चार भिंतीच्या बाहेर कोणत्याही अध्यापकाविना, नियोजित अभ्यासक्रमाविना, पाठ्यपुस्तकाविना, वेळापत्रकाविना मिळणारे शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय. या शिक्षणात काहीही निश्चित नसते. त्यामुळे याला अनियोजित शिक्षण किंवा प्रासंगिक शिक्षण असेही म्हणतात. हे शिक्षण नैसर्गिक किंवा अनैसर्गिक रीत्या मिळत असून ते पूर्वकल्पित नसते. व्यक्ती हा नैसर्गिक रीत्या कुटुंब, मित्र, शेजारी, क्रीडांगण, बगिचा, पत्रव्यवहार, संपर्क कार्यक्रम, जनसंवाद, जवळच्या व्यक्तीसह उठणे, बसणे, खेळणे, बोलणे, चित्रपट किंवा माहितीपट किंवा टिव्हीवरील विविध कार्यक्रम पाहणे, पुस्तके किंवा वृत्तपत्रे वाचणे यांद्वारे ज्ञान प्राप्त करत असतो; म्हणजेच तो अनौपचारिक शिक्षण घेत असतो. अधिकृत शैक्षणिक आस्थापनांच्या बाहेरील मार्गानेही हे शिक्षण प्राप्त केले जाते. काम, छंद, इतर लोकांशी संपर्क साधून प्राप्त केलेल्या संकल्पना इत्यादी दैनंदिन जीवनातील क्रियांद्वारेही हे शिक्षण मिळत असते. हे शिक्षण मिळविताना विशिष्ट उद्दिष्टे किंवा विशिष्ट कालावधी निश्चित नसतो.

व्याख्या : फिलिप कोम्ब्स यांनी १९६८ मध्ये अनौपचारिक शिक्षण ही संकल्पना मांडली; पण त्याची व्याख्या १९७० नंतर उदयास आली. अनौपचारिक शिक्षण हे प्राचीन शिक्षण पद्धतीचे नवीन नाव आहे.

कोम्ब्स आणि अहमद यांच्या मते, ‘लोकसंख्येतील प्रौढ आणि मुलांच्या निवडलेल्या विशिष्ट उपसमूहांना शिक्षण देण्यासाठी औपचारिक शिक्षण प्रणालीबाहेरचा कोणताही संघटित कार्यक्रम म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय’.

मोतीलाल शर्मा यांच्या मते, ‘अनौपचारिक शिक्षण हा एक सक्रीय, गंभीर, द्वंद्वात्मक शैक्षणिक कार्यक्रम आहे; जो मानवाला शिकण्यास, स्वतःला मदत करण्यास, जाणीवपूर्वक त्यांच्या समस्यांकडे गंभीरपणे संपर्क साधण्यास मदत करतो’.

अनौपचारिक शिक्षणाचे ध्येय एकात्मिक, प्रामाणिक मनुष्य विकसित करणे असून हे शिक्षण समाजाच्या विकासात योगदान देऊ शकते. या शिक्षणातून केवळ व्यक्तीच नव्हे, तर संपूर्ण समाजव्यवस्था शिकत असते. अनौपचारिक शिक्षण प्रणाली वास्तविक जीवनातील अनुभवांपासून वेगळे नाही. आधुनिक शिक्षण प्रणाली ही औपचारिक, अनौपचारिक आणि औपचारिकेतर प्रणालींमध्ये योग्य संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. ही प्रणाली शिक्षणाच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वातावरणाशी समन्वय साधते. शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांनी औपचारिक शिक्षणाचे धोके टाळून औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणांच्या गुणवत्तेचा लाभ घेणे अपेक्षित असते.

