राव, मांगिना वेंकटेश्वर : (२१ जून १९२८ – ८ मार्च २०१६) मांगिना व्यंकटेश्वरा राव यांचा जन्म पेरूपलम या ठिकाणी जुन्या आंध्र राज्यात पश्चिम गोदावरी जिल्हयात झाला. पदव्युत्तर पदवीनंतर त्यांनी वनस्पती प्रजननात पुर्ड्यू विद्यापीठात संशोधन करण्यास प्रारंभ केला. वनस्पती अनुवंश विज्ञान आणि वनस्पती रोगविज्ञानातून पीएच्.डी. मिळवली. मांगिनी राव इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रीसर्चमध्ये गहू प्रजनन विभागात रुजू झाले. त्यांना सुरुवातीला असिस्टंट प्रोफेसर पद मग अनुवंश वैज्ञानिक आणि वरिष्ठ अनुवंश वैज्ञानिक, मग भारतातील गहू गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे समन्वयक व शेवटी याच विभागाचे प्रमुख पद मिळाल्यापासून हे पद त्यांच्याकडे कायम राहिले.

या काळात ते भारतीय हरित क्रांती प्रकल्पाबरोबर जोडले गेलेले होते. विभाग प्रमुख पदानंतर त्यांना उपसंचालक पीक विज्ञान हे पद मिळाले. टेक्नॉलॉजी मिशन तेलबियाचे संस्थापक सदस्य म्हणून त्या वेळी असलेले पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांची नेमणूक केली. नंतर त्यांना जागतिक बँकेने कृषितज्ञ म्हणून पाचारण केले. दोन वर्षे त्यांनी हा कार्यभार सांभाळला.

नंतर आचार्य एन. रंगा अ‍ॅग्रिकल्चरल युनिव्हर्सीटीचे कुलगुरू झाल्यावर ते सहा वर्षेपर्यंत या पदावर राहिले. कुलगुरू असताना अ‍ॅग्रि बायोटेक फाउंडेशनचे अध्यक्ष आणि कुलगुरू अशी दोन्ही कामे त्यांनी समर्थपणे सांभाळली. अ‍ॅग्रि बायोटेक फाउंडेशनमधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस, ज्वारी, एरंड आणि हरभरा यांचे जनुकीय बदल केलेले वाण विकसित झाले.

फिलिपाईन्स येथील मनिलाच्या आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राच्या विश्वस्त मंडळावर आणि आंतरराष्ट्रीय मका व गहू पीक सुधार केंद्र मेक्सिको यांच्या तज्ञ मंडळावर मांगिना राव त्यांची निवड झाली होती. इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एन्टरप्राइझ, हैदराबादच्या बायोटेक्नॉलॉजी प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार ते सांभाळत होते.

राव यांनी तणप्रतिक्षम जीएम पिकांच्या भारतात येण्याने हजारो लाखो कृषि कष्टकऱ्यांचा रोजगार गमावण्याची भीती वाटत असल्याने त्यांनी तणनाशकांनासुद्धा विरोध केला. यांत्रिक पद्धतीने पेरणी, काढणी आणि तण काढल्याने कृषि-कामगारांना कामे मिळणार नाहीत. ते बेकार होतील. अशा व्यक्तींना दुसरे काम करण्याची संधी मिळणार नाही. असे कामगार शहरी भागात जाऊन बेकारांच्या संख्येत भर पडेल. वैज्ञानिकांना या प्रश्नाची जाण नाही. राव यांच्या या म्हणण्याने यांत्रिक शेती पुरस्कर्त्यांना धक्का बसला.

भावी जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संधीच्या सभेमध्ये त्यांनी सांगितले, ‘एकदा शेतकर्‍यांना जनुकीय बदल केलेल्या पिकांची उत्पादकता समजली म्हणजे त्यांना जीएम (जेनेटिकली मॉडीफाईड) पिकांची लागवड करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही.’ भारतातील पहिल्या जीएम कापूस पिकांची लागवड या सभेनंतर त्वरित चालू झाली. या पूर्वी भारतात बीटी कापूस आणण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले होते. सहा राज्यांनी त्यावर बंदी घातली होती. आंध्र प्रदेश हे त्यापैकी एक होते.

मांगिना राव  यांना नॉर्मन बोरलॉग यांच्या नावाने देण्यात येणारा बोरलॉग आणि लिंकर ॲवार्ड देण्यात आले. याचवर्षी त्यांना भारतीय शासनाने पद्मश्री सन्मान दिला. याशिवाय कृषि क्षेत्रातील आजीवन कर्तृत्व पुरस्कार अ‍ॅग्रिकल्चरल टुडे देण्यात आला. महिंद्र समृद्धी शिरोमणी सन्मान असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. बनारस हिंदू विश्वविद्यालयाने त्यांना मानद डी.एस्सी. प्रदान केली.

त्यांचे हैद्राबाद येथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा