतिक आंतरजालामध्ये समावेशन किंवा वगळणे यांमुळे विशिष्ट समाज (राष्ट्र-राज्ये किंवा स्थानिक समुदाय) गंभीरपणे प्रभावित होतात. हे माहिती आधारित समाजाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. माहिती आधारित आंतरजालाच्या स्वरूपानुसार जे लोक त्यांच्या कामकाजासाठी महत्त्वाचे आहेत, तेच लोक आणि संसाधने समावेशित केली जातात व स्वीकारली जातात. याउलट, ज्यांचे या समाजाच्या कामकाजामध्ये काही मूल्य नाही (इतर लोक, पदे, समुदाय) त्यांना वगळले जाते. उदा., कोविड काळात भारतासह जगातील ग्रामीण, मागास आणि आदिवासी लोक शिक्षण, काम आणि नागरी सुविधांपासून मोठ्या प्रमाणात वंचित राहिले; कारण त्या वेळी माहिती आधारित समाजामध्ये अत्यावश्यक असणारी साधनांचा (अँड्रॉइड भ्रमणध्वनी, आंतरजाल, वीज) अभाव होता. त्या काळात अनेक मूलभूत विभाजने निर्माण झाली. उदा., कामगारांची विभागणी, बेकारी आणि गरिबीचा सापळा. याउलट, माहिती तंत्रज्ञान आणि साधने यांवर मालकी, प्रभुत्व असणारे लोक सत्ता, विकास संधी, शिक्षण, रोजगार इत्यादींबाबतीत समावेशित व अग्रेसर राहिले. एखाद्याच्या इच्छेवर दुसऱ्याच्या इच्छेला लादण्याची क्षमता म्हणून शक्तीची व्याख्या केली जाऊ शकते. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर आंतरजालीय समाजात माहिती संसाधने आणि संप्रेषणावरील नियंत्रण किंवा प्रभाव यांतून शक्ती मिळवली व गाजवली जाते. माहिती संसाधने आणि संप्रेषणावरील नियंत्रण यांमुळे आपली मूल्ये आणि ध्येये समाजावर लादण्याची आणि वर्चस्व गाजविण्याची क्षमता या वर्गाकडे असते.
एकविसाव्या शतकात जागतिक सामाजिक व्यवस्थेच्या स्वरूपात अनेक बदल झाले आहेत. भांडवलशाही आणि माहिती तंत्रज्ञानातील क्रांती यांच्या संयोगामुळे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडून आले आहे. तसेच नवीन संप्रेषण पद्धतींचा उदय, नव्या अस्मितांची निर्मिती आणि बदलते राजकीय आकृतिबंध, विशेषत: सामाजिक चळवळीची भूमिका इत्यादी घटक कार्यरत आहेत. आंतरजाल आणि प्रवाह या संकल्पना केंद्रीभूत आहेत. विविध आंतरजाल आणि त्यांना जोडणाऱ्या माहिती, पैसा, माणसे या विविध प्रवाहांना समजून घेताना आंतरजालीय समाजाचे स्वरूप स्पष्ट होत जाते.
नव्या संप्रेषण तंत्रज्ञानामुळे आपले अवकाश आणि काळ यांचे संदर्भ बदलत चालले आहेत. किंबहुना या दोन्हींची अमुलाग्र पुनर्रचना होत आहे. स्थानिक आता जागतिक झाले आहे; भूतकाळ आता सततच आपल्या सोबत असतो आणि भविष्यकाळ आपण अनुभवायच्या आधीच अवतरलेला असतो. जेव्हा व्यक्ती संगणकापुढे बसतो, तेव्हा तो एकाच वेळी सगळीकडे असतो; परंतु तो त्याच वेळी कोठेच नसतो. या सगळ्याचा आपण स्वत:बद्दल काय विचार करतो, स्वत:कडे कसे पाहतो, आपली अस्मिता, आपल्या राजकीय कृती (चळवळीमधील सहभागातून) आणि काम व कुटुंब यांमार्फतचे आपले जगणे, यांवर अतिशय दूरगामी परिणाम होत आहेत. आंतरजालांचा प्रसार, अंकीय (डिजिटल) माहिती आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान इत्यादींमुळे झालेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक बदलांच्या संदर्भात मांडली गेलेली ही संकल्पना आजची समाजिक वास्तविकता समजून घेण्यासाठी आंतरजालीय समाज ही संकल्पना महत्त्वपूर्ण योगदान देते. तसेच बदलत्या काळानुसार आणि परिस्थितीनुसार या संकल्पनेच्या पुनर्मांडणीचे प्रयत्न होतांना दिसत आहेत.
संदर्भ :
- Castells, Manuel, The Information Age : Economy, Society and Culture, The Rise of the Network Society, Vol. 1, UK, 1996.
- Castells, Manuel, The Information Age : Economy, Society and Culture, The Power of Identity, Vol. 2, UK, 1997.
- Castells, Manuel, The Information Age : Economy, Society and Culture, End of Millennium, Vol. 3, UK,1998.
- Castells, Manuel, The network society a cross-cultural perspective, US, 2004.
- Macionis, John J.; Kenneth, Plummer, Sociology : A Global Introduction, London, 2014.
- Webster, Frank, Theories of the information society, London, 2014.
समीक्षक : संजय सावळे