लवचिकता ही अनौपचारिक शिक्षणाची गुरुकिल्ली आहे. या शिक्षणात मोकळेपणा आहे. प्रवेश, अभ्यासक्रम, शैक्षणिक स्थळ, शिक्षण व्यवस्था, वेळ आणि प्रशिक्षणाचा कालावधी यांवर कोणतेही बंधन नसते. हे परिस्थितीनुसार बदलत असते. मुक्त शाळा या अनौपचारिक शिक्षण प्रणालीद्वारे औपचारिक शाळांना पर्याय म्हणून समांतर अनौपचारिक प्रणाली सादर करणे, शाळाबाह्य विद्यार्थी, शाळा सोडलेले, नोकरी करणारे प्रौढ, गृहिणी, दुर्गम भागात राहणाऱ्या समाजातील मागास घटकांसाठी शिक्षणाची व्यवस्था करणे, प्रशिक्षणार्थींना माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी ब्रिज अभ्यासक्रमांची व्यवस्था करणे, दूरस्थ शिक्षण पद्धतींद्वारे माध्यमिक, वरिष्ठ माध्यमिक, तांत्रिक आणि जीवन समृद्ध करणाऱ्या अभ्यासक्रमांची व्यवस्था करणे, संशोधन, प्रकाशन आणि माहितीच्या प्रसाराद्वारे शिक्षणाची मुक्त, द्वितीय स्रोत प्रणाली प्रदान करणे हे मुख्य ध्येय आहे. अनौपचारिक शिक्षणातील प्रौढ अध्ययनार्थी नोकरीत असताना शिक्षण घेत असतात.

अनौपचारिक शिक्षण विविध कार्यातून संकलित केले जाते. यामध्ये एकाच वेळी शोध, तपशील, निर्णय घेणे इत्यादी बाबींचा समावेश असतो. अनौपचारिक शिक्षणामुळे व्यक्तीला त्याच्या गरजा, पर्यावरणीय परिस्थिती आणि परस्पर संबंधांची जाणीव होण्यास मदत होते. या शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होऊन तो स्वयंसिद्ध होतो. या शिक्षणात कोणतीही पूर्वतयारी नसून वेळोवेळी काही ना काही शिकायला मिळते.

औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि औपचारिकेतर शिक्षण हे शिक्षणाच्या तीन प्रणाली आहेत. औपचारिकेतर शिक्षणाच्या व्यवस्थेकडे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणातील समायोजन म्हणून पाहिले पाहिजे. ते औपचारिक आणि औपचारिकेतर शिक्षणापासून वेगळे केले जाऊ नये. अन्यथा ती एक अपुरी आणि कुचकामी व्यवस्था सिद्ध होईल. तसेच ते विशिष्ट मूलभूत कौशल्यांपुरते मर्यादित नसावे. सामाजिक-आर्थिक वातावरण, आधुनिक सामाजिक संदर्भात, तसेच अधिक संघटित समुदायासाठी त्याची व्यवस्था केली पाहिजे. अनौपचारिक शिक्षणात कार्यक्रम आयोजित करण्याचे विविध मार्ग म्हणजे अनौपचारिक शिक्षणाच्या संस्था होत. नेहरू क्रीडा केंद्र, कारखान्यांमधील प्रशिक्षण केंद्रे, सार्वजनिक ग्रंथालये, पत्रव्यवहार शिक्षण केंद्रे, क्लब आणि सोसायटी यांसारख्या स्वयंसेवी संस्था, रेडिओ आणि दूरदर्शन क्लब ही सर्व अनौपचारिक शिक्षणाची केंद्र होत.

अनौपचारिक शैक्षणिक संस्थांमध्ये अभ्यासक्रम नसतो. हे शिक्षण संघटित किंवा नियोजित नसते. तसेच ते पदवी किंवा प्रमाणपत्रामध्ये क्रमशः प्रगतीही करत नाही. याउलट, हे एक वैयक्तिक प्रशिक्षण असून ते वातावरणाशी होणाऱ्या आंतरक्रियांतून आणि ज्ञानाच्या इतर स्रोतांतून प्राप्त होणाऱ्या माहितीतून मिळविता येते. अनौपचारिक शिक्षणात शिक्षक किंवा प्राध्यापकांच्या उपस्थितीची आवश्यकता नसते. तसेच त्यासाठी मुद्दाम शिक्षणाचे प्रयत्न करावे लागत नाही. यामध्ये अंतिम परीक्षा, आवश्यक कालमर्यादा, उद्दीष्टे किंवा विशिष्ट वेळापत्रकही नसते. या शिक्षणात कोणत्याही प्रकारचे नियम बंधनकारक नसतात. तथापि, याचा अर्थ असा होत नाही की, त्याची गुणवत्ता औपचारिकपेक्षा निकृष्ट असते. थोडक्यात, अनौपचारिक शिक्षण उत्स्फूर्त, यादृच्छिक आणि समाजात वावरताना घडते आणि त्याचा परिणाम आयुष्यभर टिकतो.

आज शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वदूर मोठमोठ्या संधी असलेल्या प्रचलित शिक्षण व्यवस्था आहेत. त्याच बरोबर अनौपचारिक शिक्षणाचे निरनिराळे प्रयोग करणाऱ्या काही संस्था-संघटनादेखील आहेत. बहुतांश पालकांचा ओढा प्रचलित शिक्षण संस्थांकडे असला, तरी काही जागरुक पालक तसेच विद्यार्थी अनौपचारिक शिक्षणाशीही जोडले गेलेले आहेत. ज्या विषयात शिकण्याची इच्छा आणि आवड आहे, ते शिक्षण मिळणे हे फक्त प्रचलित शिक्षण व्यवस्थेतच शक्य आहे असे नाही; तर शिक्षणाची ही प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या मार्गाने सुरू असते. या शिक्षण प्रक्रियेत नागरिक उत्साही आणि आनंदी दिसतात. स्वयंसेवी संस्थेतर्फे युवक, मुले, महिला, विद्यार्थी, कार्यकर्ते यांच्यासाठी माहिती, कौशल्य आणि दृष्टीकोन विकसित करणारे वेगवेगळी प्रशिक्षणे घेतली जातात. या प्रशिक्षणातून सहशिक्षणाची संकल्पना मांडली जाते. सहशिक्षण प्रक्रियेत अध्यापक आणि अध्ययनार्थी हा एकाच पातळीवरचा मानला जातो. यामध्ये अध्ययनाच्या प्रक्रियेला महत्त्व असते. अध्यनार्थी स्वत:ला सहभागी करून घेतो आणि याठिकाणी स्वत:ला व्यक्त करायला संधी उपलब्ध असते. अशा अध्ययनाच्या प्रक्रियेतूनच निसर्गवादी, पर्यावरणवादी समाजिक कार्य करण्याची जिद्द असणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व घडत असते.

आधुनिक शिक्षण व्यवस्थेत अध्ययन प्रक्रियेला शैक्षणिक व्यवस्थेत अडकविल्यामुळे ही प्रक्रिया नीरस आणि एकांगी होवून बसली आहे. शिक्षण हे खुले आणि नैसर्गिक असावे. त्याला फक्त चार भिंतीत मर्यादित करून ठेवू नये. सर्वजण स्वतःच शिकतात ही प्रक्रिया निरंतर चालणारी असते. संगणक, पाककला, सखी गट, बचत गट, मैत्री शिबिर, खेळघर, विविध कला संस्था, भाषा, तांत्रिक विषय, जीवनकौशल्याधारित अभ्यासक्रम इत्यादींच्या माध्यमांतून शिक्षणाला एक मुक्त प्रवाह निर्माण झाला असून समाजात अशा अनौपचारिक शिक्षणाची गरज वाढत असल्याचे दिसून येते. अन्य देशांत अनौपचारिक शिक्षणाला खूप महत्त्व आहे. जर्मनीत अशा प्रकारचे अनौपचारिक शिक्षण सरकारमान्य असून छोट्या छोट्या शहरांमध्ये ते चालू आहे. भारतामध्येही असे प्रयोग सुरू आहेत.

आज प्रचलित शिक्षण पद्धतीवर अवलंबून न राहता अनौपचारिक शिक्षण पद्धतीचे मह‌त्त्व वाढविण्याची गरज आहे. संवेदनशील नागरिक घडवायचा असेल, तर विविध विषय आणि विविध पद्धतींचा स्वीकार केला पाहिजे आणि तशी मानसिकताही तयार झाली पाहिजे. गोष्टी सांगणे, दात घासणे, कार चालविणे, सायकल चालविणे, विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर करणे इत्यादी बाबी कुटुंबाकडून शिकविले जातात. या सर्व गोष्टींमध्ये आपण माहिती एकत्रित करतो आणि ज्ञान जोडतो. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर विविध मार्गांनी आणि जीवनातील प्रत्येक अनुभवातून अनौपचारिक शिक्षण घेत असतो. अनौपचारिक शिक्षणामध्ये अनुभवाला महत्त्वाचे स्थान असून या अनौपचारिक शिक्षणात अनुभवातून महत्त्वपूर्ण गोष्टी शिकल्या जातात.

समीक्षक : के. एम. भांडारकर