मार्मुर, ज्युलियस : (२२ मार्च, १९२६ – २० मे, १९९६)

जैविक शास्त्रज्ञ जुलियस मार्मुर यांचा जन्म बीअल्स्टोक (पोलंड ) इथे झाला. कॅनडा येथे त्यांनी शालेय आणि कॉलेज शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षण  मॅकगिल विद्यापीठात पूर्ण केले आणि पीएच.डी. ही पदवी त्यांनी आयोवा विद्यापीठातून  सूक्ष्मरोगजंतू व शरीरशास्त्र या विषयात प्राप्त केली. पुढील कार्यासाठी येशिवा (न्यूयॉर्क) विद्यापीठात अल्बर्ट आइनस्टाइन कॉलेज ऑफ मेडिसिन, ब्राँक्स येथे ते दाखल झाले. डॉ. पॉल डॉटी यांच्या हार्वर्ड प्रयोग शाळेत काम करताना जनुकांमध्ये बदल घडवून आणता येतो हे त्यांनी सिद्ध केले. सूक्ष्मजीवजंतूंमधील डीएनएच्या घटकांमध्ये बदल केल्यास त्या घटकांतील संदेशानुसार प्रथिनाच्या साखळीत गुंफल्या जाणार्‍या अमिनो आम्लामध्ये बदल करता येतो. त्यामुळे मिश्रजातीय डीएनए बनवून त्याचे  आनुवंशिक संग्रह बदलता येतात आणि त्यांचा उपयोग आनुवंशिक रोगनिदान आणि जन्मापूर्वीच आनुवंशिक गुणधर्म ओळखण्यास होतो. या त्यांच्या शोधामुळे आनुवंशिकतेचे रहस्य उलगडण्यात मदत झाली आहे. सूक्ष्मपेशीतून डीएनए वेगळा करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आणि जनुकशास्त्रात क्रांती झाली.

मार्मुर यांनी २०० शास्त्रीय पेपर प्रकाशित व संपादित केले आहेत. त्यांना नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थकडून संशोधनासाठी देणगी मिळाली. आइनस्टाइन युनिव्हर्सिटी त्यांच्या नावाने वार्षिक परिसंवाद ठेवते व शोधकार्यात प्राविण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करते.

संदर्भ :

  • Marmurj, Doty P., ‘Determination of the base composition of DNA from its thermal denaturation temperature’ j mol.biol.5 -109-18

 समीक्षक : रंजन गर्गे