निकोले, चार्ल्स : (२१ सप्टेंबर १८६६ – २८ फेब्रुवारी १९३६) चार्ल्स ज्युल हेन्री निकोले हे फ्रेंच सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म रोवन येथे झाला. चार्ल्स यांचे प्राथमिक शिक्षण रोवन येथील लायसी पियरे कॉर्निले येथे पूर्ण झाले. त्यांचे वैद्यकीय शिक्षणसुद्धा स्थानिक वैद्यकीय शाळेत पूर्ण झाले. पाश्चर संस्थेतून त्यांनी एमडी. पदवी संपादन केली. या पदवीसाठी त्यांना वैद्यकीय शाखेतील ए. गोम्बॉल्ट व पाश्चर संस्थेतील राऊस यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर त्यांनी रोवन येथे वैद्यकीय विद्याशाखा सदस्य म्हणून कार्य केले. नंतर सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळा संचालकाची धुरा सांभाळली.
नंतर निकोले यांची ट्युनिस येथील पाश्चर संस्थेच्या संचालक पदावर नियुक्ती झाली. येथे त्यांनी ऊवांपासून पसरणार्या टायफस ताप या साथीच्या रोगावर संशोधन केले. निकोले यांनी आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभी कर्करोग व घटसर्प प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी संशोधनकार्य केले होते. त्यानंतर त्यांनी टायफस ताप संक्रमित होण्याच्या कारणांचा शोध घेण्याचे कार्य हाती घेतले. आपल्या संशोधनादरम्यान निरीक्षणाच्या आधारे त्यांना असे आढळून आले की संसर्गजन्य टायफस तापाचे संक्रमण दवाखान्यातील रुग्णांबरोबरच बाहेरील रुग्णांमध्येही होते. एक महत्त्वाची गोष्ट ही दिसून आली की रुग्णाने गरम पाण्याने अंघोळ केली, कपडे बदलले तर टायफस तापाचा प्रसार होत नाही. या गोष्टीची कारणमिमांसा केल्यावर त्यांच्या लक्षात आले की रुग्णांच्या अंगावरील ऊवा या टायफस ताप संक्रमित करणार्या संवाहक आहेत.
त्यांनी आपल्या संशोधनाच्या चाचणीकरिता चिपँझीला ऊवांचा संसर्ग केंला. टायफस तापाने ग्रस्त चिपँझीच्या अंगावरील ऊवा घेवून त्या निरोगी चिपँझीत सोडल्या असता त्याला टायफस तापाची लागण झाली. त्यांनी आपल्या प्रयोगाची अनेकदा पुनरावृत्ती केल्यावर खात्रीने सांगितले की रुग्णांच्या अंगावरील ऊवा याच टायफस या संसर्गजन्य तापाच्या संवाहक आहेत.
संशोधनाच्या या पुढील टप्प्यात त्यांनी हे सिद्ध केले की टायफसची प्रमुख प्रसार पद्धत ही टायफसच्या संसर्गित ऊवांचे चावणे नसून त्यांची विष्ठा आहे. संसर्गित ऊवा नंतर लालसर होऊन काही आठवड्यानंतर मरून जातात. पण दरम्यानच्या काळात त्या ऊवा आपल्या विष्ठेतून खूप सूक्ष्मजीव उत्सर्जित करतात. त्यांची ही विष्ठा अगदी कमी प्रमाणात त्वचा किंवा डोळ्यावर चोळली गेली तरी त्यातील सूक्ष्मजीवांचे संक्रमण होते.
त्यांना टायफस या संसर्गजन्य तापाच्या संक्रमणाचे कारण कळल्यावर त्याच्या उपचारासाठी संशोधन सुरू केले. या संशोधनाअंतर्गत त्यांनी ऊवा चिरडून टायफस तापातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तद्रव्यात मिसळून एक साधी लस तयार केली. तयार केलेल्या लसीचा त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केला. तेव्हा त्यांना टायफस तापाची लागण झाली नाही. मग त्यांनी अशा लहान मुलांवर त्या लसीचा प्रयोग केला जे टायफस तापातून बरे झाले होते. पण प्रायोगिक तत्त्वावर लस तयार करण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी होऊ शकला नाही. सन १९३० साली हे कार्य रुडॉल्फ वेगल यांनी परत सुरू केले.
चार्ल्स निकोले यांनी कर्करोग, घटसर्प, टायफस ताप संक्रमित करणार्या वाहकांचा शोध याबरोबरच माल्टा तापाच्या लसीकरणाची ओळख, टीक तापाच्या संक्रमित होण्याचा पद्धतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कर्करोग, स्कारलेट ताप, जुलाब, गोवर, शीतज्वर, क्षयरोग व ट्रायकोमा इत्यादींचा अभ्यास केला. टेनोडॉक्टीलस गुंडी (Ctenodactylus gundi) या ऊतीमधील परजीवी प्रोटोझोआ या सूक्ष्मजीवाची ओळख अशा अनेक विषयांवर संशोधन कार्य केले. उत्तर आफ्रिकेतील ट्युनिस येथील संस्थेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य सुरू झाले व अल्पावधीतच सूक्ष्मजंतू विषयक संशोधन व काही संसर्गजन्य रोगप्रतिबंधक लस व रक्तद्रव्य (serum) निर्मितीचे जगप्रसिद्ध केंद्र म्हणून ते नावारूपास आले.
टायफस ताप व गोवर या रोगातून बरे होण्याकरीता शरीरांतर्गत रक्तद्रव्यात होणारे संरक्षणात्मक बदल ते ओळखू शकत होते. चार्ल्स निकोले हे लिशमानिया डोनोवानी व लिशमानिया ट्रोपिका या सूक्ष्मजीवांची कृत्रिम माध्यमावर वाढ करण्यात यशस्वी झाले. तसेच त्यांचा टायफस संसर्गजन्य ताप प्रसारीत होण्याच्या शोधामुळे प्रथम व द्वितीय महायुद्धाच्या काळात या रोगापासून बचाव करण्याच्या खबरदारीची उपाययोजना करणे सुलभ झाले. या क्षेत्रातील त्यांच्या कामाचा प्रभाव इतका प्रचंड होता की टायफस रोगाच्या साथीच्या वेळी तो पिसवांमुळे पसरणारा म्युराईन टायफस आहे की ऊवांमुळे पसरणारा टायफस ताप आहे याच्यातील फरक त्यांच्या ताबडतोब लक्षात येई.
सोडियम फ्लुओराईड या रसायनाचा परजीवींच्या निर्जंतुकीकारणासाठी त्यांनी प्रथमच वापर केला. या निर्जंतुकरणामुळे तो पराजिवी / जिवाणू नष्ट होत असे परंतु त्याची पेशीरचना नष्ट होत नसे. अशा जंतूंचा वापर त्यांनी लस तयार करण्यासाठी केला. अशा प्रकारे गोनोर्हीया, कॉलरा आणि काही स्टेफायलोकोकल रोगांसाठी तयार केलेली लस फक्त फ्रान्समध्येच नाही तर जगभर वापरली गेली होती.
चार्ल्स निकोले यांच्या संशोधन कार्याचा गौरव अनेक पुरस्कार देऊन केला गेला. ते आय अकॅडेमी डी मेडिसिनचे सहाधिकारी होते. तेव्हा प्रिक्स मोन्टोयन (तीनदा), प्रिक्स ओसीरिस व ट्युनिस रौप्यमहोत्सवी समारंभात विशेष सुवर्णपदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना ऊवांपासून पसरणार्या टायफस ताप या साथीच्या रोगावरील संशोधनाकरीता १९२८ मध्ये औषधे व शरीरशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शास्त्रीय विषयावरील संशोधनाबरोबर त्यांनी कल्पनारम्य साहित्य व तत्त्वज्ञानविषयक पुस्तकांचे लिखाण केले. त्यांची गाजलेली पुस्तके पुढीलप्रमाणे:
Le deux Larrons; Les Contes de Marmouse; Le Destin des Maladies infectieuses; La Nature; Conception et morale biologiques; Responsibilities de la Medecine; La Destinee humaine इत्यादी. त्यांना एक वास्तवतावादी कवी, स्वप्ने पाहणारा सच्चा माणूस म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपल्या कल्पनांचा व चिंतनाचा उपयोग आपल्या संशोधन कार्यासाठीही केला.
आजन्म साहित्य, तत्त्वचिंतन व शास्त्रीय संशोधनात मग्न असणार्या निकोले यांचे ट्युनिशिया येथे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1928/nicolle/biographical/
- https://www.britannica.com/biography/Charles-Jules-Henri-Nicolle
- https://www.jstor.org/stable/7722/j.ctt7zsttt
- https://www.pasteur.fr/en/institut-pasteur/history/charles-nicolle-1866-1936
समीक्षक : नितिन अधापुरे