पश्चिम विदर्भातील एक लोकनाट्य. विशेषत: नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये या लोकनाट्याचे प्रचलन आढळते. या लोकनाट्यातील नायिकेचे नाव गंगासागर हे असून तिच्यासभोवती सारे कथानक फिरत असते; त्यामुळे या लोकनाट्याला नायिकेच्या नावावरुन गंगासागर हे नाव प्राप्त झाले आहे. या लोकनाट्याला लिखित संहिता नसते. केवळ पदे किंवा गीते तेवढी ठरलेली असतात. उर्वरित सारे संवाद पात्रांना प्रसंगानुसार बोलावयाचे असतात. स्वरुप गद्य-पद्य मिश्रित असते. एखादे विधान केले की पुन्हा त्यावर आधारित पद गायचे असते. पूर्वरंग आणि उत्त्ररंग यादोन पर्वात लोकनाट्याचे सादरीकरण होते. पूर्वरंगाचा प्रारंभ गणाने होतो. गणात प्रामुख्याने गणपती, शंकर व पार्वती यांचे स्तवन केले जाते. त्यानंतर नमन गायिले जाते. नमनात पौराणिक देवदेवतांबरोबरच स्थानिक ग्रामदेवता, शिवदेवता जसे हिबाजी, खोड्याखोड्या, भिवसन इत्यादी आदिवासी देवतांनाही स्तविले जाते. या लोकनाट्याला लिखित संहिता नसते. केवळ पदे किंवा गीते तेवढी ठरलेली असतात. उर्वरित सारे संवाद पात्रांना प्रसंगानुसार बोलावयाचे असतात. या लोकनाट्याचे स्वरुप गद्य-पद्य मिश्रित असते. एखादे विधान केले की पुन्हा त्यावर आधारित पद गायचे असते अशा रीतीने कथानक पुढे जात असते.
या लोकनाट्याच्या मूळ कथानकात गंगासागर या नायिकेशिवाय तिचा पती असतो. तो आपल्या दिवाणाकडे राज्यकारभार सोपवून शंकराच्या तपश्चर्येकरिता रानात जातो. राजाच्या अनुपस्थितीत दिवाण प्रजेवर तर अत्याचार करतोच पण राणी गंगासागर हिचाही अनन्वित छळ करतो. राजा तपश्चर्येवरुन परत आल्यानंतर त्याला सारे कळते आणि राणी गंगासागर हिची दिवाणाच्या जाचातून मुक्तता होऊन दिवाणाला शिक्षा होते. अशाप्रकारे ह्या लोकनाट्याचा शेवट सुखांत होतो. नायिकेच्या भोवती फिरणाज्या कथेबरोबर आधुनिक समाजकारण व राजकारण यावर भाष्य करीत आणि अयोग्य सामाजिक प्रश्नांवर व्यंग करीत उपकथानके सादर केली जातात. विनोदी प्रवेशांची पखरण केली जाते.
दंडार या लोकनाट्याप्रमाणे या लोकनाट्यात पात्रांची संख्या २०-२२ एवढी असते. स्त्री पात्रांच्या भूमिका पुरुष करतात. कथानक ऐतिहासिक असल्यामुळे त्याप्रमाणे पात्रांची वेशभूषा करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. या लोकनाट्यात ढोलकी हे डफ, मंजिरा, तुणतुणे या लोकवाद्यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. करुण रसाने परिपूर्ण अशा मूळ कथानकाला नवनिर्मित उपकथानकांची सुरेख झालर जोडून विनोदाची पखरण करीत गंगासागर हे लोकनाट्य दोन-तीन शतकांपासून ग्रामीण रसिकांचे मनोरंजन करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा